28 January 2020

News Flash

क्षणस्थ

कधी देवाच्या द्वारावरचा ‘तो’ एक क्षण पकडणं म्हणजे मोक्ष तर कधी मोहाचा क्षण सोडणं म्हणजे मोक्ष.

कधी देवाच्या द्वारावरचा ‘तो’ एक क्षण पकडणं म्हणजे मोक्ष तर कधी मोहाचा क्षण सोडणं म्हणजे मोक्ष. घडतं ते सगळं क्षणातच.. म्हणूनच ऋषी, मुनी, विचारवंत ‘क्षणस्थ’ व्हायला सांगतात. थोडं साहित्यिक भाषेत सांगायचं तर पुढे पुढे सरकत जाणारे क्षणबिंदू म्हणजे जीवन.. आणि प्रत्येकाच्या क्षणबिंदूंची संख्या वेगळी. कुणाच्या वाटय़ाला किती क्षण आहेत हे आपल्याला माहीत नाही.. म्हणून वाटय़ाला आलेला प्रत्येक क्षण जगणं, अनुभवणं म्हणजे क्षणस्थ होणं.

कार्यक्रम मस्त रंगला होता, सुरांची वलयं कानाला सुखावत होती, गायकाची, वादकांची स्वरमग्नता डोळ्यांना लोभस वाटत होती.. सगळं भान हरपून गेलं होतं. पण माझ्या पुढच्या ओळीत बसलेल्या माणसाला काही चैन पडत नव्हती. त्याची सतत चुळबुळ चालली होती. ऊठबस चालली होती. कधी हा हात वर तर कधी तो.. कधी डाव्या हाताच्या माणसावर कले तर कधी उजव्या बाजूच्याच्या हातावर.. मध्येच अर्धवट उठून उभं राहाणं.. जिवाला चैन नव्हती त्याच्या.. तो सगळा कार्यक्रम त्याच्या छोटय़ाशा मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी सगळी धडपड चालली होती.. संवादिनीवादकाची बोटं ते तबलावादकाचे कपाळावर हलणारे केस.. इथपर्यंत सगळं त्याला पकडायचं होतं म्हणून सगळी धावपळ.. त्याच्या या सगळ्या हालचालींचा हळूहळू त्रास व्हायला लागला, ऐकतानाची एकतानता भंगायला लागली, त्याच्या हलण्याप्रमाणे मागे बसलेल्या आम्हालाही आमच्या माना हलवाव्या लागत होत्या.. वाटलं एकदा स्पष्ट सांगून टाकावं की, ‘आम्हीही कार्यक्रमाला आलो आहोत आणि तो शांतपणे ऐकण्याचा आमचाही हक्क आहे.. आणि संयोजक चित्रीकरण करताहेत. तुम्ही नाही केलंत तरी चालेल.’ पण मनात आलं, म्हणून लगेच असे शब्द ओठांवर येतात का? (म्हणजे ‘आज मी अमक्या अमक्याला असं झापलंय..’ असं आपण घरच्या मंडळींना जेव्हा जोरदार आविर्भावात सांगत असतो तेव्हा घरच्या मंडळींनाही माहीत असतं की हा आवेश आणि आवेग फक्त घरात आहे, प्रत्यक्ष तिथे रागाने चार शब्द काही उच्चारलेले नाहीत.) तर त्याला सांगावं असं सारखं मनात येत होतं, पण आपल्यातला भिडस्तपणा नेहमीच विजयी होतो.. माझ्यासारखेच आणखी तीन-चार जण त्याच्या या उद्योगाने त्रस्त झाले होते, पण जाऊ  दे ना, करू दे त्याला काय करायचं ते हा मध्यमवर्गीय खाक्याच शेवटी खरा ठरला.

त्या दरम्यान, प्रेक्षक म्हणून त्या कार्यक्रमावरची माझी पकड सुटली होती, तिकडे तबला अचूक सम पकडत असला तरी माझी सम आणि लय पूर्ण हरवली होती. कार्यक्रम संपला तसा ‘जितं मया’ असा भाव त्या माणसाच्या चेहऱ्यावर होता. मन उगाच स्वत:ला समजावत होतं.. असू दे याच्या घरी कोणी वयस्क व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती असेल आणि तिला कार्यक्रमाला येता येत नाही म्हणून हा सगळा कार्यक्रम चित्रित केला असेल त्याने.. तेवढय़ात त्याने त्या कार्यक्रमाला आलेल्या मित्राला विजयोन्मादाने सांगितलं, ‘‘हा शूट केलेला चाळिसावा कार्यक्रम.. आता एवढं रेकॉर्डिग आहे आपल्याकडे. कधी पण सांग.. हा उस्ताद, तो पंडित, त्या विदुषी.. हवं त्यांचं माग आपल्याकडे.. आता मस्तपणे ऐकीन घरी जाऊन.’’ अच्छा! म्हणजे हा सगळा चित्रीकरण उपद्व्याप हा स्वत:कडचा संग्रह वाढवण्यासाठी. खरं तर तो आपल्याकडे आहे हा मोठेपणा मिरवण्यासाठी आणि भविष्यकाळात कधी ऐकावंसं वाटलंच तर म्हणून होता तर. खरं तर त्या गायकाची, वादकाची, वक्त्याची, संयोजकांची चित्रीकरणासाठी रीतसर परवानगी घ्यायला हवी, पण कॅमेराधारी मोबाइल संस्कृतीत ही सुसंस्कृतता मोडत नाही. छे! इतकी श्रवणीय मैफल, पण आपण काही एकाग्रतेने ऐकू शकलो नाही याची खंत वाटत होती. भिडस्त मन म्हणत होतं, आपण एकाग्र होऊ  शकलो नाही ही आपली चूक, पण तरी मनात आलं, आनंद हा असा कैद करून ठेवता येतो? त्या त्या क्षणाचा आनंद तिथल्या तिथे घ्यायला हवा ना.. आसमंतात पसरलेले स्वर, त्या स्वरांनी मनात उठलेले भावतरंग, कधी जुन्या आठवणींनी मनात केलेली गर्दी तर कधी आलेली निर्विकार अवस्था.. ‘गाणार वाजविणार तैसेची ऐकणार’ साऱ्यांना एकाच वेळी आलेली तल्लीनावस्था.. तो स्वरानंद, ती ब्रह्मानंदी लागलेली टाळी.. हे सगळं त्या क्षणाचं वैभव, त्या क्षणाचा आनंद तो त्या क्षणीच नको का अनुभवायला? ..पण हे क्षण आपण असे हातचे दवडतो. बरं, पुन्हा ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी म्हणून चित्रित करून ठेवलेला ठेवा आपण खरंच नंतर कितीवेळा पाहतो? आपल्या घरच्या लग्नाची डीव्हीडीसुद्धा पूर्ण पाहिली जात नाही. फक्त मनाला समाधान की ‘माझ्याकडे आहे..’ नाही तरी घरातल्या बऱ्याचशा वस्तू या फक्त ‘आहेत’ याच शीर्षकाखाली येतात. त्यातच

ही भर..

शिवाय काही गोष्टी या घरी एकटय़ाने ऐकण्यात रंगत नसते. सगळ्यांनी एकत्र ऐकण्यात, एकत्र दाद देण्यात, एकाच वेळी मान डोलावण्यात, तबलावादकाने सम गाठली तरी ती आपणच गाठलीय अशा आनंदात हात हलवण्यात, ‘ये बात’ ही अस्फुट दाद सहप्रेक्षकाच्याही डोळ्यात बघण्यात, ती रंगत असते. अशी मैफल आपला कॅमेरा नाही अनुभवू शकत, आपलं एकाग्र झालेलं मन ते सगळं अनुभवू शकतं आणि स्मृतीपटलावर चित्रितही करू शकतं.. एकदा स्मृतीपटलावर चित्रित झालं की मग आपण ते कधीही पुन्हा मन:चक्षूंनी पाहू शकतो. प्रवासात किंवा हुरहुर लावणाऱ्या एखाद्या संध्याकाळी किंवा अगदी, गाडीची वाट पाहात रेल्वे स्थानकावर.. कुठेही, कधीही आणि कुठल्याही उपकरणाशिवाय. ‘वा!’ काहीही घडत नसताना माझे आजोबा अशी मधूनच दाद द्यायचे. विचारलं तर म्हणायचे, ‘बालगंधर्वाच्या ‘ममा आत्मा गमला’मधली ‘ती’ जागा आठवली.’ आश्चर्य वाटायचं ..आजोबांनी नाटक पाहूनही तीस एक र्वष लोटली असतील, मग लक्षात यायचं की त्यांच्या स्मृतीमंचावर आत्ता त्या नाटकाचा खेळ सुरू आहे. त्या क्षणांचा आनंद त्या क्षणी लुटला की असे नंतरचे ही किती तरी क्षण आनंदाचे होतात.

बा. भ. बोरकर म्हणतात, ‘प्रत्येक क्षणाचा एक मध असतो, तो तेव्हाच चाखायला हवा.’ हा क्षण नंतर अनुभवू म्हटलं तर जमत नाही.. आत्ता .. इथे ..नाऊ  अ‍ॅण्ड हीअर.. नाही तर.. नेव्हर.. हीच क्षणांची परिभाषा.. ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ सांगताना माऊलींच्या मनात कदाचित हीच परिभाषा असेल. देवाच्या द्वारी उभा राहून त्या एका क्षणाचा पुरता अनुभव घेणं, त्या क्षणात पूर्ण मन ओतणं, आपल्या स्वत:चा विसर पडणं, म्हणजे एका अर्थाने मुक्तीच! अशा मुक्तीसाठी एक क्षण पुरतो. कधी देवाच्या द्वारावरचा तो एक क्षण पकडणं म्हणजे मोक्ष तर कधी मोहाचा क्षण सोडणं म्हणजे मोक्ष. घडतं ते सगळं क्षणातच.. म्हणूनच ऋषी, मुनी, विचारवंत ‘क्षणस्थ’ व्हायला सांगतात. हातावर घडय़ाळ आपण बांधत असलो तरी क्षण आपल्याला बांधून ठेवतात. थोडं साहित्यिक भाषेत सांगायचं तर पुढे पुढे सरकत जाणारे क्षणबिंदू म्हणजे जीवन.. आणि प्रत्येकाच्या क्षणबिंदूंची संख्या वेगळी. कुणाच्या वाटय़ाला किती क्षण आहेत हे आपल्याला माहीत नाही.. म्हणून वाटय़ाला आलेला प्रत्येक क्षण जगणं, अनुभवणं म्हणजे ‘क्षणस्थ’ होणं.

कबीरांची गोष्ट आठवते. एकदा दोन माणसं खूप मोठय़ाने भांडत होती. कबीर तिथूनच चालले होते. दोन माणसं भांडत असताना तिसऱ्याने खरं तर तिथे थांबू नये पण तरीही कबीर तिथेच उभे राहिले. नुसते उभे नाही राहिले तर थोडय़ा वेळाने गालातल्या गालात हसायला लागले. भांडण वाढायला लागल्यावर मोठमोठय़ाने हसायला लागले. इतके की, त्यांचा आवाज ऐकून भांडणारे थांबले. ‘‘भांडतोय आम्ही, इथे हसण्यासारखं काय आहे?’’ त्यातल्या एकाने विचारलं. कबीर म्हणाले, ‘‘अरे तू आत्ता जे म्हणालास ना त्यावरच हसायला येतंय मला. तू काय म्हणालास याला.. उद्या तुला नाही धडा शिकवला तर नाव बदलून टाकेन. म्हणालास ना? एक म्हणजे ज्या नावाचा तुला एवढा अभिमान आहे ते तू ठेवलेलंच नाहीस आणि दुसरं, तू धडा कधी शिकवणार? उद्या! एवढा विश्वास आहे तुला तुझ्या पुढल्या क्षणावर?

पाव पल कि सुधी नही, करे कल का साज

काल अचानक मारसी ज्यो तितर को बाज..’’

क्षणात डोळे उघडतात. हाती आलेल्या क्षणाचं महत्त्व क्षणात पटतं.. ज्याला कायम क्षय असतो, तो क्षण ..अशी व्याख्या सुचून जाते.

‘कर्मणि एव अधिकार: ते’च्या चालीवर ‘उपलब्धे क्षणे एव अधिकार: ते’ आत्ताच्या क्षणावरच काय तो आपला अधिकार याची जाणीव होते.

पुन्हा पहिल्या प्रसंगाकडे.. भविष्यातले क्षण आनंदित करण्यासाठी बाहेर दुकानात गायकांच्या, वादकांच्या सीडीज उपलब्ध आहेत. त्या मैफिलीच्या काळात मात्र गायकाने अर्थगर्भ, स्वरगर्भ केलेल्या क्षणांचा समरस होऊन आस्वाद घेणं हेच खरं.. गायकसुद्धा त्या क्षणांचाच अनुभव घेऊन कला सादर करत असतो. क्षण बदलले की त्याचा आविष्कारही बदलणार आहे. मग या क्षणी सुचलेलं पुढच्या क्षणी नाही. कलावंत, रसिक, तो स्वर आणि ती मैफिल सारंच ..क्षणस्थ!

धनश्री लेले dhanashreelele01@gmail.com

First Published on March 11, 2017 1:25 am

Web Title: article by dhanashree lele
Next Stories
1 अलगद
2 सहज भाव
3 पक्व
Just Now!
X