‘आय पी एस’ अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांना फसविणा-या महिलेला भुईज पोलिसांनी अटक केली आहे. संजीवनी अविनाश लहीगुडे असे या महिलेचे नाव असून ती साता-यातील आहे.
काल रात्री ही महिला भुईज पोलीस ठाण्यात आली.  तिने आपण ‘आय पी एस’ अधिकारी असल्याची ओळख करुन दिली. ती पुढे म्हणाली की, माझे नातेवाईक चांदक – आनंदपूर (ता वाई) येथे राहतात. तेथे लग्नाच्या वरातीत माझ्या नातेवाइकांना मारहाण झाली आहे. यानंतर तिने पोलिसांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. यावर भुईजचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे पोलीस कर्मचा-यांसह आनंदपूर येथे पोहचले. तोवर हे भांडण मिटले होते. तेथून परत येताना शेडगे यांनी या महिलेची चौकशी केली असता तिचे पितळ उघडे झाले.
संजीवनी अविनाश लहीगुडे (वय २२ रा. शाहुनगर ,गोडोली ,सातारा) नाव असलेली ही महिला साता-यात राहते. तिथे ती ‘ब्युटी पार्लर’ चालविते. आपण ‘आयपीएस’ अधिकारी असल्याचे भासविते. ती मूळची बामणी कार्वेरोड (ता खानापूर, जि सांगली) येथील आहे. विवाहापूर्वीचे तिचे नाव संजीवनी विष्णू जगताप असे आहे. तिला तोतयागिरी प्रकरणी भुईज पोलिसांनी अटक केली असून तिने आणखी कोठे बनवेगिरी केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली.