पारनेर : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्थानिक वृत्त वाहिनीत निवेदिका असलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तरुणीचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी कान्हूर पठार— टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर कान्हूर पठार घाटात अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातासंदर्भात समजलेली माहिती अशी की, स्थानिक वृत्त वाहिनीत निवेदिकेचे काम करणारी संपदा सुरेश साळवे व तिचे वडील सुरेश साळवे टाकळी ढोकेश्वर येथून कान्हूर पठार येथे घरी परतत होते.कान्हूर पठार घाटाच्या सुरुवातीच्या वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने (क्रमांक एमएच १६ सीए ७२९७) साळवे यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच १६ बीआर ६१७८) धडक दिली. धडकेमुळे संपदा व तिचे वडील रस्त्यावर फेकले गेले. त्यात संपदाचा जागीच मृत्यू झाला तर सुरेश साळवे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. डंपरने दिलेली धडक एवढी जोरदार होती की, समोरून धडक झाल्यानंतर दुचाकी डंपरच्या मागच्या चाकांखाली जाऊन अडकली.

अपघात घडला त्यावेळी पारनेर पोलिसांचे पथक तहसीलदार ज्योती देवरे यांच्या समवेत टाकळी ढोकेश्वर परिसरात गस्त घालत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, उपनिरीक्षक हनुमंत उगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी जखमीला खासगी वाहनातून उपचारासाठी हलवले.अपघातानंतर डंपर चालक पळून गेला.

उपनिरीक्षकांचा काढता पाय

हप्तेखोरीमुळे पोलीस अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वाळू तस्कर व चालक उन्मत्त झाले आहेत.अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असा उपस्थित नागरिकांचा आक्षेप होता. नागरिकांचा रोष वाढू लागल्याने पोलीस निरीक्षक विजयकुमार बोत्रे आणि उपनिरीक्षक हनुमंत उगले यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young woman killed dumping illegal sand transport dumper ssh
First published on: 02-08-2021 at 02:49 IST