scorecardresearch

नवीन महाबळेश्वर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम ; सातारा, जावळी, पाटण तालुक्यांतील ५२ गावांचा समावेश

राज्यातील प्रमुख गिरिस्थानांमध्ये महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा आदींचा समावेश होतो.

नवीन महाबळेश्वर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम ; सातारा, जावळी, पाटण तालुक्यांतील ५२ गावांचा समावेश
(संग्रहित छायाचित्र)

वाई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरशेजारीच नवीन महाबळेश्वर प्रकल्प नव्याने निर्माण केला जात आहे. सातारा, जावळी व पाटण तालुक्यांतील ५२ गावांचा समावेश या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवा आयाम मिळणार आहे.  नवीन महाबळेश्वर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले असून तीन वर्षांत आराखडा पूर्ण केला जाणार आहे.

नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावली तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामणोली, सावरी, तर पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी गावांचा समावेश असेल. नवीन महाबळेश्वरच्या परिसरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ५२ गावांतील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे शोधून त्यांचा विकास केला जाईल.

राज्यातील प्रमुख गिरिस्थानांमध्ये महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा आदींचा समावेश होतो. महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातून या ठिकाणी येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरिस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातून कोयना बॅक वॉटरच्या भागातील सुमारे ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निसर्गरम्य परिसर सह्याद्री उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगी लाभली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून (एमएसआरडीसी) सन २०१९ मध्ये नियुक्ती केली. नवीन महाबळेश्वरचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आराखडा मंजुरीसाठी पुढील तीन वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या