सातारा : सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात एका महिलेने चार अपत्यांना जन्म दिला आहे. जिल्हा रुग्णालयातील दहा वर्षानंतरची ही गौरवशाली घटना आहे. महिला आणि चारही अपत्ये सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली. सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पत्रकारांना याबाबत माहिती दिली. जिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोग विभागा उत्कृष्टपणे कामकाज करत असून गरोदर मातांची तपासणी आणि त्यांच्यावरील उपचार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने होतात. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील महिलांचा जिल्हा रुग्णालयावर आणि तेथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठा विश्वास असल्याचे हे लक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महिलेच्या तपासणीनंतर महिलेच्या गर्भात एकाच वेळी चार अपत्य असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाने अतिशय काळजी घेतली, तिच्याकडे विशेष लक्ष पुरविले. वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका यांनी घेतलेल्या काळजीमुळे या महिलेने चार गोंडस मुलांना जन्म दिला आहे. प्रथम मुलगी,दुसरी वेळ मुलगा, पुन्हा दोन मुलींना तिने जन्म दिला. त्यांची अनुक्रमे अकराशे, बाराशे तेराशे आणि सोळाशे ग्रॅम वजन आहे. जोखमीची प्रसूती सुखरूप पार पडल्याने ही बाब कौतुकाची ठरली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

या महिलेची गरोदर होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्या वेळी या महिलेला दोन जुळी झाली आहेत. यामध्ये एक मुलगा एक मुलगी झाली आहे. दुसऱ्या वेळी एक मुलगी झाली. तिसऱ्या वेळी या महिलेले चार अपत्यांना जन्म दिला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मेजर डॉ. राहुलदेव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सदाशिव देसाई, डॉ. तुषार मसराम या स्त्रीरोग तज्ञ यांच्यासह डॉ. नीलम कदम, डॉ. दिपाली राठोड पाटील यांनी परिश्रम घेतले.

काही कुटुंबांमध्ये जनुकीय रचना असते, त्याप्रमाणे अनेक कुटुंबांमध्ये जुळी जन्माला येतात.या कुटुंबियांची अधिक माहिती घेतली असता यापूर्वीही त्यांच्या घरात जुळी जन्माला आलेली आहेत. मात्र या महिलेला चार आपत्ये जन्मली आहेत. सध्या सर्व बाळांची प्रकृती उत्तम आहे. युवराज करपे, जिल्हा शलचिकित्सक, सातारा.