युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा सरकारला सल्ला; यवतमाळच्या ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात एक हजार दोनशे प्रश्नांचा भडिमार
राज्य शासनाने सुरू केलेल्या महापरीक्षा महापोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना सुरळीत सेवा द्यायची असेल तर पहिले राज्य भारनियमनमुक्त करा, नंतर ‘ऑनलाईन’ सेवा द्या, असा सल्ला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला. ‘ऑनलाईन’ हा प्रकार भयानक असून तो थांबवायला हवा, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. बुधवारी यवतमाळ येथे आयोजित ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महापोर्टलद्वारे होत असलेल्या फसवणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेची ‘जनआशीर्वाद’ यात्रा बुधवारी यवतमाळ जिल्ह्यत आली. दुपारी ३.३० वाजता आदित्य ठाकरे यांचे यवतमाळात आगमन झाले. स्थानिक पोस्टल मैदानात उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक ज्वलंत प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांना बोलते केले. बहुतांश प्रश्न हे स्पर्धा परीक्षा, विद्यापीठातील परीक्षेसंदर्भातील अनागोंदी, विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी बससेवेची असुविधा असे होते.
शासनाने २०१७ पासून स्पर्धा परीक्षेकरिता महापरीक्षा महापोर्टलद्वारे नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली. यात महाईसेवा केंद्रांवर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे. ग्रामीण भागात वीजच राहत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी शहरात यावे लागते. परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार वाढला. हा महाव्यापम घोटाळा आहे का? असा प्रश्न आशीष इंगोले या विद्यार्थ्यांने विचारला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ पद्धत बंद होऊन पुन्हा ‘ऑफलाईन’ पद्धतीने परीक्षा प्रक्रिया व्हावी, यासाठी प्रयत्न करू, असे उत्तर दिले. वीज भारनियमन बंद झाल्याशिवाय ‘ऑनलाईन’ पद्धती यशस्वी होणार नाही. त्यामुळे शासनाने प्रथम राज्यातील भारनियमन बंद करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
युवकांना राजकारणात उज्ज्वल भविष्य असून या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करावा, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुलींना आत्मसंरक्षण ही काळाची गरज आहे.
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी युवासेना आणि अभिनेता अक्षयकुमार वर्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोष सिद्ध झाल्यानंतर बलात्काऱ्यास चौकात फाशी द्यावी आणि अत्याचाराच्या प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या पाच वर्षांत युती सरकार अपयशी ठरले का, शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे आणखी किती दिवस खिशातच राहणार, शिवसेना भाजपचा पाठिंबा का काढत नाही, या अडचणींच्या प्रश्नांवर आदित्य यांनी विषयांतर करून हसत खेळत उत्तरं देत वेळ निभावून नेली. या कार्यक्रमात एक हजार दोनशे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले होते. यातील दहा प्रश्नांना ठाकरे यांनी प्रत्यक्ष उत्तरे दिली. उर्वरित प्रश्नांवर मुंबईतून उत्तरे पाठवू, असे सांगितले. या संपूर्ण यात्रेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा. भावना गवळी, आ. बालाजी किनीकर, पूर्वेश सरनाईक, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीशिवाय स्वस्थ बसणार नाही
नेर येथे आदित्य ठाकरे यांनी शिवाजी हायस्कूलमध्ये अचानक भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन तूर, सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत शिवसेना शेतकऱ्यांसोबत असून हमीभाव, कर्जमुक्तीशिवाय शांत बसणार नसल्याचे सांगितले. जनआशीर्वाद यात्रा मते मागण्यासाठी नसून शिवसेनेच्या हातून सदैव जनहिताचे काम व्हावे, यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. नेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आदित्य ठाकरे यांना बैलबंडीत बसवून नेण्यात आले तर नांगर भेट देऊ न स्वागत करण्यात आले.