News Flash

पाश्र्व आणि संगीत

१९२७ सालचा ‘जॅझ सिंगर’ आणि १९३१ सालचा ‘आलमआरा’ हे अनुक्रमे अमेरिका आणि भारताचे पहिले बोलपट.

आपल्या आयुष्यात एखाद्या आनंदाच्या किंवा दु:खाच्या क्षणी त्या- त्या प्रसंगाला साजेसं संगीत प्रत्यक्षात मागे वाजत असतं का हो? सण-समारंभ सोडले तर वैयक्तिक आयुष्यात अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरं जात असताना नेमकं तेव्हाच प्रसंगानुरूप संगीत वाजल्याचं मला तरी आठवत नाही. लहानपणी वडिलांनी मारल्यावर (माझे बाबा काही वेळा चोपत असत मला.) माझ्या कानावर कधीही व्हायोलिन किंवा सारंगीचे करुण सूर पडले नाहीत! कॉलेजमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत माझं नाव बघून संतूर किंवा सतारीचा झाला वाजल्याचंही आठवत नाही! थोडक्यात काय, एरवी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही बऱ्या-वाईट प्रसंगात आपल्याला पाश्र्वसंगीत ऐकू येत नाही. पण नाटक, चित्रपट, मालिका, जाहिराती या सगळ्या माध्यमांमध्ये सर्रास पाश्र्वसंगीत वापरलं जातं. आणि ते अत्यंत परिणामकारकही असू शकतं. पानभर संवादातून जे भाव पोहोचणार नाहीत, ते पाश्र्वसंगीताच्या एका सुरावटीमधून किंवा एका ध्वनीमधून पोहोचू शकतात. पण पाश्र्वसंगीत कसं कम्पोज करायचं, कुठे आणि कसं वापरायचं, याचं रीतसर शिक्षण देणारा कोर्स जगात कुठेही नाही! एखादं वाद्य वाजवण्यापुरतं किंवा गाण्यापुरतं संगीत शिकता येतं. पण गाण्याला चाल लावणं आणि पाश्र्वसंगीत कम्पोज करणं, हे मात्र शिकायची सोय नाही. इतर संगीतकारांनी केलेलं काम बघत आणि स्वत:च्या प्रतिभेला चुचकारतच या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात.
‘चित्रपटात पाश्र्वसंगीत वापरण्यामागचा उद्देश काय असतो?’ असा प्रश्न मी माझ्या वर्कशॉप्समध्ये किंवा लेक्चर्समध्ये विचारतो, तेव्हा ‘भावना अधोरेखित करण्याकरता’ किंवा ‘मूड क्रिएट करण्याकरता’ असं उत्तर सर्वाधिक लोक देतात. जे बरोबरच आहे. पाश्र्वसंगीताची योजना करण्यामागची मूळ कारणं हीच आहेत. पण त्यापलीकडे जाऊन अनेक गोष्टींचा विचार बॅकग्राऊंड म्युझिक करताना करावा लागतो. अर्थात भारतीय चित्रपटांमध्ये वाजणारं पाश्र्वसंगीत आणि पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये वाजणारं पाश्र्वसंगीत यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तो समजण्याकरता आपण जरा भूतकाळात डोकावून पाहू या.
मुळात चित्रपटांमध्ये ध्वनिमुद्रित संवाद येण्याआधी फक्त पाश्र्वसंगीतच वाजत असे. कारण चित्र आणि ध्वनी हे एकत्रित करण्याचं तंत्रज्ञान तोपर्यंत प्रगत झालं नव्हतं. लुमिये बंधूंनी १८९५ साली तयार केलेल्या मूक चित्रपटात तर चित्रपट चालू असताना पिटात वादक बसून समोरच्या प्रसंगाला साजेसं संगीत वाजवत असत. त्यानंतर अनेक वर्षे ही प्रथा चालू राहिली. चित्रपटातून जिवंत अनुभव देण्याचा ध्यास घेतलेल्या आर. सी. ए. आणि वॉर्नर ब्रदर्ससारख्या कंपन्यांच्या अथक परिश्रमांनंतर ध्वनी आणि चित्र यांचं एकत्रीकरणही साध्य झालं. साधारण १९०८ पासून ध्वनी आणि चित्र एकत्र पाहता, ऐकता येऊ लागलं. चार्ली चॅप्लिन, लॉरेल-हार्डी, बस्टर कीटन यांच्या संवादरहित, पण पाश्र्वसंगीत असलेल्या अनेक चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. या चित्रपटांमध्ये संवादांच्या पाटय़ा असत. टॉम अ‍ॅंड जेरी, मिकी माऊस, डोनाल्ड डक यांच्या डायलॉगविरहित कार्टून फिल्म्समध्ये तर संगीत आणि ध्वनीच धमाल उडवण्याकरता वापरले गेले.
१९२७ सालचा ‘जॅझ सिंगर’ आणि १९३१ सालचा ‘आलमआरा’ हे अनुक्रमे अमेरिका आणि भारताचे पहिले बोलपट. यानंतरच्या काळात संवादांनी फ्रंट सीट घेतली आणि पृष्ठभागी असणारं संगीत ‘पाश्र्व’ झालं. अर्थात चित्रपटांमधल्या गाण्यांचं महत्त्व कमी झालं नाही. भारतीय चित्रपटांमध्ये ते आजही कमी झालेलं नाहीये. कारण लोकसंगीताची आणि संगीत नाटकांची भारताला खूप मोठी परंपरा लाभली आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. भारत हा एकमेव देश असावा, जिथे चित्रपटाचा विषय कुठलाही असो; नट-नटय़ा प्रत्यक्ष पडद्यावर गाताना दिसतात! ‘म्युझिकल’ या प्रकारात मोडणारा चित्रपट नसेल तर बॉलिवूड सोडून जगात बनणाऱ्या इतर सर्व चित्रपटांमध्ये गाणी ‘पाश्र्व’संगीत म्हणूनच वाजतात. म्हणजेच सिनेमातली पात्रं प्रत्यक्षात तोंड हलवून (लिप सिंक) गाणी म्हणताना आपल्याला दिसत नाहीत. अर्थात ‘सिंगिंग इन द रेन’ किंवा ‘वेस्ट साइड स्टोरी’सारख्या अफलातून म्युझिकल्समधली पात्रं तुम्हाला गाणी म्हणताना दिसतील. पण ‘टॅक्सी ड्रायव्हर’मधल्या रॉबर्ट डी’निरोला किंवा ‘डर्टी हॅरी’ क्लिंट ईस्टवुडला तुम्ही झाडाच्या मागे फिरत गाणी म्हणताना पाहिलं आहे कधी? मॅट डेमॉन, लिओनाडरे डी काप्रिओला पावसात भिजत गाणं म्हणणं जमलं नसावं बहुधा! आमचे राज कपूर- बच्चन- शाहरुख चोर असोत वा पोलीस, अक्षय-सलमान हमाल असोत वा उद्योगपती- त्यांना हीरोइन्सबरोबर गाणी म्हणत नाचताना, बागडताना आपण कायम बघत आलो आहोत! दुष्ट खलनायकांच्या तोंडीदेखील गाणी घालण्याची किमया आपल्या चित्रपटांमध्ये बघायला मिळते! असो. हे विषयांतर होतंय!! तर मुद्दा हा, की गाणी आपल्या चित्रपटांचा अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटांमध्ये ‘संगीतकार’ म्हटलं, की तो ‘गाणी करणारा’ असंच समीकरण आहे. पण पाश्चात्त्य देशांमध्ये चित्रपटाचा संगीतकार हा ‘पाश्र्वसंगीत’ करणाराच असतो.
चित्रपटामध्ये संगीताचा योग्य वापर करण्याकरता संगीतकाराला चित्रपटकलेची आणि दिग्दर्शकाला संगीताची जाण असणं आवश्यक आहे. आपल्याकडे साधारण ६० च्या दशकापर्यंतच्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शकांचं वर्चस्व होतं. व्ही. शांताराम, बिमल रॉय, सत्यजीत रे, मेहबूब खान, गुरुदत्त, विजय आनंद, राज खोसला यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांच्या केवळ नावावर चित्रपट चालायचे. या मंडळींची तांत्रिक बाजू सफाईदारपणे हाताळण्याची हातोटी होती आणि निर्मितीमूल्यंदेखील उच्च दर्जाची असायची. त्यांच्या टीममधले तंत्रज्ञही अत्यंत कुशल असत. ‘प्रभात’च्या सर्व चित्रपटांमध्ये विष्णुपंत दामले यांनी केलेलं ध्वनिरेखाटन ऐकून आजही अचंबित व्हायला होतं. ‘कुंकू’मध्ये केशवराव भोळे यांनी पाश्र्वसंगीत म्हणून विविध ध्वनींचा केलेला वापर केवळ लाजवाब! या चित्रपटांमध्ये गाणीही होती; पण शांतारामबापूंसारखा माध्यमावर पकड असलेल्या दिग्दर्शकामुळेच पाश्र्वसंगीताला आणि पाश्र्वध्वनींना विशेष महत्त्व होतं. सत्यजीत रे हे स्वत: माहीर संगीतकार होत. त्यांनी पं. रविशंकर यांना घेऊन केलेल्या चित्रपटांमधलं पाश्र्वसंगीत आणि ध्वनिपरिणाम (साऊंड इफेक्टस्) सिनेमा ध्वनितंत्राविषयी खूप काही शिकवून जातात. वर उल्लेख केलेल्या दिग्दर्शकांपैकी सर्वजण स्वत: निर्माते होते. त्यामुळे त्यांनी तांत्रिक बाबींना आणि इतर निर्मितीमूल्यांना कधीही कमी लेखलं नाही.
७० च्या दशकामध्ये या क्षेत्रात पैसा, ग्लॅमर आणि मानमरातब आहे हे कळल्यावर रोजंदारी कामगारांपासून नट-नटय़ा आणि पैसेवाल्यांपर्यंत अनेक लोक या मायानगरीकडे आकृष्ट झाले. सिंधी, पंजाबी निर्माते निव्वळ धनाढय़ आणि चित्रपटकलेच्या आणि तंत्राच्या बाबतीत अजाण असल्या कारणाने चित्रपटाचा फोकस दिग्दर्शकांवरून नट-नटय़ांवर शिफ्ट होऊ लागला. (अर्थात् या विधानाला अपवाद ठरतील अशी काही उदाहरणंही होती.) आपल्याकडचा प्रेक्षकवर्गही ‘सुपरस्टार्स’कडे व थिल्लर नाचगाण्यांकडे ओढला गेला आणि ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर उत्तर भारतातून आलेल्या बिझनेस माइंडेड निर्मात्यांनी तद्दन धंदेवाईक चित्रपट बनवण्याचा सपाटाच लावला. हळूहळू दिग्दर्शकांचं महत्त्व कमी होऊ लागलं. निर्मात्यांच्या पैशाचा सगळा ओघ नटांकडे वाहू लागला. तांत्रिक बाबींमध्ये चालढकल व्हायला लागली. पाश्र्वसंगीताचं मोल तर केवळ धक्कातंत्रापुरतं आणि रिकाम्या जागा भरण्यापुरतं उरलं.
एवढं सगळं पाल्हाळ लावायचं कारण हे, की आपल्या चित्रपटकर्त्यांनी एकेकाळी तांत्रिकदृष्टय़ा ज्या उंचीवर भारतीय चित्रपट नेऊन ठेवला होता, त्याचा या काळातल्या बहुसंख्य अडाणी, नाठाळ निर्मात्यांमुळे आणि अनेक बोगस, तंत्रशून्य दिग्दर्शकांमुळे ऱ्हास झाला. नटांच्या तुलनेत कॅमेरा, एडिटिंग वगैरेसारख्या चित्रपटातल्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी गौण ठरवल्या गेल्या. मग पाश्र्वसंगीताचं काय घेऊन बसलात राव? एकतर पाश्र्वसंगीत चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत सगळ्यात शेवटी येतं. तोपर्यंत नटांवर आणि शूटिंगवर पैसे खर्च करकरून निर्मात्याचा जीव मेटाकुटीला आलेला असे! त्यामुळे पाश्र्वसंगीत स्वस्तातच उरकायच्या मागे निर्माते असत. पाश्र्वसंगीत पद्धतशीर आणि चांगल्या प्रतीचं करण्यामागचा फायदाही अनेक निर्मात्यांना कळत नसे. कारण पाश्र्वसंगीताच्या रेकॉर्ड्स निघत नाहीत. ‘बेला के फूल’मध्येही ते कधी वाजत नाही. आणि पिकनिकला जाताना बसमध्ये कोणी पाश्र्वसंगीताच्या भेंडय़ाही खेळत नाहीत. थोडक्यात काय, पाश्र्वसंगीताला गाण्यांसारखी लोकमान्यता नाही. आणि त्याचा थेट आर्थिक फायदा निर्मात्यांना दिसत नाही! भावनाच अधोरेखित करायची असेल, किंवा मूडच क्रिएट करायचा असेल, तर सॅडला सॅड आणि हॅप्पीला हॅप्पी मूडचं काहीही चिकटवलं तरी काय फरक पडतो? अशी साधारण अजाण निर्मात्यांची धारणा असे. याचाच परिपाक म्हणून नव्याने पाश्र्वसंगीत रेकॉर्ड न करता, तयार असलेलंच, ज्याला ‘स्टॉक म्युझिक’ म्हणतात, ते वापरण्याची प्रथा सुरू झाली. कारण हा उपाय अत्यंत कमी खर्चीक आणि वेळ वाचवणारा होता. स्टॉक म्युझिकच्या वापरामुळे तेच तेच म्युझिक अनेक चित्रपटांमध्ये ऐकू येऊ लागलं. पण जनताजनार्दनाला त्यामुळे काही फरक पडतोय असंही दिसून आलं नाही. त्यामुळे पाश्र्वसंगीत हे चित्रपटातलं अत्यंत महत्त्वाचं पात्र ठरू शकतं, याचा विसर अनेक फिल्ममेकर्सना पडला..
राहुल रानडे rahul@rahulranade.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 1:01 am

Web Title: effective way of learning background music
Next Stories
1 M बोले तो.. (भाग २)
2 ‘M’ बोले तो..
3 गुरुबिन ग्यान.. भाग २
Just Now!
X