Ajit Pawar On Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडवर गंभीर आरोप झाले होते. मात्र, वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, आता धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचे संकेत आज माध्यमांशी बोलताना दिले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागासंदर्भातील काही आरोप झाले होते. मात्र, यामधून न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आहे, आता दुसऱ्या प्रकरणातून जर त्यांना क्लीन चिट मिळाली तर त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
धनंजय मुंडेंबाबत तुम्ही बातम्या वाचल्या असतील. त्यांच्यावर कृषीविभागाशी संबंधित जे आरोप झाले त्या आरोपाबाबत न्यायालयाने धनंजय मुंडे यांना क्लिन चीट दिली. त्यामध्ये त्यांचा कुठेही दोष नाही. आता अजून एक गोष्ट आहे. त्याबाबतही पोलीस यंत्रणा त्याबाबत योग्य ती कारवाई करत आहेत. या प्रकरणामधून जर त्यांना क्लिन चीट मिळाली तर आम्ही धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंबाबत छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ यांना धनंजय मुंडेंच्या पुन्हा मंत्रिमंडळातील समावेशाबाबत प्रश्न विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले की, “धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे योग्य तो निर्णय घेतील”, असं छगन भुजबळ हे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते उद्या (शनिवारी) येतील, पण मी उद्या पुणे आणि परवा नगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी मुंबईत गेल्यानंतर याबद्दलची बाकीची चर्चा आम्हाला करायची आहे. मंत्री माणिकराव कोकांटे यांच्याबरोबर देखील चर्चा करायची आहे. बाकींच्याही काहींशी चर्चा करायची आहे. या चर्चा करून मी मंगळवारपर्यंत निर्णय घेईल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या बैठकीनंतर निर्णय होणार की आधी? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “याबाबत आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ठरवणार आहोत.”