संशयावरून कोयत्याचे वार करून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथे घडला. पोलिसांनी संशयित विजय आहिरे यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशाबाई आहिरे (३०) आणि विजय आहिरे हे दाम्पत्य जिथे काम मिळेल तिथे ऊसतोडीसाठी जात होते. त्यांना शरद आणि विशाल हे दोन मुलगे आहेत. विजय हा आशाबाईवर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत असत.

दिवाळीत दोघे आशाबाईच्या माहेरी चाळीसगाव येथे राहून पुन्हा मंगळणे येथे परतले होते. सोमवारी सकाळी पोलीसपाटील दिलीप पाटील यांनी आशाबाई यांचे वडील संजय पवार यांना आशाबाईच्या गळ्यावर तिचा पती विजयने कोयता मारल्याचे कळविले. त्यानंतर संजय पवार हे नातेवाईकांसह मंगळणे येथे गेले असता आशाबाईची सासू जिजाबाई त्यांना भेटली.

जिजाबाईंने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार सकाळी विजयने ऊसतोडीच्या कोयत्याने आशाबाईला मारले. गळ्यावरील वारामुळे दोन खोल जखमा होऊन त्यातून रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. या संदर्भात आशाबाईच्या वडिलांनी नांदगाव पोलिसांत तक्रार केल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.