प्राण्यांची बेकायदा शिकार, वाघाचे कातडं आणि त्यांच्या अवयवांची जप्ती व एकूणच वन्य जिवांची निगडित गुन्ह्यांची लवकर उकल करण्यासाठी येत्या वर्षात राज्य शासनातर्फे नागपूरला पहिल्या वन्यजीव न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेची स्थापना करण्यात येईल. ही महाराष्ट्रातील वन्यजिवांशी निगडीत गुन्ह्यांची तपासणी करणारी पहिली फॉरेन्सिक लॅबरोटरी असेल.

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या तर्फे स्थापन होणाऱ्या या नव्या यंत्रणेमुळे वन्यजीव यांची निगडित गुन्ह्यामध्ये लवकर तपास हो ऊन अशा गुन्हेगारांना पटकन कोर्टासमोर उभे करता येईल.

गृहखात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020 मध्ये या प्रयोगशाळा स्‍थापनेसाठी टेंडर काढण्यात येतील. “साधारणपणे मे महिन्यापर्यंत सर्व यंत्रणा जागेवर असेल असा आमचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील वन्यजीव व प्राण्यांची निगडित सर्व गुन्ह्यांची तपासणी या वाईल्डलाइफ डी एन ए सेंटरमध्ये करण्यात येईल,” असे अधिकारी म्हणाले.

सध्या असा कुठला गुन्हा घडल्यास, त्याचे सँपल्स म्हणजे व्हिसेरा वगैरे, तपासणीसाठी हैदराबाद, डेहराडून व लखनऊ येथे पाठवण्यात येतात. पण या सर्व ठिकाणी देशभरातून अनेक नमुने (Samples) येत असल्यामुळे रिपोर्ट यायला वेळ लागतो. नागपूरला ही प्रयोगशाळा सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वन गुन्हे तपासणीसाठी इथे पाठविण्यात येऊ शकतात. दुसरी लक्षणीय गोष्ट अशी महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ हे विदर्भाच्या परिसरात आहे. या प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी साधारणपणे आठ कोटीचा खर्च येईल असा अंदाज आहे. इथेच साधारणपणे 20 लोक तैनात करण्यात येतील.