Sanjay Shirsat Alleged Money Bag Video: सध्या मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणही तापल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विविध कारणांनी वादात अडकले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण केल्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांचा घरातील पैशाच्या बॅगेचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कथित पैशाच्या बॅगेप्रकरणी आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांच्या घरातील हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला यावर भाष्य केले आहे. आज विधानसभेच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांना त्यांच्या घरातील व्हिडिओ कोणी व्हायरल केला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
याला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, “तो व्हिडिओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवासातून आल्यानंतर बेडवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेथे माझे श्वानही आहे. प्रवासातून आल्यानंतर माझी कपड्यांची लटकलेली बॅग दिसतेय, त्याची बातमी होते, याचं मला आश्चर्य वाटते.”
“आमच्याकडे मातोश्री आणि मातोश्री २ नाही. माझे घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी उघडं असतं. कार्यकर्ते येतात, उत्साहाच्या भरात कोणीतरी व्हिडिओ काढला असेल. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कोणालाही बोलावलं जात नाही. काम काय, नाव काय, या गोष्टी विचारल्या जात नाहीत”, असेही संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले आहे की, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता व्हायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही कायम आहोत. म्हणून जरी कोणी व्हिडिओ काढला असेल, तरी त्यामध्ये गैर काहीच नाही. यांचे व्हिडिओ पाहा. पाटकर विसरला आहे का हा माणूस? हे जे काही बोलतात, ते एकदा पाहा. महिलांचा छळ करणारे तुम्ही आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःचं कॅरेक्टर जपा. म्हणून मला या व्हिडिओचे काहीही आश्चर्य वाटत नाही.”