सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने जोमदार हजेरी लावली. जत तालुक्यात जिरग्याळ येथे वीज अंगावर पडल्याने एका महिलेसह दोन म्हशी जागीच ठार झाल्या. तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याबरोबरच घरांचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. ऐन वैशाखात जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मृगसदृश स्थिती होती.
बुधवारी दुपारी जोरदार वादळ वाऱ्यासह तासगाव, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जिरग्याळ (ता. जत) येथील महादेवी भीमाण्णा चौगुले ही महिला दोन म्हशी घेऊन शेतात चारण्यासाठी गेली होती. पावसाची चिन्हे दिसताच गावातील घराकडे परतत असताना अंगावर वीज पडल्याने ही महिला दोन म्हशींसह जागेवरच ठार झाली.
तासगाव तालुक्यात विसापूर, कवठेएकंद, लिंब, हातनूर, मणेराजुरी, उचगाव परिसराला वादळी वाऱ्याने झोडपून काढले. शेतातील छपरे उडून जाण्याबरोबरच कडब्याच्या गंज्याही वादळात सापडल्याने पशुखाद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. विसापूर येथील सदाशिव जाधव यांच्या घराचे पत्रे उडाल्याने घराच्या दोन भिंतीही कोसळल्या आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात देशिंग, खरशिंग, आलकूड, बोरगाव, मोरगाव यासह अग्रणी नदीच्या काठावर असणाऱ्या परिसरात जोरदार पाऊस झाला. याशिवाय मिरज तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाने जोमदार हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व पावसाने यंदा अभूतपूर्व हजेरी लावल्याने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणीबरोबरच वखारणीची कामे सुरू झाली आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात शिराळा परिसरातही गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून, भाताची धूळफेक पेरणीची कामे सुरू करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. या आठवडय़ातील पावसाची स्थिती बघून भाताची धूळफेक पेरणी सुरू करण्याच्या तयारीत शेतकरीवर्ग आहे.