आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दैवज्ञ शिक्षण समाज (बोर्डिग) येथे पतंजली योगपीठा तर्फे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते. आज जगभर जागतिक योग दिवस साजरा होत असताना, कोल्हापुरातही तो विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालये, सामाजिक, सांस्कृतिक संघटना आदींच्या मार्फत उत्साहात साजरा करण्यात आला.
पतंजली योग पीठातर्फे दैवज्ञ बोìडगमध्ये आयोजित कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. पतंजली योग पीठाच्या राज्य कार्यकारणी सदस्य व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शेखर खापडे यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना विविध आसनांबाबत मार्गदर्शन केले.
यामध्ये सहभागींनी उभ्या, बठय़ा आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले. मानव जातीच्या कल्याणासाठी ॠषीमुनींनी प्राणायमांचा आविष्कार केला. ताण तणांवाचे प्राणायमाच्या माध्यमातून व्यवस्थापण करता येते. ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य, उद्देश जाणून घेता येतो, अशी शिकवण यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमात पतंजली योग पीठाचे सदस्य, विविध पदाधिकारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
योग दिनामध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येकाने प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावावी. आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे, योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी केले.
उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा कार्यालय व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयेजित कार्यक्रमात ते बोलत होते. विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे उपस्थिती होते.
पतंजली योगपीठचे मारुती वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी अधिकारी व विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायामाचे प्रकार केले. यामध्ये उभ्या, बठय़ा आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासहन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, अर्धउष्ट्रासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, शवास या आसनांसह कपालभाती प्राणायाम केले.
या कार्यक्रमात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केद्र, जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनी व राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीतील राष्ट्रीय व राज्य स्तरावरील ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल प्रशिक्षक अजित पाटील, उदय पवार, क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक सुभाष पवार यांच्या सहकार्याने योगतज्ज्ञ डॉ. शरद हंसवाडकर यांनी ३ दिवस प्रशिक्षण दिले.
विशाल माळवी, प्रेमा पाटील, धीरज पाटील, गजानन चोथे या राष्ट्रीय खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga day celebrated with enthusiasm in kolhapur
First published on: 22-06-2015 at 04:05 IST