MNS on Nishikant Dubey: मराठी – हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी या वादात उडी घेतली. तसेच मराठी माणसांना भाषेवरून डिवचले. मनसेने निशिकांत दुबे यांच्या विधानाचा याआधीच विरोध केला होता. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या महिला खासदारांनीही खासदार निशिकांत दुबे यांना घेरून त्यांच्या विधानाबाबत जाब विचारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसेकडून या महिला खासदारांचे कौतुक करण्यात आले असून इतर ४५ खासदार का गप्प राहिले? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याबाबत पोस्ट टाकण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मनसेच्या वतीने म्हटले की, ‘मराठी माणसांना आपटून आपटून मारेन… ” अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील खासदार वर्षाताई गायकवाड, प्रतिभाताई धानोरकर, शोभाताई बच्छाव यांनी संसदेत घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या बेताल विधानाचा जाब विचारला. यासाठी तिन्ही खासदार महोदयांचे मनापासून अभिनंदन.
इतर खासदार गप्प का आहेत?
“पण महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का आहेत? मराठी माणसाचा अपमान या ४५ खासदारांना सहन कसा होऊ शकतो? तुमच्यासाठी मराठी माणूस आणि अपमान हा अस्मितेचा विषय नाही का?”, असे प्रश्न मनसेच्या वतीने विचारण्यात आले आहेत.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही या प्रश्नावर भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी जी कृती केली, ती अभिमानास्पद होती. खरंतर काँग्रेसची भूमिकाही हिंदीधार्जिणी असते. पण पक्ष न पाहता या तिघींनी दुबेंसारख्या नेत्याला जाब विचारला. हे करण्यासाठी धैर्य लागते. हे धैर्य महिला खासदारांनी दाखवले, त्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांकडून त्याचा सत्कार करण्यात येईल, असे अविनाश जाधव म्हणाले.
आम्हाला पुरूष खासदारांकडून अपेक्षा होती, पण…
अविनाश जाधव म्हणाले की, खरंतर आम्हाला पुरूष खासदारांकडून अपेक्षा होती. महाराष्ट्रात जन्मलेले खासदार आपल्या भाषेसाठी संसदेत दुबेंना जाब विचारतील, असे वाटले होते. पण त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. उलट काँग्रेसच्या महिला खासदारांनी पुढाकार घेऊन मराठीचा सन्मान केला. त्याबद्दल या तीन भगिनींचे मनापासून आभार!