राज ठाकरेंची ईडी चौकशी प्रश्न उपस्थित करण्यासारखीच आहे असं अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे आणि पी. चिदंबरम या दोघांचीही चौकशी प्रश्न निर्माण करणारीच आहे. सर्वसामान्यांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. देशात सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतंय. सामान्य व्यक्ती असो किंवा असामान्य सगळ्यांच्या बाबतीत हेच घडतं आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी उर्मिला मातोंडकर जेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिल्या होत्या तेव्हा मनसेनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता उर्मिला मातोंडकर यांनीही राज ठाकरेंना पाठिंबा देत त्यांच्याविरोधात होणारी ईडीची चौकशी प्रश्न उपस्थित करणारी आहे असं म्हटलं आहे. देशात सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतं आहे, सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तींबाबत असंच घडतं आहे, असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज  ईडी कार्यालयात हजर झाले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईतील काही भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे , दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.