अहिल्यानगर : जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ८८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. हरकती दाखल करण्याचा काल, सोमवारी शेवटचा दिवस होता. बहुसंख्य हरकती या गट व गणातून गाव वगळणे किंवा समावेश करणे अशाच स्वरूपाच्या आहेत.
सर्वाधिक ४० हरकती जामखेड तालुक्यातून दाखल झाल्या आहेत. १४ जुलैला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा जाहीर केला होता. त्यावर आजपर्यंत हरकती व सूचना देण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये ८८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीच्या १५० गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे व नकाशा जाहीर केला होता. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा जाहीर केला होता. झिकझॅक पद्धतीने हा आराखडा तयार करण्यात आला. अकोल्याच्या समशेरपूरपासून ते जामखेडच्या खर्डापर्यंत असा हा प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा जाहीर झाला.
तालुकानिहाय हरकतींची संख्या पुढीलप्रमाणे: अकोले- ८, संगमनेर- ६, कोपरगाव- ३, राहाता- ३, अहिल्यानगर- ९, राहुरी- १, पारनेर-१३ श्रीगोंदा- १, कर्जत- ३ व जामखेड- ४०. श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या चार तालुक्यांतून एकही हरकत दाखल झाली नाही. अर्थात एकाच गट व गणासाठी अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जामखेडमध्ये तक्रारीची संख्या वाढली आहे.
गट व गणास जोडलेले गाव वगळावे किंवा जोडावे, तसेच पूर्वी जे होते तेच ठेवण्यात यावे, दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून, एक गाव एका गणात, तर दुसरे गाव दुसऱ्या गणात गेले आहे. ते एकाच गणात ठेवावे, अशा स्वरूपांच्या हरकती दाखल आहेत.
सुनावणी नाशिकला विभागीय आयुक्तांसमोर
प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर नाशिक येथे विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. १८ ऑगस्टला अंतिम प्रभागरचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर केली जाणार आहे.