EVM And Maharashtra Assembly Election: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका केली होती. दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचे सादरीकरण केले होते. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी त्यांची भेट घेत महाराष्ट्रात १६० जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव दिला होता, असे म्हटले आहे.
शरद पवार यांच्या दाव्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही हाच दावा करत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनाही काही लोक भेटले होते आणि विशिष्ट जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा केला आहे.
शरद पवार यांनी महत्त्वाचा विषय मांडला
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “काल शरद पवार यांनी महत्त्वाचा विषय मांडला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले होते. त्यांनी विशिष्ट रकमेच्या बदल्यात १६० जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता मी तुम्हाला त्यापुढचे सांगतो. यापैकी काही लोक उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते. ते लोकसभेलाही आणि विधानसभेलाही भेटले होते. मी त्यावेळी उपस्थित होतो. आम्ही त्यांना सांगितलं की, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे.”
अडचणीतील ६० ते ६५ जागा
संजय राऊत पुढे म्हणाले की, “विधानसभेवेळी ते लोक पुन्हा आमच्याकडे आले होते. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की, लोकसभेत आम्हाला प्रचंड यश मिळाले आहे. विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येऊ. तेव्हा त्या लोकांचे म्हणणे होते की, तुम्ही अडचणीतील ६० ते ६५ जागा सांगा, त्या जागा आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्हाला विजयी करून देऊ.”
शरद पवार काय म्हणाले होते?
“राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे, भाजपाकडून नाही”, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
काल माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला होता. “विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची त्यांना गॅरंटी दिली होती”, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.