शिर्डी येथील साईबाबा संस्थानने साईभक्तांकरिता लाडूचा प्रसाद बनविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे गावरान तूप खरेदी केल्याचे आढळून आले असताना, याप्रकरणी कुठलीही दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी व राजेंद्र गोंदकर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यावर उद्या, सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
साईबाबा संस्थान भक्ताकरिता लाडूचा प्रसाद देते. त्याला भाविकांची मोठी मागणी आहे. लाडू बनविण्याकरिता वर्षाकाठी साठ ते सत्तर कोटी रुपयांचे गावरान तूप खरेदी केले जाते. पण तुपाचा दर्जा योग्य नसल्याने यापूर्वी लाखो लाडूची पाकिटे व तूप अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे लाडू व तूप नष्ट करण्यात आले होते. त्यामुळे कुलकर्णी व गोंदकर यांनी उच्च न्यायालयात साई संस्थानच्या तूप खरेदी प्रकरणातील अर्जात सहभागी होऊन उच्च दर्जाच्या तुपाचा आग्रह धरला. तसेच अमूल, गोकूळ, वारणा, महानंदा, हडसन या नामांकित कंपन्यांचे तूप खरेदी करावे, असा आग्रह धरला. यापूर्वी सन २०१२-१३ मध्ये संस्थानने पंचामृत डेअरी, मुंबई व मध्य प्रदेशातील चंबळ डेअरीचे कमी दराचे तूप खरेदी केले होते. पण ते निकृष्ट दर्जाचे निघाल्याने तूप नष्ट करावे लागले. तुपाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, असे संस्थानला न्यायालयाने सुचविले. पण त्याचा विचार न करता संस्थानने कमी दराच्या निविदा आल्याने अजंता राज प्रोटिन्स, आग्रा यांच्याकडून तूप खरेदी केले. या तुपाची तपासणी केली असता ते कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले.
साईसंस्थानच्या प्रसादालयाच्या प्रयोगशाळा तपासनिसाने १९ फेब्रुवारी रोजी अहवाल सादर केला. त्यामध्ये तुपाचा पुरवठा करणा-या अजंता कंपनीबद्दल अनेक त्रुटी आढळून आल्या. न्यायालयाने आदेश देऊनही उच्च दर्जाच्या तुपाची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे कुलकर्णी व गोंदकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, संस्थानने नामांकित ब्रँडचे तूप खरेदी करावे, अशी मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात विधिज्ञ सतीश तळेकर हे काम पाहात आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2015 रोजी प्रकाशित
साईबाबा संस्थानची निकृष्ट तूप खरेदी, उच्च न्यायालयात याचिका
शिर्डी येथील साईबाबा संस्थानने साईभक्तांकरिता लाडूचा प्रसाद बनविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे गावरान तूप खरेदी केल्याचे आढळून आले असताना, याप्रकरणी कुठलीही दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी व राजेंद्र गोंदकर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली अाहे.
First published on: 30-03-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worst ghee buy from saibaba sansthan petition in the high court