28 January 2020

News Flash

आनंदयात्रा

मय्यसर डोर से एक मोती झड रहा है

मय्यसर डोर से एक मोती झड रहा है

तारीखों के जीने से दिसम्बर उतर रहा है

काळाच्या माळेतला एक एक वर्षरूपी मोती घरंगळत चाललाय.. खरंतर रोजच तो घरंगळतो.. मावळणारा सूर्य रोजच एक मोती घेऊन जातो.. आयुष: खंडं आदाय रवि: अस्तं गमिष्यति.. पण वर्ष संपताना मात्र त्याची जाणीव प्रकर्षांने होते. आता तर सुरू झालं ना वर्ष.. आत्ता कुठे २०१७ हा आकडा सवयीचा झाला होता.. असं वाटत असतानाच नवीन वर्ष समोर येऊन उभं राहतं..

खरंतर ३१ डिसेंबरनंतर येणारा प्रत्येक १ जानेवारी हा दिवस नेहमीसारखाच. नवीन वर्षांचा नवीन दिवस म्हणून तो काही वेगळा उगवत नाही. पण आपल्यासाठी मात्र तो दिवस नवीन असतो, वेगळा असतो. जगातली प्रत्येक गोष्ट नवीन आहे, क्षणाक्षणाला बदलणारी आहे, नावीन्य हा जगाचा प्राण आहे. आकाश जुनं आहे, पण त्यावर येणारे मेघ नवीन आहेत. समुद्र शतकानुशतकं तोच आहे, पण त्यावर येणारी प्रत्येक लाट नवीन आहे. वृक्ष तेच आहेत, पण पालवी नवीन आहे. आणि अध्यात्मातलं उदाहरण द्यायचं तर आत्मा तोच आहे, देह मात्र नवीन आहे. हा जुन्या- नव्याचा संगम आहे. शायरा संगीता जोशी यांची ओळ आठवते – ‘तू भेटशी नव्याने.. बाकी जुनेच आहे..’ सगळं तेच आहे, पण दररोज आपण नवीन आहोत की नाही? आपलं मन नवीन आहे की नाही? आपला उत्साह नवीन आहे की नाही? आपण नव्या दमाने नवीन दिवसाचं स्वागत करायला तयार आहोत की नाही? आपण नवीन होऊन या जगाला भेटायला तयार आहोत की नाही? हे तपासून पाहायला हवं. नवीन वर्षांचं स्वागत नव्या उत्साहाने, नवीन आशेने, नवीन स्वप्नांनी आणि नवीन संकल्पांनी करायला हवं. जणू मागचं विसरून पुन्हा नवीन होण्याची संधी म्हणजे नवीन वर्षांचा पहिला दिवस. नवीन संकल्पांची नवीन संधी.

ही नवीन संधी या सरत्या वर्षांत मला ‘लोकसत्ता-चतुरंग’ने दिली. दर पंधरा दिवसांनी नवीन विचारांसह ‘मन आनंद स्वानंद’ म्हणत माझ्या वाचकांना भेटण्याची.. जानेवारी २०१७ मध्ये नवीन वाटणारी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्र समूहातली मंडळी, वाचक मंडळी डिसेंबर २०१७ पर्यंत जवळची, आपली, अगदी हक्काची वाटायला लागली. लेख प्रकाशित झाल्यानंतर येणारे पत्र, मेल, मेसेजेस म्हणजे जणू नवीन शिदोरीच मिळत होती. वाचकांच्या पत्रातून एक गोष्ट लक्षात येत होती ती म्हणजे महाराष्ट्र हा फक्त चांदा ते बांदा  इतकाच पसरलेला नाहीये तर तो कच्छ ते कोलकाता आणि काश्मीर ते कन्याकुमारी पसरलेला आहे. नव्हे तर संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे. मराठी माणूस वाद घालायला पुढे असतो, असं म्हणतात, पण तो दाद द्यायलाही मागे नसतो. हेही या पत्रातून विशेष रीतीने अधोरेखित झालं. कित्येक वाचकांनी त्यांचेही त्या त्या विषयावरचे अनुभव सांगितले. कित्येक तरुण मंडळींनी त्यांच्या भावविश्वाशी निगडित विषय सुचवले, ‘प्रेम केले’ लेखानंतर तर महाविद्यालयातल्या एका विद्यार्थिनीच्या आलेल्या पत्राने, पत्रातल्या त्या वाक्याने.. ‘मॅडम, तुमच्या या लेखाने माझा आत्महत्येचा विचार कुठच्या कुठे दूर पळून गेला..’ मला स्तंभित केलं. ‘कान सांभाळा’, ‘होईल’, ‘भूतकाळातली वांगी’, ‘मी हरले’, ‘चूकभूल’, ‘बोच’, ‘मौन’, ‘स्वत्त्व’, ‘अलगद’, ‘निव्र्याज’ या आणि अशा अनेक लेखांवर वाचक मंडळींनी अगदी मनापासून संवाद साधला.

‘इच्छापूर्ती’सारख्या काही लेखांतून मांडलेल्या विचारांना काही वाचकांनी ३६ चा आकडा दाखवला. आकडा ३६ असो वा ६३.. मी मात्र ही लेखन प्रक्रिया अगदी आनंदाने अनुभवली. खूप माणसं या सदरामुळे जोडली गेली, अनेक कर्तृत्ववान, प्रसिद्ध, विचारवंत मंडळींनीही वेळोवेळी या सदराबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि अंगावर मूठभर मास चढवलं. काही वाचकांच्या प्रतिक्रिया इतक्या निर्मळ आणि प्रांजळ होत्या की त्या वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावायच्या. साधारण आलेल्या प्रत्येक मेलला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न होता. अर्थात काही मेलना उत्तर द्यायचं राहिलं असेल तर त्या वाचकांची इथेच क्षमा मागते. इतके सुंदर आणि वेगळे अनुभव मिळाले. एका विद्यार्थी वाचक मित्राने सगळ्या लेखांचं एक कोलाज करून पाठवलं, तर काही अमराठी वाचकांनी या लेखांमधले त्यांना अडलेल्या मराठी शब्दांची यादी करून पाठवली आणि त्या शब्दांचे अर्थ, संदर्भ विचारले. काहींनी आपण हे लेख आपल्या घरातल्या कामवाल्या बाईलाही आवर्जून वाचून दाखवतो, असं लिहून कळवलं.

माणदेश एफ.एम. नावाची  एफ. एम. वाहिनी सातारा आणि माणदेश परिसरात, विशेष करून ग्रामीण भागात ऐकली जाते, त्या वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी या सदरातल्या काही लेखांचं वाचन या वाहिनीवर केलं. जे वृत्तपत्र वाचू शकत नाहीत अशा ज्येष्ठ मंडळींना किंवा निरक्षर मंडळींना हे लेख ऐकायला मिळावेत हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. एकंदरीत हे सगळं खूप आनंददायी होतं. या लेखांचा छोटय़ा परिच्छेदात काढलेला गोषवारा आणि चित्रकार नीलेश जाधव यांची अतिशय बोलकी चित्रं यातून लेखाचा विषय सुंदर रीतीने पोहोचायचा. या चित्रकारांचा लेखकांना हेवा वाटतो तो उगाच नाही. साधारण १२०० शब्दांत मांडला जाणारा विषय केवळ काही रेषांतून मांडणारे हे कलावंत खरंच किती प्रतिभावान! संस्कृतातल्या एका कोडय़ात एक ओळ येते ती आठवतेय.. ‘अमुखं स्फुटवक्ता च’ तोंड नाही पण सगळं स्पष्टपणे बोलणारा. इथे ‘अशब्द: स्फुटवक्ता च’ असं या चित्रकाराचं वर्णन करायला हवं.

खरंच अतिशय समृद्ध करणारा हा प्रवास होता. मुख्य म्हणजे अधिक सजग करणारा. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे डोळे उघडे ठेवून बघायला शिकवणारा. लेखाचे विषय आपल्या अवतीभोवतीच असतात. फक्त डोळे उघडे हवेत आणि मन जागं हवं, याचं भान या प्रवासाने दिलं. एका इंग्रजी कवीने म्हटलं होतं मला तुम्ही विषय सुचवा मग बघा मी माझ्या कवितेतून काय जादू करतो ते.. तेव्हा जगाने सांगितलं, असं जर असेल तर तुला विषयाची नाही तर विषय जाणवणाऱ्या हृदयाची गरज आहे. ‘यू नीड हार्ट..’ रोजच्या विषयावरचे हे लेख लिहिताना हृदय अधिक संवेदनशील होत गेलं. छोटय़ा छोटय़ा गोष्टींत लेखाचा विषय जाणवायला लागला. याच पानावर   अंजली पेंडसे आणि सुहास पेठे यांची सदरं प्रसिद्ध होतात तीही वाचनीय. कधी कधी तर आम्हा तिघांचे विषयही एकमेकांच्या जवळ जाणारे, पण तरी प्रत्येकाचा विचार वेगळा, शैली वेगळी.

वर्षभराचा हा प्रवास शेवटच्या टप्प्यावर आला. नवीन वर्ष सुरू होतंय, उत्तरायण सुरू झालंय.. या उत्तरायणाचा महिमा केवढा. इच्छामरणी भीष्म थांबले होते प्राण सोडायचे. उत्तरायणात मरण आलं तर चांगली गती मिळते म्हणे. मरणानंतर कशाला? जगतानाही चांगली गती मिळण्यासाठी उत्तरायणच हवं.. हे उत्तरायण भौगोलिक नाही तर मानसिक हवं. उत्तर हा किती सुंदर शब्द.. तृ म्हणजे तरणे आणि उद् म्हणजे वरच्या दिशेला वरच्या दिशेने तरून जाणे म्हणजे उत्तर आणि असा कायम वरच्या दिशेने चालायचा मार्ग (अयन) म्हणजे उत्तरायण. सतत वरच्या दिशेने, सतत प्रगतिशील, सतत आपल्यात सुधारणा करीत उच्च ध्येयाच्या उत्तर दिशेने एक एक पाउल टाकणे म्हणजे मानसिक उत्तरायण! असं उत्तरायण दर दिवशी, दर क्षणीही होऊ शकतं. मानसिक उत्तरायण घडलं की चैतन्याच्या नद्या प्रवाहित होतात, निरुत्साहाचं बर्फ वितळतं, हिरव्यागार विचारांची पालवी फुटत आणि मुख्य म्हणजे आनंदाचा सूर्य उगवतो. आनंद हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपल्या अध्यात्म संकल्पनेनुसार आपल्यात वास करणारं ते चैतन्य म्हणजे सत् चित् आनंद आहे. आपण आहोत म्हणजे सत्, आपण चैतन्ययुक्त आहोत म्हणजे चित् आणि आपल्या सगळ्यांना हवा असतो तो आनंद. प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळं, त्याचं प्रमाण वेगळं. पण सगळ्यांना आपली ओंजळ आनंदानं भरून जावी असंच वाटतं आणि हा आनंद आपला आपल्यालाच मिळवायला लागतो. छोटे छोटे खडे भरलेल्या माठात पाणी घातलं तर आधी ते पाणी खाली जातं आणि मग खडय़ांच्या फटीतून वाट काढत काढत ते हळूहळू पृष्ठभागावरती येतं. आनंदाचंही असंच आहे. प्रश्न, समस्या, शंका, अडचणी, अडथळे या साऱ्या खडकांच्या फटीफटीतूनच तो शोधावा लागतो. मग तो आपसूक मनभर पसरतो, चेहऱ्यावर दिसतो. स्वानंद हाच खरा आनंद. आपल्या अंगणातलं आनंदाचं झाड सतत बहरत राहो ही शुभेच्छा .. नवीन वर्षांच्या शुभेच्छांसहित!

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

(सदर समाप्त)

First Published on December 30, 2017 12:32 am

Web Title: dhanashree lele 2017 last marathi articles in chaturang
Next Stories
1 भय इथले..
2 मौनाचा अर्थ
3 ‘होईल’चा आशावाद
Just Now!
X