जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. दरम्यान, आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. “अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलनं केली. मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागं व्हावं आणि याविषयात जातीने लक्ष घालावं”, असं म्हणत संभाजीराजे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर हा निशाणा साधला आहे. त्याचसोबत, यावेळी त्यांनी मराठा समाजातील तरुणांना देखील एक आवाहन केलं आहे.

अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल!

“प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत. मात्र, माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागं व्हावं आणि याविषयात जातीने लक्ष घालावं. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. त्याच, प्रमाणे, समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी”, असं सांगत यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांप्रश्नी सरकारला धारेवर धरलं आहे. “आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहेत. आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. देशाचं भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणं हे राष्ट्रास हितकारक नाही”, अशी चिंता देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

वेळोवेळी आमच्या पदरी निराशाच!

“तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्यावतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केल्या. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी आमच्या पदरी निराशाच पडत आहे”, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती  यांनी यावेळी आपली तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे.

मी कळकळीची विनंती करतो की…!

संभाजीराजे यांनी यावेळी सदाशिव भुंबर या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करत मराठा तरुणांना असं कोणताही टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, “मी कळकळीची विनंती करतो की मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे. तुमचं धैर्य हीच  समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिंमत हारू नका. असा मार्ग निवडू नका. आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ”.

सुसाईड नोट

सदाशिव शिवाजी भुंबर या २२ वर्षीय तरुणाने “आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय”, अशी सुसाईड नोट लिहून मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सदाशिवने इलेक्ट्रीशियनचा कोर्स केला होता. तो एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. मात्र, मराठा आरक्षण नसल्यानं त्याला अपेक्षित अशी नोकरी मिळत नव्हती. दरम्यान, सदाशिवने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ओला दुष्काळ आणि मराठा आरक्षण नसल्याने आत्महत्या करत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.