जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह फार्मासिस्ट आणि अन्य एका डॉक्टरने एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी पीडित महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी दुपारी ही घटना घडली.

पोलिसांनी विनयभंग प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट राजेंद्र साठी आणि डॉ. हेमंत फुके यांच्या विरोधात रविवारी गुन्हे नोंदवले आहेत. अन्य एका डॉक्टर महिलेने पीडितेला त्रास दिला आणि घडलेली घटना कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे.

पीडित ४३ वर्षीय डॉक्टर महिला गेल्या २२ फेब्रुवारीला प्राथमिक केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाली होती. दरम्यानच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी तिच्याशी वाईट उद्देशाने संवाद साधल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. गेल्या ९ मार्चला आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट राजेंद्र राठी याने देखील पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर डॉ. हेमंत फुके याने देखील वाईट उद्देशाने तिच्याशी संभाषण केले आणि वारंवार त्रास दिला. नंतर एका डॉक्टर महिलेने घडलेला प्रकार कुणाला सांगू नको, असे म्हणून मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून या डॉक्टर महिलेने चांदूर बाजार पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत पीडित महिला सोमवारी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली. तिच्याकडील बाटलीत पेट्रोल होते. पोलीस अधीक्षकांच्या कक्षात शिरण्यापूर्वी एका सुरक्षा रक्षकाला तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याने महिला कॉन्स्टेबलला आवाज दिला. कॉन्स्टेबलने धावत येऊन पीडितेला रोखले. तिने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला असता, बाटली हिसकावून घेण्यात महिला कॉन्स्टेबलला यश मिळाले. पण, यादरम्यान पीडित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman doctor set herself on fire alleging sexual harassment
First published on: 19-03-2019 at 02:50 IST