सांगली: सह्याद्रीच्या खोऱ्यातील कोयना विभागात एका वाघाचे दर्शन झाले नसले तरी डरकाळी ऐकण्यास मिळाली. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तब्बल २३४ रानगवे आढळून आले आहेत. ही नोंद आहे, नुकत्याच बौध्द पौर्णिमेवेळी झालेल्या वन्यप्राणी गणनेमध्ये.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कोयना व चांदोली वन्यजीव विभागाअंतर्गत १२० प्रगणकांच्या माध्यमातून बौध्द पौर्णिमेवेळी प्राणी गणना करण्यात आली. प्राणी गणनेसाठी ८० पाणवठ्यावर मचाण उभारण्यात आले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह निसर्गप्रेमींनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांनी वन्यप्राणी गणनेचे तपशील आज जाहीर केले.
चांदोली वन्यजीव विभागात आंबा, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक तर कोयना वन्यजीव विभागात कोयना, पाटण, बामणोली व कांदाट या ठिकाणी प्राणी गणना करण्यात आली. कोयना परिसरात एका वाघाची डरकाळी प्रगणकांना ऐकण्यास मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे, तर आंबा-१, ढेबेवाडी ३ अशा चार बिबट्यांनी दर्शन दिले. तर कोयना परिसरात एका बिबट्याची डरकाळी कानी आली. यामुळे या प्रकल्पात पाच बिबट्यांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात २३४ रानगवे पाणवठ्यावर आल्याचे आढळून आले. यामध्ये आंबा येथे २५, चांदोली- १०३, ढेबेवाडी-११, हेळवाक-१७, कोयना ३०, पाटण १, बामणोली २६ आणि कांदाटी-१ रानगवे आढळल्याची नोंद करण्यात आली आहे.प्राणी गणनेत आढळलेले अन्य प्राणी असे, रानकुत्रा ५, कोल्हा १, अस्वल ११, उदमांजर ९, मुंगूस १०, साळींदर ११, खवले मांजर १, सांबर २८, रानडुक्कर १०७, भेकर १६, वानर ९, माकड १६, ससा ९, शेकरू २०, खार ४, रानउंदीर ३, वटवाघूळ ६, मोर १५, रानकोंबडा १४० आणि चकोत्री ३.
दरवर्षी बौध्द पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात येते. यात सहभागी होण्यासाठी निसर्गप्रेमींनाही वन विभागाच्या मार्फत संधी देण्यात आली होती. या वर्षीची प्राणीगणना १२ मे रोजी दुपारी १२ ते १३ मे रोजी सकाळी दहा या वेळेत मचाणावर बसून प्रगणकांनी प्राणी गणना करत त्यांची नोंद केली आहे. प्राणी गणना करण्यासाठी यावर्षी ४ मेपर्यंत १८० जणांनी नोंदणी केली होती. यापैकी १२० जणांची निवड केली. प्रत्येक मचाणावर निसर्ग प्रेमींसोबत वन विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.