भाजपा आणि मनेसे युतीबाब राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी यावर भाष्य देखील केले आहे. मात्र युती करतांना पक्षांचे विचार आणि भूमिका जुळणं फार महत्वाचं असतं. मनसेचा परप्रांतीयांसदर्भात असलेल्या भूमिकेवर नेहमी प्रश्न उपस्थित होतात. तसेच यापुर्वी मनसेने परप्रांतीयांविरोधातील भूमिका बदलली तर भाजप त्यांना सोबत घेऊ शकतो. राज हे आश्वासक आहेत. युतीबाबतचा निर्णय पक्षीय पातळीवर विचारांती होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांनी राज ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान, परप्रांतीयांसंंबधी घेतलेल्या भूमिकेसंबंधीचा गैरसमज दूर करण्यासाठी राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना एका मुलाखतीची लिंक पाठवली आहे.

यापर्वी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शासकीय विश्रामगृहात धावती भेट घेतली होती. परप्रांतीयांबाबत आपल्या भूमिकेचा विपर्यास केला जात असल्याचे राज यांनी आपणास सांगितल्याचे त्यावेळी पाटील यांनी नमूद केले होते. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

फडणवीसांनी केला खुलासा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या युतीबद्दलच्या चर्चांवर भूमिका मांडत भारतीय जनता पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. मनसेसोबत युती करण्याबाबत काही चर्चा झाली का अशी विचारणा करण्यात आल्यावर फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला मनसेचे विचार पटत नाहीत. भारतीय जनता पार्टीने भाषेच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. असा भेद आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मनसे आणि भाजपा यांची विचारधाराच जुळत नसल्याने युतीचा कोणताही विचार नाही.

यापूर्वी भाजपा नेत्यांकडून अनेकवेळा मनसेसोबतच्या युतीबद्दल सकारात्मक संकेत दिले गेले. मात्र, थेट तशी कोणतीही बोलणी झाल्याचं दिसलेलं नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबत युती करण्यातील अडथळा अनेकवेळा स्पष्ट केला आहे. याबद्दल बोलताना एकदा चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलं आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. राज ठाकरे, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही.”