जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षणावर सरकार कोटय़वधीचा खर्च करीत आहे. मात्र, खर्चाच्या तुलनेत जि. प. च्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीची लागण सर्वच शाळांना झाली आहे. परिणामी जि. प. च्या शाळांची अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.
सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून मोफत शिक्षणाचा आटापिटा केला जात आहे. दुसरीकडे जि. प. शाळांच्या गुणवत्तेचा टक्का हळूहळू कमी होऊ लागला आहे. जिल्ह्य़ात जि. प. च्या अनेक शाळा आहेत. यातील बोटावर मोजण्याइतक्याच शाळा गुणवत्ता व विद्यार्थी संख्येच्या बाबतीत पुढे आहेत. इतर शाळांच्या गुणवत्तेसह पटसंख्येविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बीड शहरातील शिवाजी चौकात असलेली जि. प. कन्याशाळेची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. प्रशस्त जागा, अनुभवी शिक्षक असूनही येथे विद्यार्थीसंख्या नगण्य आहे. एकेकाळी २० ते २५ वर्गखोल्या असलेली ही शाळा विद्यार्थिनीसाठी अपुरी पडत होती. मात्र, आज याच शाळेत ५ ते ६ वर्गखोल्यांत विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. उर्वरित वर्गखोल्यांमध्ये जि. प. प्राथमिक विभागाचे कार्यालय स्थलांतरित केले आहे.
बीड तालुक्यातील पाली, तसेच चौसाळा येथील जि. प. शाळा आजही गुणवत्ता व पट टिकवून आहेत. मात्र, भविष्यात इंग्रजी शाळांच्या आक्रमणामुळे या शाळेलाही गळतीची लागण होऊ शकते. जि. प. कडून शिक्षणावर कोटय़वधीचा खर्च होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असताना विद्यार्थी व पालकांमधून मात्र यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जि. प. शाळांऐवजी खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. जि. प. शाळा मात्र विद्यार्थीसंख्येअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. केवळ शिक्षकांची पदे वाचवायची, म्हणून जि. प. शाळा चालवायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
विद्यार्थी गळतीमुळे जि. प. शाळांचा ‘टक्का’ घसरला!
जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षणावर सरकार कोटय़वधीचा खर्च करीत आहे. मात्र, खर्चाच्या तुलनेत जि. प. च्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीची लागण सर्वच शाळांना झाली आहे.

First published on: 15-03-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp school percentage down due to students leakage