scorecardresearch

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांना मातृशोक

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचं निधन झालं आहे.

swamini savarkar passed away
स्वामिनी सावरकर यांचं निधन

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांच्या मातोश्री आणि हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष व ‘प्रज्वलंत’ मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे आज मंगळवारी २१ मार्च २०२३ या दिवशी पुणे येथे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात स्वामिनी सावरकर या त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत पृथ्वीराज यांच्या कुटुंबासह पुण्यात राहत होत्या. पती विक्रम सावरकर यांच्याबरोबर त्यांनी ‘प्रज्वलंत’ नावाच्या वृत्तपत्राचे कामही सांभाळले. यासोबतच त्यांनी मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही पाहिले. गेल्या आठवड्यात स्वामिनी सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

स्वामिनी विक्रम सावरकर यांचा जन्म नागपूरच्या गोखले यांच्या कुटुंबात १८ डिसेंबर १९३९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग गोखले असे होते. तर आईचे नाव मनोरमा गोखले असे होते. विवाहापूर्वीचे त्यांचे नाव मंदाकिनी गोखले होते. त्यांचा विवाह ११ मे १९५८ या दिवशी विक्रम सावरकर यांच्याशी झाला. तेव्हापासून त्यांनी सामाजिक आणि संपादन कार्यासह विविध क्षेत्रात काम केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:00 IST

संबंधित बातम्या