राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले व भारतीय जनता पक्षाचे नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या छुप्या युतीची दखल पक्षश्रेष्ठींनी न घेतल्याने सहकारातील ज्येष्ठ नेते व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पूर्वाश्रमीचे विश्वासू सहकारी, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. अद्याप त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नसला तरी स्वतंत्र विकास आघाडीची स्थापना केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीपासून गडाख हे पवारांचे समर्थक राहिले आहे. मात्र पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून डावलले जात असल्याचे शल्य त्यांना बोचत होते. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घुले यांनी विधानसभा निवडणूकीत छुप्या पद्धतीने गडाख यांच्या विरोधी काम केले. त्यामुळे गडाख यांचे चिरंजीव माजी आमदार शंकर गडाख यांचा पराभव झाला. जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर घुले व मुरकुटे यांच्यात छुपी युती तोडण्याचे विधान परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी प्रयत्न केले. त्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेले संचालक पुन्हा राष्ट्रवादीतच थांबले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांचा भाजपप्रवेश घुले यांनी रोखला होता. या सर्व घडामोडींमुळे गडाख हे अस्वस्थ होते.

विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत गटबाजीला वैतागून गडाख हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, पण पवारांनी त्यांना रोखले होते. घुले यांच्या पक्षविरोधी कारवायांबद्दल वारंवार नेत्यांकडे गडाख यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र सूचना देऊनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. वळसे यांनी गडाख यांची भेट घेऊन घुले यांच्याबद्दल असलेल्या तक्रारीची दखल घेतली. घुले यांच्याशी चर्चाही केली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला

सहकारातील एक ज्येष्ठ नेते कै. मारुतराव घुले पाटील व गडाख यांच्यात ४० वर्षे मत्रीचे संबंध होते. राजकारणात दोघांत अनेकदा संबंध ताणले पण ते तुटले नव्हते. आता मात्र त्यांच्या दुसऱ्या पिढीत मत्रीपर्व संपले आहे.

दगाफटका केला नाही.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पक्षस्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी नगर जिल्ह्य़ात पहिल्यांदा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे आम्ही कधीही दगाफटका केला नाही. शंकरराव गडाख यांचे गरसमज झाले आहे, असा खुलासा जिल्हाध्यक्ष घुले यांनी केला. त्यांनी मुरकुटे यांच्याशी असलेल्या छुप्या युतीवर बोलणे टाळले.