माझ्या मतदार संघात कोणाचे संरक्षण घेऊन फिरायची मला गरजच काय? असा सवाल करीत अशी वेळ येईल त्या दिवशी मी निवडणूक लढवायचे बंद करेन, असे सांगत कार्यालयाची झालेली मोडतोड, दुरूस्ती कार्यकत्रे करतील. आम्ही काय खंडणीबहाद्दर नाही, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

राज्यमंत्री खोत यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खा. शेट्टी यांच्या कार्यालयाची नासधूस केली  होती. या कार्यालयाची आज त्यांनी पहाणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला माझ्या मतदार संघामध्ये फिरू देणार नाही असा इशारा देणाऱ्याची जागा जनताच दाखविणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन हे व्यक्तिद्बेषाचे नसून व्यवस्थेकडून प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याच्या रागातून आहेत. इस्लामपूरात कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांमध्ये बलात्कार, खंडणी आणि खुनासारखे गंभीर गुन्हे असणारे लोक असल्याचा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला.

खा. शेट्टी म्हणाले की, दगडफेक करणारे आम्हाला ज्ञात आहेत, त्यांचा पक्ष जाहीर करण्याची वेळ आणणे त्यांच्यासाठीच धोक्याचे आहे. आमच्या संघटनेचे आंदोलन हे सरकार विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या रोषाला केवळ एकाच मंत्र्याला सामोरे जावे लागेल, असे नाही, तर  यापुढील काळात प्रत्येक मंत्र्याला या रोषाला सामोरे जावे लागेल.

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने मनात आक्रोश आहे. हा राग आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून आला तर तो वैयक्तिक घेण्याचे काहीच कारण नाही. या अगोदरही अशी आंदोलने संघटनेने हाती घेतली आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. सन्मान योजनेचा लाभ अनेकांना मिळत नाही. ऑनलाईन अर्ज करावे लागत आहेत. तूर खरेदीबाबत सांगितले जाते एक आणि प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. यामुळे शेतकऱ्यांत उद्रेक निर्माण झाला आहे असेही त्यांनी सांगितले.