साधुसंतांनी गौरवलेली, सातासमुद्रापार गेलेली आणि जागतिकीकरणाच्या महाजालातही आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणा-या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते. आजच्या या विशेष दिवसाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने नेटकरांना ‘मराठीचा प्रसार करण्यासाठी काय करायला हवं?’, याबाबत एका वाक्यात मते मांडण्यास सांगितले होते. त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद देत मराठीचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी आणि तिच्या जतन, संवर्धनासाठीच्या प्रतिक्रिया येथे नोंदवल्या.
फक्त मराठीत बोला, लिहा इथपासून ज्यांना मराठी येत नाही पण महाराष्ट्रात राहतात त्यांनी मराठी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधून शिकायलाच सुरूवात करण्यापर्यतचे सल्ले वजा आर्जवं वाचकांनी केल्याचे दिसले. चिंतामणी आनंदराव जगताप यांनी तर ‘भांडतानाही मराठीतच भांडा’ असे म्हटले आहे. विलास समेळ म्हणतात, ‘मराठी बोलण्याची लाज वाटून घेऊ नका’, तर आज प्रत्येकाला फक्त मराठीतून उत्तर देवून आज मराठी दिन आहे, तुम्हीसुध्दा मराठी शिकायला सुरुवात करा, असं मत विजयेंद्र भंडारे यांनी मांडलं आहे.
सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करावा असे मत विवेक पाटील यांनी मांडले आहे. महाराष्ट्रातील सर्व बॅंका आणि पतसंस्था यांचा व्यवहार मराठीत झाला पाहिजे, असं शरद अहिरे यांना वाटतं. सर्वेश सोनार यांच्या मते, अॅड्राइड मोबाइल वापरणा-यांनी ‘प्ले स्टोर’वरून ‘गुगल हिंदी इनपुट’ हे अॅप डाउनलोड करावे आणि मराठी शिकावे. मुकेश पांडुरंग महाले यांनी सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर करण्याची भूमिका मांडली आहे. सर्वप्रथम इंग्रजीचे मराठीवर होत असलेले आक्रमण थांबवण्याचे मत व्यक्त करत मराठी भाषा जगवायची असेल तर फक्त भाषा दिन साजरा न करता मराठी जगायला शिकावं लागेल असं सुमेध वानखेडे यांनी म्हटलं आहे. मराठीतून सर्व उच्च शिक्षण आणि ते शिक्षण घेतलेल्यांना सर्व सरकारी नोक-यांत प्राधान्य, असंही मत व्यक्त करण्यात आलं आहे.
दत्त अनिकेत वासेकर यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास मराठीतून करता येण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व विषयांची पुस्तके मराठीतून उपलब्ध व्हावी, अशी आशा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कारभार मराठीतूनच सक्तीचा करावा व किमान माध्यमिक शिक्षणापर्यंत मराठी माध्यम सक्तीचे असावे आणि इतर भाषा ह्या भाषा विषय म्हणून असाव्यात, असे मत मांडले आहे. तर पंकज म्हणतात, मराठी विषय आणि मराठ्यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात अनिवार्य असायला हवा तरच मराठी भाषा आणि मराठ्यांचा इतिहास टिकेल.
मराठी टिकवण्यासाठी मराठी शाळांना भरघोस अनुदान द्यावे, असं नवनाथ तावरे व माधव वानवे यांना वाटतं. सार्वजनिक ठिकाणी, दुकाने, बस, रिक्षा, भाजी मंडई येथे सर्वांनी मराठीतूनच बोलावे असे पूनम मालपोटे यांना वाटते. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात मराठीबाबतचा न्यूनगंड काढून टाकला पाहिजे असं ठाम मत वैभव यांनी मांडलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
वाचकांची मते: मराठीचा प्रसार करण्यासाठी काय करायला हवं?
फक्त मराठीत बोला, लिहा इथपासून ज्यांना मराठी येत नाही पण महाराष्ट्रात राहतात त्यांनी मराठी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधून शिकायलाच सुरूवात करण्यापर्यतचे सल्ले वजा आर्जवं वाचकांनी केल्याचे दिसले.

First published on: 27-02-2014 at 05:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What needs to be done to spread the word about marathi people reacts