शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावरून फडणवीसांवर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.
भाजपाने तीन वर्षांपूर्वी एका भाषणात उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्याबद्दल काय म्हणाले होते ते दाखवलं आहे. याशिवाय राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेलं विधानही दाखवलं आणि शेवटी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या गळाभेटीचा फोटो दाखवत उद्धव ठाकरेंना प्रश्न केला आहे.
“उद्धव ठाकरे, आमचा DNA काढत बसण्यापेक्षा, तुमच्यात झालेला हा बदल नेमका कशामुळे झाला आहे? हे तपासून घ्या. उद्धव ठाकरे, तुम्ही जोड्याने मारायला निघाला होता राहुल गांधीना. पण, मिठी मारून आलात.” असं भाजपाने म्हटलं आहे.
याशिवाय, “सावरकरांचा अपमान करणारा बदलला नाही, निषेध करणारे मात्र बदलले.” “जोडे मारू म्हणण्याची भाषा करणारे, सावरकरद्रोह्यांना मिठ्या मारू लागले आहे.” असंही भाजपाने ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शन दिलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? –
“आधी देवेंद्र फडणवीसांचा वारसा कोणता, हेही एकदा बघावं. कारण आता सगळ्यांचा डीएनए एक म्हणतायत. पण त्यांचा राजकारणातला डीएनए नेमका कोणता हे शोधावा लागेल. कारण त्यांना सगळेच आदर्श त्यांचे वाटतायत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.