सोमवारी दिवसभराच्या कुंद वातावरणात दुपारनंतर सांगली, मिरजेसह दुष्काळी टापूत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वेळी झालेल्या गारपिटीच्या पावसाने कोटय़वधी रुपयांची हानी झाली आहे. अंतिम टप्प्यात असणारा द्राक्ष हंगाम व रब्बी ज्वारी, गहू या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस-कडेगाव तालुक्यात गारपिटीने द्राक्षाची हानी झाली आहे.
दोन दिवसांच्या थंडीनंतर आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. दुपारनंतर सांगली, मिरजसह दुष्काळी टापूत मेघगर्जनेसह १५ मिनिटांपासून पाऊस तासापर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सांगली, मिरज शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी गारपिटीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. कवलापूर, बुधगाव, कुमठे, तासगाव, कवठेएकंद, मणेराजुरी आदी परिसरात िलबाएवढय़ा गारा पडल्या आहेत. या गारांमुळे द्राक्षबागेतील द्राक्षाचे घड तुटून जमिनीवर पडले आहेत. विटा, आटपाडी, खानापूर परिसरात सायंकाळी ४ वाजल्यानंतर अर्धा तास पाऊस झाला. या ठिकाणी मात्र गारांचे प्रमाण कमी होते.
अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेला द्राक्ष हंगाम अडचणीत आला आहे.  अनेक द्राक्ष बागायतदारांनी आपली द्राक्षे बेदाण्यासाठी ढालगाव, जुनोनी, आगळगाव, शेळकेवाडी आदी परिसरात शेडवर सुकवण्यासाठी टाकली आहेत. पावसामुळे बेदाण्याची प्रतवारी खालावण्याचा धोका आहेच, पण त्याचबरोबर सुकवण्यासाठी लागणारा वेळही चार दिवसांनी वाढणार आहे. गारपिटीतून वाचलेल्या वेलीवरील घड मिलीबग रोगाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घडामध्ये पाणी साचल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी तयार केली जाणारी द्राक्षे मणी तडकल्याने नुकसानीत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष शेतीचेच कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अवकाळी पावसाने द्राक्ष मण्यातील तयार साखर कमी होण्याची भीती बागायतदार प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली. उष्णतेमुळे द्राक्ष मण्यातील साखरेचे प्रमाण २२ ब्रिक्स असेल तर चार किलो द्राक्षापासून एक किलो बेदाणा तयार होऊ शकतो. पावसामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्याने मण्यात तयार झालेली साखर वेलीच्या मुळाद्वारे परत जाऊ शकते.  यामुळे बेदाण्याचा दर्जा खालावण्याबरोबरच वजनातही घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.
द्राक्षाबरोबरच रब्बी ज्वारी काढणीच्या हंगामात असल्याने अवकाळी पावसाने काळी पडणार आहे. ज्वारीबरोबरच कडब्याचेही प्रचंड नुकसान गारपिटीने झाले आहे. गहूपिकाचे गारपिटीने लोंब्या गळण्याचे प्रकार काही भागात दिसून आले. रायवळ आंब्याचा मोहोर पावसामुळे गळाला असल्याचे सांगण्यात आले. झाडावर तयार झालेले बोराएवढे आंबे गारपिटीने मातीमोल झाले आहेत.