17 December 2017

News Flash

ऐकावे जनाचे

प्रश्न मोठा अवघड होता. शिष्य विचार करू लागले.

धनश्री लेले | Updated: October 7, 2017 2:05 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एकदा एका गुरूंनी शिष्यांना प्रश्न विचारला, ‘‘जगात अशी कोणती गोष्ट आहे जी द्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे, पण घ्यायला मात्र कोणीच तयार नाही?’’

प्रश्न मोठा अवघड होता. शिष्य विचार करू लागले. हे काही तरी वेगळंच आहे. जगात लोकं इतरांना काहीही द्यायला तयार नसतात पण घ्यायला मात्र इथे प्रत्येक जण उत्सुक असतो मग ही अशी या अनुभवापेक्षा वेगळी कोणती बरं गोष्ट आहे? खूप विचार करूनही शिष्यांना काही उत्तर सुचेना.

एका शिष्याने विचारलं, ‘‘गुरुजी खरंच अशी काही गोष्ट आहे का या जगात?’’ गुरुजी म्हणाले, ‘‘हो आहे तर, सांगू उत्तर?’’

‘‘हो’’ शिष्य उत्सुक होतेच.

गुरुजी म्हणाले, ‘‘अरे सल्ला.. प्रत्येक जण द्यायला उत्सुक किंबहुना उतावीळ आहे पण तो स्वीकारायला कोणीच तयार नाही.’’

हे गुरुजी बहुतेक या काळातले व्यास असणार. म्हणजे त्यांना व्यासांसारखा अनुभव आला असणार.. कारण इतकं सगळं लोकांसाठी, समाजासाठी सांगूनही शेवटी व्यासांना म्हणावंच लागलं, ‘अरे हात वर करून सांगतोय पण माझं कोणी ऐकतच नाही. न च कश्चित श्रृणोति माम्.’ सल्ला ऐकायला फारसं कोणी उत्सुक नसतं हेच खरं.

सल्ला म्हणजे खरं तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा. आपल्याला आलेल्या अनुभवातून आधीची पिढी पुढच्या पिढीला सल्ला देऊ  पाहते. पुढच्या पिढीला आधीच्या पिढीबद्दल अनादर असतो असं नाही. पण त्यांना त्यांचे सल्ले नको असतात. पुढच्या पिढीच्या मते त्यांचे अनुभव जुन्या काळातले. तेव्हाचा काळ वेगळा होता, विचार वेगळा होता, आताची जीवनशैली वेगळी आहे. त्यामुळे ते सल्ले नवीन पिढीला आवडत नाहीत, योग्य वाटत नाहीत आणि मोठय़ांचं म्हणणं ‘आम्ही आहोत घरी सल्ला द्यायला तर यांना ऐकायचं नाहीये..’ (आपण फार सल्ले देत असू तर आपलं वय झालंय असं समजायला हरकत नाही.) आपल्याला आलेल्या अडचणी पुढच्या पिढीला येऊ  नयेत ही चांगलीच भावना असते बऱ्याचदा त्यामागे. पण तरीही सल्ले नको असतात. आधीची पिढी जेव्हा तरुण असते तेव्हा त्यांना ही त्यांच्या आधीच्या पिढीचा सल्ला फारसा पसंत नसतोच.

खरं तर प्रत्येकाला आपल्या अनुभवातूनच शहाणपण येतं. पहिलटकरणीला याचा चांगला अनुभव असतो. बाळंतपणाचा पहिलाच अनुभव असल्याने आधी ती स्वत: गोंधळलेली असते, त्यात माहेर आणि सासर यांच्यात ‘आमच्याकडे असं करतात, आमच्याकडे असं नाही बाई’ असले संवाद अधूनमधून सुरू असतात. त्यात इतर बुजुर्ग नातेवाईक बायका ज्यांची नातवंडंही आता १६ सोळा वर्षांची आहेत, त्या त्यांच्या वेळेचं आठवून आठवून सल्ले देत राहतात आणि गंमत म्हणजे सल्ला देऊन झाल्यावर, ‘आता आठवत नाही बाई तेवढं आमच्यावेळचं. आणि तेव्हा कशा माझ्या सासूबाई होत्या ना.’ असं पालुपद जोडतात. पण सल्ला मात्र अगदी न चुकता दिला जातो. अशा सगळ्या मतमतांतरात, सल्लांतरात त्या बाळंतिणीची अगदी संभ्रमित अवस्था होऊन जाते आणि एक दिवस या आधीच्या बायकांसारखा तिलाही साक्षात्कार होतो.. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे.’ ही म्हण अशाच कुठल्या तरी सल्लासंभ्रमित अवस्थेतल्या माणसाने मराठी भाषेला बहाल केली असावी.

बरं या सल्लादानात विविधता ही किती! काही जण सुरुवातीलाच सांगतात.. ‘हे बघ, मी कधी कोणाला सल्ला द्यायला जात नाही, तरी सांगतो’ म्हणजे केवळ आपल्यावर उपकार.. (हे त्यांनी आधी किती जणांना सांगितलं आहे याचं रेकॉर्ड तपासायला मजा येईल) तर काही जण ‘आम्हाला वाटतं तुझ्याबद्दल म्हणून सांगतो..’ असं त्याला एकदम भावनिक टच देतात. तर काही, ‘काही कोणाचं ऐकू नकोस. मी सांगतो ते ऐक.’ असं म्हणत दोन परस्परविरोधी विधानं एकाच वाक्यात बसवतात. तर काही जण, ‘बघितलंस ना माझा सल्ला ऐकल्याने किती फायदा झाला त्याचा’..अशी सुरुवात करून, फायदेशीर सल्ला देण्याचा आपला गुण अधोरेखित करतात..सगळ्यात मजा तेव्हा येते जेव्हा मंडळी आपल्याला पुष्कळ वेळ सल्ला देत राहतात आणि शेवटी एकदम.. ‘बघ म्हणजे असं मला वाटतं हा, त्यातून तुला जे योग्य वाटेल ते तू कर..’ असं म्हणून सल्ल्यानंतरची आपली सगळी जबाबदारीच झटकून टाकतात तेव्हा.. म्हणजे बरोबर असेल तर त्यांच्या सल्ल्यामुळे आणि चुकला तर.. त्याचा तो. आधी बुद्धिभेद करायचा आणि मग सोडून द्यायचं!

सल्ला द्यायचाच असेल तर देणारा कृष्णा एवढा ठाम पाहिजे. ‘तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:’ उठ आणि युद्ध कर.. असं आज्ञार्थी रूप वापरणारा.. उठलास तर बरं होईल, केलंस युद्ध तर बघ. बरं होईल, असं मला वाटतंय.. असं डळमळीत बोलणारा असता कृष्ण तर अर्जुन आल्यापावली निघून गेला असता. कोणीही नाही तरी सल्ला देणारा तरी शेवटपर्यंत आपल्या पाठीशी राहील याची खात्री वाटली तरच सल्ला स्वीकारला जाणार ना.

मागणं आणि देणं यात मागणं जास्त अवघड आहे. पण सल्ला मागणं आणि सल्ला देणं यात देणं जास्त अवघड आहे. जास्त कौशल्याचं काम आहे ते. सल्ला मागणाऱ्या माणसाची नेमकी स्थिती काय आहे? तो कुठल्या परिस्थितीत आहे? त्याचा स्वभाव कसा आहे? त्याची जडणघडण कशी झालीय? त्याच्या विचारांची दिशा काय आहे? त्याच्या मनाची ताकद किती आहे? हे प्रश्न सल्ला मागणाऱ्यासाठी आपल्याला पडायला हवेत आणि त्याच्या भविष्यात आपल्या सल्ल्याचे काय परिणाम होतील? आपण निरागस मनाने सल्ला देतोय का? त्यात आपला काही स्वार्थ तर नाही ना? आपला सल्ला नाही तितकासा योग्य ठरला तर त्याची जबाबदारी आपण भविष्यात स्वीकारणार आहोत ना? असे प्रश्न सल्ला देणाऱ्याला स्वत:च्या बाबतीत पडायला हवेत. या दोन्ही गोष्टींचा विचार झाल्यावरच सल्ला द्यावा. बरं आपण खूप विचार करून, वेळ घालवून दिलेला सल्ला समोरच्याने नाही स्वीकारला तर त्याचं आणखी एक दु:ख सल्ला देणाऱ्याला असतंच. शिवाय सल्ला योग्य ठरल्यावर घेणारा त्याबद्दल एका शब्दानेही बोलला नाही तर त्याची ही एक बोच सल्ला देणाऱ्याला लागू शकते. थोडक्यात, सल्ला देणं हे फार अवघड काम.. उचलली जीभ लावली टाळ्याला इतकं तर ते नक्कीच सोपं नाही. म्हणून तर पूर्वी राजे मंडळींच्या मंत्रिमंडळात फार चांगले विचारी, विवेकी, राजाला योग्य सल्ला देतील असे मंत्री असायचे. ‘नृपांगणगत: खल:’ भर्तृहरीने मनाला टोचणाऱ्या सात शल्यात हे एक शल्य सांगितलंय. वाईट मंडळी राजाच्या जवळपास असणं याच्यासारखा दुसरा धोका नाही. कारण ती मंडळी राजाला नक्कीच चुकीचा सल्ला देऊ  शकतात. म्हणून सल्ला नेमका कोणाकडून घ्यायचा हे आधी समजायला हवं.

राम-रावणाच्या युद्धात इंद्राने रामाला केवळ रथच नाही तर योग्य सल्ला देणारा रथाचा सारथी मातलीसुद्धा दिला होता. आपल्या बाणांचा रावणावर काहीच परिणाम होत नाही हे पाहून साक्षात रामसुद्धा गोंधळून गेले असता, ‘प्रभो अहो असं ठाऊक नसल्यासारखं काय वागता? रावणाच्या वधाचा काळ जवळ आलाय, आपण पितामहास्त्राचा वापर कधी करणार?’ असा सौम्य शब्दात सल्ला देऊन मातलीने आपलं स्थान सिद्ध केलं होतं.. नुसता सल्ला नाही तर रामाच्या भात्यात काय आहे याची आठवणही मातलीने रामाला करून दिली. सल्लागार असा मातलीसारखा असायला हवा.. सल्ला घेणाऱ्याचा आत्मविश्वास, हुरूप वाढवून मग सल्ला देणारा. कर्णाचे दोष दाखवून मग त्याला सल्ला देणाऱ्या शल्यासारखा सल्लागार नको.

असो. तर हे सल्लापुराण संपवताना, विचारल्याशिवाय कोणीही कोणालाही सल्ला देऊ  नये..हा आपला माझा आगंतुक सल्ला..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

First Published on October 7, 2017 2:05 am

Web Title: dhanashree lele articles in marathi on generation gap