Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली याबाबत वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत, तसेच वेगवेगळे दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण हे त्यांचा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी भाजपात गेले की काय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चव्हाण आणि भाजपावरही निशाणा साधला. दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडूनही अशीच प्रतिक्रिया आली आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी दावा केला आहे की, भाजपाने श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं असावं. यशोमती ठाकूर म्हणाल्या, अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करत आहे. लोकांना घाबरवलं जात आहे, काँग्रेसच्या नेत्यांनाही घाबरवून भाजपात घेण्याचा प्रयत्न चालू आहे. भाजपामध्ये इतकी असुरक्षितता आहे की ते अजूनही सगळ्या पक्षातील लोकांना फोडून आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तिकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, मूळचे त्यांचे लोक कमी आणि बाहेरचेच लोक जास्त झाले आहेत. काहीही करून सत्तेत राहायचंच यासाठी त्यांची धडपड चालू आहे. त्यातच ब्लॅकमेल करून त्यांनी अशोक चव्हाण यांना आपल्याकडे घेतलं असेल. आमदार ठाकूर म्हणाल्या, अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले असले तरी आम्ही अजूनही इथे आहोत. आम्ही संपूर्ण आयुष्यभर सर्वधर्म समभाव या विचारासाठी, देशाचं संविधान टिकवण्यासाठी, धर्मनिरपेक्ष भारतासाठी लढत राहू. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही इथेच राहू. हे ही वाचा >> “…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला? श्वेतपत्रिकेचा आणि अशोक चव्हाण यांचा संबंध काय? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (८ फेब्रुवारी) लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित श्वेतपत्रिका सादर केली. अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या या श्वेतपत्रिकेत यूपीए आणि एनडीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची तुलना करण्यात आली आहे. या ५८ पानांच्या या श्वेतपत्रिकेत यूपीए सरकारच्या कार्यकाळाचे वाभाडे काढण्यात आले आहेत. ही श्वेतपत्रिका तीन भागांत विभागण्यात आली आहे. पहिल्या भागात, यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची स्थिती, दुसऱ्या भागात यूपीए सरकारच्या कार्यकाळातील घोटाळे आणि त्यांची सद्यस्थिती आणि तिसऱ्या भागात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी एनडीए सरकारने केलेले प्रयत्न, याची माहिती देण्यात आली आहे. श्वेतपत्रिका श्वेतपत्रिकेच्या दुसऱ्या भागात म्हणजेच यूपीए सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांबाबतच्या भागात आदर्श घोटाळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आलं होतं. त्यामुळे चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.