मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून रोजी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसंच, गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी या भेटीतील चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
“आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचारातील ही गेल्या अनेक वर्षांची युती आहे. या राज्यात काम करत असताना, विकास प्रकल्प पुढे नेत असताना पंतप्रधान आमच्या पाठीशी उभे आहेत. अनेक प्रस्तावांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या युतीमध्ये कसलेही मतभेद नाहीत. आमच्यात मतभेद असल्याच्या विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अडीच वर्षाच्या काळात सर्व कामे थांबली होती. सर्व कामांना ब्रेक लागला होता. हे सर्व आम्ही हटवले. राज्यात अनेक प्रकल्प पुढे जात आहेत, हे दृश्य स्वरुपात लोकांना दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलाखतीत म्हणाले.




हेही वाचा >> “…नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढतो”, अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावलं!
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
दरम्यान, या बैठकीत राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. युतीतील अनेक आमदारांना अद्याप कोणतीच खाती न मिळाल्याने नेते नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. तर, येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “कॅबिनेट विस्ताराबाबतही चर्चा झाली आहे. तो निर्णय लवकरच होईल, त्याला काहीही अडचण नाही.”
हेही वाचा >> शिंदे-फडणवीसांची दिल्लीत शाहांसोबत खलबतं, नेमकी कशावर झाली चर्चा? मुख्यमंत्री ट्वीट करून म्हणाले…
एकनाथ शिंदे यांनी काय ट्वीट केलं होतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.
“कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला”, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
बहुमताने जिंकू – एकनाथ शिंदे
“महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार ….”, असा विश्वासही त्यांनी यावेळी ट्वीटद्वारे व्यक्त केला आहे.