नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी राज्यात खास युवा साहित्य संमेलन भरवण्याचा मनोदय जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी व्यक्त केला.
जागतिक मराठी अकादमीतर्फे ‘शोध मराठी मनाचा’ हे संमेलन शनिवारपासून येथील खातू नाटय़मंदिरात सुरू झाले. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरून बोलताना सामंत म्हणाले की, राजकारणापलीकडे जाऊन मराठी भाषेचा विचार व्हायला हवा. या भाषेच्या विभागाचा पहिला राज्यमंत्री होण्याचे भाग्य मला लाभले. त्याचप्रमाणे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचा पहिला प्रस्तावही माझ्या कारकिर्दीत पाठवला गेला आहे. हे करत असताना मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चर्चा वेळोवेळी कानावर येत असते. अशा परिस्थितीत राज्याचे युवा धोरण आखताना खास युवकांचे साहित्य संमेलन भरवण्याचा मनोदय आहे. त्यातून किती लेखक निर्माण होतील, हे सांगता येणार नाही, पण किमान वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल असा विश्वास वाटतो.
संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक म्हणाले की, मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल काही जणांकडून चिंता व्यक्त केली जात असली, तरी या भाषेच्या मुळाशी अमृतानुभव आहे. संत वाङ्मयाचे खतपाणी तिला मिळाले आहे. त्यामुळे या भाषेला कोणताही धोका नाही. आजच्या युवा पिढीपुढे आव्हान भाषेचे नसून रोजगाराचे आहे. अशा वेळी या पिढीला योग्य दिशा दाखवण्याची, संधीची वाट करून देण्याची गरज आहे. या संमेलनातून तो हेतू निश्चितपणे साध्य होईल. म्हणून कोकणातील तरुणांनी ही संधी सोडू नये.
संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना संयोजक व ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे म्हणाले की, हे साहित्य संमेलन नाही. मराठी माणूस या संमेलनाच्या केंद्रस्थानी आहे. विविध क्षेत्रामध्ये कर्तबगारी बजावलेली नामवंत मराठी मंडळी येथे निमंत्रित करून युवा पिढीशी त्यांचा संवाद घडवावा, त्यातून या पिढीने प्रेरणा घ्यावी आणि वेगळी वाट चोखाळावी, हा या संमेलनाचा हेतू आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी उपस्थितांचे आभार मानताना नगर परिषदेतर्फे संमेलनाला १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्यापूर्वी पालकमंत्री सामंत यांनीही ५ लाख रुपयांची देणगी दिली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव, संयोजक उदयदादा लाड, जयंत प्रभुदेसाई इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात शनिवारी पहिल्या दिवशी ‘समुद्रापलीकडे’ या कार्यक्रमात परदेशामध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेल्या डॉ. अनिल नेरुरकर, डॉ. विजय देशपांडे इत्यादींनी अनुभव कथन केले. रविवारी याच स्वरूपाच्या अनुभवकथनाचे कार्यक्रम होणार आहेत.
परिषदेतर्फे या स्वरूपाचे संमेलन प्रथम २००२ मध्ये नागपूर येथे आयोजित करण्यात आले. त्यानंतर नाशिक, नगर, पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. कोकणात हे संमेलन प्रथमच होत आहे.