आज एक भलीमोठी जाहिरात सगळ्यांनी वर्तमान पत्रांमध्ये आलेली पाहिली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो आहे. त्यात केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना एका सर्व्हेनुसार देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत असंही त्यात दाखवण्यात आलं आहे. यावरुन विविध आरोप केले जात आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांचा फोटो जाहिरातीतून का वगळला? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर राष्ट्रामध्ये मोदी आणि राज्यात शिंदे ही घोषमा भाजपाचे नेते, कार्यकर्ते देतील का? असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“सध्याच्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण होईल. अजूनही निवडणुका घेतल्या जात नाही. आत्ता निवडणुका जाहीर करुन तुम्ही पावसाळा संपल्या संपल्या निवडणुका घेऊ शकता. पण तुम्हाला निवडणुका घ्यायची भीती वाटते. तर जाहिरातींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो आहे. शिवसेना आमचीच हा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीत मोदीसाहेबांचा फोटो लावला. बरोबर आहे कारण त्यांच्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंनी स्वतःचाही फोटो जाहिरातीत दिला आहे. परंतू बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सोयीस्कररित्या वगळणं हा त्यांचा अपमान नाही का? तुम्ही जनतेला सांगता आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पुढे नेत आहोत. बाळासाहेबांच्या विचारांपासून उद्धव ठाकरेंनी फारकत घेतली आहे असं तुम्ही सांगत होतात मग बाळासाहेबांचा फोटो का नाही?”
“राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले आहेत. आजच्या जाहिरातीत राज्याच्या संदर्भातलं काही सांगितलं असतं की आम्ही वर्षभरात एवढी बेरोजगारी कमी केली, एवढा जीडीपी वाढला, एवढी मदत शेतकऱ्यांना केली असं काही सांगितलं असतं तर ठीक होतं. पण मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा लागली आहे.” असंही अजित पवार म्हणाले.
राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा भाजपा नेते देणार का?
सुरुवातीला घोषणा काय होती? तर ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’. आता घोषणा काय आली आहे? ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी नवी घोषणा आता आली आहे. भाजपा नेत्यांनाही ही घोषणा द्यावी लागेल. याचा खुलासा आता भाजपाने द्यावा. चंद्रशेखर बावनकुळे हे लगेच स्पष्टीकरण द्यायची सवय आहे. त्यांच्याकडून मला उत्तर ऐकायचं आहे. आता ते म्हणतील अजित पवारला यात नाक खुपसून काय करायचं आहे? पण मी हे विचारतो आहे कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली जाहिरात आहे आणि ते मुख्यमंत्री तुमच्या पाठिंब्यावर झाले आहेत. फडणवीसांपेक्षा शिंदेंना जनता अनुकूल झाली आहे हे भाजपाला मान्य आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.