परिस्थितीनं गांजलेला, पिडलेला तिचा चेहरा सगळंच सांगत होता. डोळे करुणाद्र्रतेने ओथंबलेले. ती रडत नव्हती; पण व्यथा अधिक बोलकी झाली होती. रूढार्थाने ती वेडी नव्हती. फक्त परिस्थितीवश नैराश्यानं तिला घेरलेलं होतं आणि हे समजण्यासाठी मला कुठल्याही भाषेचा अडसर जाणवत नव्हता. तिची व्यथा समजण्यासाठी कुणाच्या शब्दांची गरज नव्हती. तिचे डोळेच सर्व सांगत होते.

सुमारे तीस वर्षांपूर्वीचा काळ, १९८४ च्या आसपासचा. मी नुकताच मानसरोगतज्ज्ञाचा व्यवसाय सुरू केला होता. मला निझामाबादच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांचे निमंत्रण आले. मी त्यांच्या दवाखान्यात महिन्यातून एकदा भेट द्यावी, ही त्यांची इच्छा. मी उत्साहाने निमंत्रण स्वीकारले आणि तेथे गेलो.

माझ्या भेटीसाठी त्यांनी बऱ्याच रुग्णांना निमंत्रण दिले होते. त्यांचा मोठा दवाखाना होता. गंमत अशी की, ज्या रुग्णांना मोडकंतोडकं का होईना, हिंदी येत होतं (मराठीचा प्रश्नच नव्हता) त्यांना मी प्रश्नोत्तरे करून, त्यांचे निदान करून औषधे लिहून दिली. मात्र फक्त तेलगू येणाऱ्या रुग्णांचं मला काहीच कळेना! ते ज्या भाषेत बोलत होते ती माझ्यासाठी अगम्य होती. मानसरोगतज्ज्ञाचा तपास म्हणजे प्रश्नोत्तरे. सहसा रोग जाणून घेण्यासाठी, निदान करण्यासाठी वैद्यकाच्या हाती दोन आयुधे असतात. रोगाचा इतिहास आणि शरीर तपासणी. बहुतांश शारीरिक रोग तर शरीर तपासणीवरून सहज कळणार. मोडलेले हाड ‘एक्स-रे’त दिसते, काविळीचे निदान रक्त तपासणीत होते आणि डोळ्यातला मोतीबिंदू टॉर्च टाकून दिसतो, तसा मानसिक आजार तपासता येत नाही. त्याचा उलगडा बऱ्याच वेळा नातेवाईकांच्या माहितीतून होतो. त्यासाठी माहिती आवश्यक आणि त्यासाठी रुग्णांशी, नातेवाईकांशी संवाद आवश्यक. इथे त्याचीच कमतरता! मी रुग्णाकडे आणि रुग्ण माझ्याकडे केविलवाणे बघू लागले!

या अनुभवानंतर मी निजामाबादच्या भेटी बंद केल्या. अनेक वर्षे उलटली. माझ्याकडे तुरळक तेलगू रुग्ण येत. ते सोबत दुभाषे घेऊन येत, पण मी त्यांना तपासायला नाखूश असे. त्यांची भाषा मला समजत नव्हती, त्यामुळे तक्रारींचे बारकावे, तपशील मला समजणे शक्य नसे आणि दुभाषांचे ढोबळ भाषांतर मला पुरेसे वाटत नसे. मी तेलगू रुग्णांना नाकारू लागलो. अनुभवानं डॉक्टर जुजबी तक्रारीवरनं आजाराचा अंदाज बांधायला शिकलो. यालाच ‘क्लिनिकल अ‍ॅक्युमेन’ म्हणतात! शेवटी विज्ञानाला माणुसकीची अनुभूती आली की डॉक्टर अनुभवी होतो! रुग्णांच्या तक्रारी-लक्षणे-निदानाच्या पलीकडे जायला शिकतो. तसा मीही शिकलो.

परवाची गोष्ट. आदिलाबादहून तीन स्त्रिया आल्या. आदिलाबाद हे तेलंगणातलं एक जिल्ह्य़ाचं ठिकाण. बरंचसं अविकसित. तेथे तेंदूपत्त्याचा व्यवसाय मोठा. विस्तीर्ण जंगल भागातील तेंदूपत्ता गोळा करणे, त्याच्या विडय़ा वळणे ही येथील स्त्रियांची मुख्य उपजीविका. पैशाला एक विडी एवढय़ा अत्यल्प मोबदल्यावर या स्त्रिया दिवसभर राबतात. हाती आलेल्या पैशातले बहुतांश पैसे नवऱ्याच्या व्यसनात जातात. त्यामुळे दारिद्रय़ पाचवीला पुजलेलं. कष्टाबद्दल तक्रार नाही, मात्र बहुतेकींच्या नशिबात नवऱ्याच्या व्यसनामुळे सुख नाही. मात्र या हलाखीतही या स्त्रिया नीटनेटक्या राहतात याचं मला अप्रूप वाटतं.

यातली एक रुग्ण स्त्री, बाकी दोघी थोडं हिंदी जाणणाऱ्या, तिच्या साथीदार शेजारणी. त्या सर्व विडी वळणाऱ्या कामगार स्त्रिया होत्या. आपल्या नैराश्यग्रस्त सखीला घेऊन आल्या होत्या. मोडक्यातोडक्या हिंदीत तिची कर्मकहाणी सांगत होत्या. मी थोडा वैतागलोच होतो. ती रुग्ण स्त्री मात्र काहीही न बोलता स्टुलावर बसली होती, नि:शब्द. बोलायचं खूप असेल तिला, पण समजत होतं तिला की आपल्याला तेलगूशिवाय काही येत नाही. अशा वेळी अनावर हुंदका दाबून ठेवावा तसा चेहरा झाला होता तिचा. खूप काही सांगण्याच्या ऊर्मीनं ओठ गोठून गेले होते.

मी तिच्याकडे पाहू लागलो. सावळा चेहरा. कानात तीन ठिकाणी मोत्याच्या बाळ्या, नाकात बेसर, हनुवटीवर निळसर गोंदण, केसांना अबोलीचा गजरा. कानावर तिच्या सखींचे शब्द पडत होते- ‘मरद शराब पीता, कभी कभी मारता इसको. तीन बच्चे है, मां-बाप नही. दिनके चालीस रुपये लाके देता, चालीस रुपय में कैसा घर चलाना, कैसे बच्चे पालना साब इसने.. उदास रहती, बोलती नही, खाती नही..’ परिस्थितीनं गांजलेला, पिडलेला तिचा चेहरा सगळंच सांगत होता. डोळे करुणाद्र्रतेने ओथंबलेले. ती रडत नव्हती. रोजच्या मरणानं तिचे अश्रू आटवून टाकले होते; पण व्यथा अधिक बोलकी झाली होती. रूढार्थाने ती वेडी नव्हती. तिला इतर कुठलाही मानसिक रोग झाला नव्हता. फक्त परिस्थितीवश नैराश्यानं तिला घेरलेलं होतं आणि हे समजण्यासाठी मला कुठल्याही भाषेचा अडसर जाणवत नव्हता. तिची व्यथा समजण्यासाठी कुणाच्या शब्दांची गरज नव्हती. तिचे डोळेच सर्व सांगत होते. चाळीस वर्षांची एक स्त्री, एक बायको, एक आई परिस्थितीच्या माऱ्याने हतबल होऊन गेली होती आणि मनाला आराम पडेल अशा औषधाच्या शोधात माझ्याकडे आली होती. तिची व्यथा मला समजत होती. भाषेच्या अडसराशिवाय समजत होती.

तिच्या परिस्थितीसाठी माझ्याजवळ औषध नव्हते. तिच्या व्यथेवर तात्पुरते होते ते मी दिले. मग मोडक्यातोडक्या हिंदीत स्वत:शीच बोलल्यासारखे तिला समजावले, चिंता करू नकोस. गोळ्या घे. बरं वाटेल. झोप येईल. समस्यांना तोंड देण्याची हिंमत येईल! तिलाही माझ्या आवाजातला समजावणीचा सूर जाणवला असावा. तिचा चेहरा थोडा उजळला. आपली व्यथा कुणाला तरी समजली, एवढी जाणीवही बरं वाटायला पुरेशी होती! नाही तरी अशा वेळी न बदलता येणाऱ्या परिस्थितीला शब्दांचे देव्हारे काय कामाचे? फक्त आश्वासक स्वर हवा. तिला मी तिच्या नवऱ्यासाठी गोळ्या दिल्या. सांगितलं- या त्याच्या चहात टाक, शांत होईल. दारू नाही सुटणार, पण मारणार नाही. त्याचा संताप कमी होईल.

पंधरा दिवसांनी ती आली, एकटीच! तिच्या चेहऱ्यावर ओळखीचे भाव. मीही हसून पाहिलं. आता विचारायचं कसं? बरी झाल्याचं दिसतच होतं; पण नवऱ्यावर काही परिणाम? मी थोडं तेलगू समजणाऱ्या कम्पाऊंडरला बोलावलं. तिचा चेहरा नैराश्यातून बाहेर आल्याचा दिसतच होता, पण नवराही शांत झाल्याचं कळलं. शब्दाशिवाय मानसोपचार झाला होता! आयुष्याकडून तिच्या अपेक्षाही तेवढय़ाच होत्या. रोजच्या जेवणातल्या चिमूटभर मिठाएवढं चिमूटभर सुख हवं होतं. तिला कुठले गूढ तत्त्वचिंतनात्मक प्रश्न सोडवायचे होते! मी पुन्हा गोळ्या दिल्या. महिनाभराने ती आली आणि अहो आश्चर्यम्! नवऱ्यालाही सोबत घेऊन आली! चौकडीची लुंगी, चुरगळलेला शर्ट, विस्कटलेले केस, दारूने त्वचा निब्बरलेली, मात्र चेहरा थोडा ओशाळा. त्याला थोडं हिंदी येत होतं. त्याला गोळ्या लिहून दिल्या. ती आता अधूनमधून येते, एकटीच येते. तिला दुभाषाची गरज वाटत नाही. कधी तिच्याचसारखी तेलगू भाषिक समस्याग्रस्त सखी घेऊन येते. तिचा एकही शब्द न समजता मी तिला समजावून घेतो. माझा एकही शब्द न कळता तिला माझा उपचार फळतो!

माझ्या अशब्द उपचाराची परीक्षा सुफळ-संपूर्ण होते.

 

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in