पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे या निवडणुकीत नाशिकमधून निवडून आले. या निकालानंतर बाळासाहेब थोरात विरूद्ध नाना पटोले असा वादही समोर आला. अशात आता बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. काँग्रेससाठी हा झटका मानला जातो आहे. बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे अशात ही राजीनाम्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोण आहेत बाळासाहेब थोरात?

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधले एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्याकडे महसूल मंत्रीपदही होतं. महाराष्ट्र काँग्रेसच्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांचं नाव घेतलं जातं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. अनेक दिग्गज भाजपात जात असताना पक्षाचं डॅमेज कंट्रोल करण्याची मोठी जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर होती.

राहुल गांधी यांचे विश्वासू

बाळासाहेब थोरात हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांच्या दौऱ्याचं नियोजन बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं. संगमनेरची प्रचारसभा झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून राहुल गांधी यांनी बाळासाहेब थोरात यांना नेलं होतं. यावेळी राहुल गांधीसोबत बाळासाहेब थोरात यांनी काढलेचा सेल्फी चांगलाच चर्चिला गेला होता.
राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात गेल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी दिली होती. ती त्यांनी समर्थपणे पारही पाडली.

बाळासाहेब थोरात यांचं राजकारण मवाळ पद्धतीचं

बाळासाहेब थोरात हे मवाळ राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. पक्षांतर्गत गटबाजी त्यांनी कधीही केली नाही. अनेकदा पक्षातल्या लोकांशी जुळवून घेण्याची भूमिकाच बाळासाहेब थोरात यांनी निभावल्याचं दिसून आलं आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या काँग्रेसच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांसह बाळासाहेब थोरात यांनी काम केलं आहे. यामुळे बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा दिल्लीतही चांगली ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आणि बाळासाहेब थोरात यांचेही चांगले राजकीय संबंध आहेत. महाविकास आघाडी सरकार आणण्यात संजय राऊत, शरद पवार यांचा वाटा होताच पण काँग्रेसच्या वतीने शिष्टाई करण्याचं काम हे बाळासाहेब थोरात यांनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण अस्तित्त्वात आलं. बाळासाहेब थोरात यांचाही या समीकरणात महत्त्वाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही.

स्वच्छ प्रतिमेचे नेते अशी ओळख

बाळासाहेब थोरात यांच्यावर लोकसभेतल्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली कारण त्यांनी राजकारणात जपलेली त्यांची स्वच्छ प्रतिमा. बाळासाहेब थोरात हे आजवर एकाही वादात अडकलेले नेते नाहीत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच ते काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेब थोरात यांचा थोडक्यात परिचय

बाळासाहेब थोरात यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५३ ला झाला. त्यांचं शिक्षण सर डी. एम. पेटीट हायस्कूल संगमनेर या ठिकाणी झालं. त्यानंतर पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी बीएची पदवी घेतली. तर ILS लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण बाळासाहेब थोरात यांनी घेतलं. १९७८ मध्ये बाळासाहेब थोरात यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७९ मध्ये त्यांनी वकिली व्यवसायास सुरूवात केली. १९८० मध्ये शेतकरी प्रश्नांच्या चळवळीत सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना ९ दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला. १९८५ मध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून बाळासाहेब थोरात निवडून आले. १९९० ते २०१९ या कालावधीत काँग्रेसच्या तिकिटावर सातत्याने त्यांचा विजय झाला. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब थोरात कृषी मंत्री होते. तर २००९ मध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यावेळी ते महसूल मंत्री होते. २०१९ मध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली.