अकोला रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. वाशीम येथील रहिवाशी असणाऱ्या मायलेकींचा जीव थोडक्यात बचावला आहे. संबंधित मायलेकी अमरावतीहून मुंबईला जाणाऱ्या अंबा एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होत्या. मुलगी रेल्वेत व्यवस्थित चढली. मात्र, आईचा तोल गेला. मुलीने आपल्या आईला घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिला आईला रेल्वेत घेता आलं नाही.

तोल गेल्यामुळे संबंधित महिला रेल्वेखाली जाऊ लागली. यावेळी रेल्वेस्थानकावरील विक्रेत्याने प्रसंगावधान दाखवत, तातडीने त्यांना बाहेर ओढलं. यामुळे महिलेचा जीव वाचला. दरम्यान, आईचा जीव धोक्यात असल्याचं पाहून रेल्वेत चढलेल्या मुलीनेही प्लॅटफॉर्मवर उडी मारली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेबी खिलारे असं अपघातात बचावलेल्या ४२ वर्षीय महिलेचं नाव आहे, त्या वाशीम येथील रहिवाशी आहेत. बेबी खिलारे या बुधवारी रात्री मुंबईला जाण्यासाठी आपल्या मुलीसह अकोला रेल्वेस्थानकावर आल्या होत्या. पण तेवढ्यात अमरावतीहून मुंबईला जाणारी अंबा एक्स्प्रेस ट्रेन अकोला स्थानकावरून निघाली. यावेळी मायलेकींनी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रयत्नात मुलगी कशीबशी रेल्वेत चढली. पण आईला रेल्वेत चढता आलं नाही. रेल्वेचा वेग वाढल्याने त्यांचा तोल गेला. त्या रेल्वेखाली जाऊ लागल्या. तेवढ्यात रेल्वे स्थानकावरील विक्रेते शंकर स्वर्गे यांनी तातडीने महिलेच्या दिशेनं धाव घेतली आणि त्यांना ओढून बाहेर काढलं. स्वर्गे यांच्यामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, रेल्वेत चढलेल्या मुलीनेही रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उडी मारली. सुदैवाने दोघींचे प्राण वाचले आहेत. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.