शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परब आणि संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मागच्या तीन महिन्यांतली ही चौथी भेट आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जातं आहे. मात्र ही भेट का झाली याचं कारण संजय राऊत यांनी आता सांगितलं आहे.
गणेश उत्सवातही उद्धव ठाकरे पोहचले राज ठाकरेंच्या घरी
यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवतीर्थवर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यादेखील शिवतीर्थवर गेल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी भोजनचा आस्वादही घेतला होता. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे ठाकरे बंधू हे वेगाने एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आणखी वाढली आहे. आता नेमकं काय होणार ते येत्या काळात स्पष्ट होईल.
आत्तापर्यंत किती वेळा भेटले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे?
१) ५ जुलैला विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वरळी येथे एकाच मंचावर आले होते. मराठीच्या मुद्द्यावर दोन बंधू पहिल्यांदाच एकत्र आले होते.
२) २७ जुलैला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते.
३) २७ ऑगस्टला गणपतीच्या दिवशी संपूर्ण उद्धव ठाकरे हे संपूर्ण कुटुंबासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचले होते.
४) १० सप्टेंबर (आज) उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले होते. त्यांच्यासह संजय राऊतही होते. संजय राऊत यांनी आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे का गेले होते ते सांगितलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
उद्धव ठाकरे आणि मी आम्ही राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. काहीही राजकारण नव्हतं. सत्य असं आहे की गणपतीच्या वेळेला उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंच्या आई म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या मावशी/ काकी यांनी निघताना उद्धव ठाकरेंना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, तेव्हा तू परत ये मला भेटायला. त्यानुसार कुंदामावशींना भेटायला आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. आज का भेटले ते तुम्हाला मी सत्य सांगितलं आहे. कारण मी जे सांगितलं ते सत्य सांगितलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले.