मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठीत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱ्या देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले? असा सवाल शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

“मोदी शिर्डीत आले व पुन्हा एकदा खोटे बोलून गेले. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पण त्यांनी सांगितले, ‘महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?’ असा प्रश्न मोदी यांनी केला. मोदी यांनी पवार यांच्याबाबत आपण आधी काय बोललो व आता काय बोललो हे तपासून घ्यायला हवे होते. खरं तर मोदी सरकारनेच शरद पवार यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ दिला व आता मोदी नेमके उलटे बोलत आहेत. गोंधळलेल्या मानसिकतेचे हे लक्षण आहे,” असा टोला ठाकरे गटानं पंतप्रधानांना लगावला आहे.

हेही वाचा : समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज; शरद पवार यांचे प्रतिपादन

“मोदींच्या कारकीर्दीत चार-पाच कृषिमंत्री झाले”

“‘यूपीए’ सरकारच्या काळात पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते. पंजाबराव देशमुखांनंतर लाभलेले पवार हे सर्वोत्तम कृषिमंत्री होते व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी उत्तम योजना राबवल्या. त्यात आता पडायचे नाही, पण मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे बहुरंगी कृषिमंत्री देशाला दिले त्यांनी काय केले? त्यांना शेतीतले किती कळत होते? सध्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तर मोदी यांनी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले. कृषिमंत्री पदाविषयी मोदी यांची ही आस्था आहे. कृषिमंत्री तोमर हे चंबळ खोऱ्यातील त्यांच्या विधानसभा निवडणुकीत अडकून पडले आहेत व देशाचे कृषी मंत्रालय वाऱ्यावर आहे. मोदी यांच्या कारकीर्दीत चार-पाच कृषिमंत्री झाले,” असं ठाकरे गटानं म्हटलं.

“…याचे भय पंतप्रधानांना वाटते”

“चार-पाच वर्षांपूर्वी मोदी हे पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे व नेतृत्व गुणांचे कौतुक करीत होते. पवार हे कृषिमंत्री असताना त्यांच्या गुजरातला कशी मदत करीत होते, त्याचे कीर्तन करीत होते. पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो वगैरे पुड्या सोडत होते. आज त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. मोदी यांच्या बोलण्यात व वागण्यात आगापिछा नसतो. चार महिन्यांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा व शिखर बँकेच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. शिर्डीत तेच अजित पवार मोदी यांच्या शेजारी भाजपापुरस्कृत उपमुख्यमंत्री म्हणून बसले व अजित पवारांसमोर मोदी हे शरद पवारांची ‘बदनामी’ करीत होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान व अभिमान मेल्याचे हे चित्र आहे. पवारांनी काय केले याचे उत्तर अजित पवार हे आहे. पवारांनी घडवलेले अजित पवार हे मोदींच्या व्यासपीठावर होते व अजित पवारांना फोडले तरी ८२ वर्षांचे पवार अजून मैदानात आहेत. याचे भय पंतप्रधानांना वाटते,” असेही ठाकरे गटानं सांगितलं.

हेही वाचा : “पवारांनी कृषिमंत्री असताना काय केले?” मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले…

“मोदी सत्तेवर आले तेव्हा रुपयाचे मूल्य ५५ रुपये होते, आज…”

“पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी काय केले? हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. चीनने लडाखवर पाऊल ठेवले आहे, काश्मीरात घुसखोरी सुरू आहे. मोदी यांच्याच काळात ‘पुलवामा’ घडले. काश्मीरी पंडितांची घरवापसी होईल असे मोदींचे वचन होते. ते वचन पूर्ण झाले नाही. मोदी यांच्याच काळात गुजरातची दंगल पेटली व आता मणिपुरात आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. मोदी सत्तेवर आले तेव्हा रुपयाचे मूल्य ५५ रुपये होते. आज डॉलरच्या पुढे ते ८२ रुपये आहे. मोदींनी काय केले? हा मुद्दा येथे उपस्थित होऊ शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तुमचे वचन होते ते झालेच नाही, पण शेती व शेतकऱ्यांना गुलाम करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी यांनी आणले. शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर ते कायदे मागे घेतले. आता बोला!,” असं आव्हान ठाकरे गटानं पंतप्रधान मोदींना दिलं आहे.