प्राण्यांवर प्रेम करणारे आपण लाखो आहोत पण त्यांना समजून घेणारे किती? त्यांच्या निव्र्याज प्रेमाची मुद्दल तरी आपण त्यांना परत करतो का? त्यांना फार काही नको असतं. त्यांच्या त्या निर्हेतुक प्रेमाची जाण आपल्याला आहे एवढंच अन् एवढंच फक्त हवं असतं त्यांना.

त्याचे डोळे हटतच नव्हते माझ्या नजरेसमोरून. समोर असलेल्या डायरीतसुद्धा मला त्याचेच डोळे दिसत होते.. आणि त्या डोळ्यांत त्याची स्वत:ची डायरी.. खरं तर हे सगळं खूप आधीच घडलं असतं पण काय आहे ना, आपण कळत नकळत आपल्या अगदी समोर असणाऱ्यांकडे कायम दुर्लक्ष करतो आणि त्याच्या पलीकडचं काही तरी पाहायला जातो. त्या पलीकडच्या गोष्टीशी नातं जोडायला जातो. समोरची गोष्ट अगदी अदृश्य आहे असं समजून. आणि अचानक त्या गोष्टीला आपण धडकतो पुढे जाण्याच्या नादात तेव्हा कुठे जाग येते आपल्याला की हे तर आपल्याला किती जवळ होतं. आधी कधी का नाही जाणवलं? हे अगदी सेम असंच होतंय माझ्याबरोबर. मी ऑफिसला जाताना सकाळी अगदी रोज पाहायचे त्याला.. पाहायचे कसले.. जसं झाड रस्त्यावर आहे, रस्त्यावरचे दिवे तिथे आहेत तसा तो पण तिथे आहे हेच काय ते पाहणं. त्याच्या असण्यानं असा कधी फारसा फरक पडला नाही पण नसण्याने मात्र त्या दिशा चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. त्या दिवशी घरी येताना माझंच काही तरी बिनसलं होतं. राग राग होत होता अगदी आणि त्यात हा माझी वाट अडवून बसलेला अगदी निवांत, त्याला तसं बघून ना माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, या भटक्या कुत्र्यांना तर पकडूनच नेलं पाहिजे. फाजील झालेत फार, श्शी.. ही काय जागा आहे का बसायची. घाण करून ठेवतात नुसती. क्षण दोन क्षण मी माझ्याशीच चरफडत उभी होते तिथे. काय माहीत कसं पण मी काही तरी त्यालाच उद्देशून बोलतेय हे कळलं असावं बहुधा त्याला. त्याने अगदी स्लो मोशनमध्ये मान वर करून माझ्याकडे पाहिलं.  एकदाच. आणि पुन्हा मान खाली घालून तो बापडा त्याच्या साधनेत मग्न झाला. त्या क्षणभराच्या त्याच्या कटाक्षात मला अनंतकाळाची साठवण सापडली ते डोळे.. त्याचे डोळे .. वेगळंच होतं काही तरी. ते मला काहीही सांगत नव्हते पण तरीही माझ्याशी खूप बोलत होते. त्यात असलेली निरागसता मी यापूर्वी कुणाच्याच डोळ्यांत पाहिली नव्हती. त्यातला प्रांजळपणा तर समजण्यापलीकडे होता. त्याच्या डोळ्यांत काहीच नव्हतं पण तरीही ते गच्च भरलेले होते. ना  रिकामेपण. ना एकटेपणा. अलिप्त राहूनही आपलेसे करणारे.. मॅजिकल.. हो जादूई होते डोळे. मी खरंच हिप्नोटाइझ झाल्यासारखी घरी आले. कित्येक दिवसांनी कधी नव्हे तो दादा घरी लवकर आलेला. त्याच्या रोजच्या उशिरा घरी येण्याने आणि सुट्टीच्या दिवशी आमच्या शिफ्ट्स मोबाइलमध्ये असल्याने आमच्यातला संवाद जवळजवळ आटलेला..

‘‘दादा तुला बनीची आठवण येते का रे.?’’

दादाने चमकून माझ्याकडे पाहिले. त्याला त्या वेळेला ‘‘दादा चहा पिणार का?’’ एवढाच प्रश्न अपेक्षित होता आणि मी मात्र एकदम सर्जकिल स्ट्राइकच केला. ‘‘अं..’’ सांगू की नको आणि काय सांगू असं काहीसं होत होतं त्याचं. ‘‘येते कधी कधी’’ त्याने शक्य तितका संभाषण संपवायचा प्रयत्न केला, पण मी कसली संपू देते, आज मला त्या जादूई डोळ्यांनी जे काही जाळ्यात अडकवलेलं तसंच माझा दादा पण कधी अडकलेला का, हे जाणल्याशिवाय मी काही त्याला सोडणार नव्हते.

बनी म्हणजे दादाने लहानपणी पाळलेला कुत्रा. दादा कॉलेजला असताना बनी कसल्याशा आजाराने गेला. त्यानंतर दादाने कोणताही प्राणी पाळला नाही. ‘‘सांग ना नीट, तू मिस करत असशील ना बनीला..?’’ तुझं त्याच्याशिवाय आणि त्याचं तुझ्याशिवाय पान पण नाही हलायचं.. तू घरी आलास की किती आनंदी व्हायचा तो. सारखा तुझ्या पायात घुटमळत असायचा..’’ हो ना त्याची आणि माझी केमिस्ट्री खूप मस्त होती. तुला माहितीये त्याला घरात आणण्यासाठी मी किती आकांडतांडव केलं होतं आईबाबांसमोर. या आपल्या खालच्या फुटपाथवर सापडला होता मला. छोटं पिल्लू होतं ते. माझ्या पायाशी येऊन घुटमळायलाच लागला. त्याचे ते झुलणारे कान खूप आवडले मला. शेवटी त्याला उचलून घरीच आणला. आम्ही दोघे पण एकत्र मोठे झालो. माझी कित्येक सिक्रेट्स त्यालाच माहीत होती. कधी कधी तर तासन्तास बोलायचो त्याच्याशी. तो नुसताच माझ्याकडे पाहात बसायचा. अचानक मी गप्प झालो तर गप्प झालो ना की ‘‘मी ऐकतोय रे. सांग ना मला. काहीच लपवू नकोस,’’ असं काहीसं त्याच्या भाषेत बोलायचा. कॉलेजला असताना माझा अपघात झालेला तेव्हा हा माझ्यापाशीच बसून होता. एक क्षण हलला नाही.. तो ज्या दिवशी गेला ना तेव्हा मला जाणवलं की मी काय गमावलंय. पण तुला माहितीये त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही मला त्याच्या डोळ्यांत फक्त आणि फक्त प्रेम दिसलं होतं, कसलाच राग नाही, गिल्ट नाही. द्वेष नाही, फक्त प्रेम. आपण माणसं कायम असं प्रेम ठेवू शकतो का गं कुणासाठी? म्हणजे इतकं निव्र्याज प्रेम कोणंच करू शकत नाही कुणावर..आय मिस बनी फॉर दॅट अनकंडिशनल लव्ह. कधी फारसं न बोलणारा, रिअ‍ॅक्ट न होणारा माझा दादा आज पहिल्यांदाच इतकं बोलत होता कोणाबद्दल तरी.

अनकंडिशनल लव्ह. तो शब्द माझ्या डोक्यात अडकून राहिला. आजकाल पाच पशाने श्रीमंत झालो की, शहरात एक घर, गावाकडे एक फार्म हाउस आणि या सगळ्याबरोबर श्रीमंतीचा अजून एक सिम्बॉल म्हणजे पाळीव प्राणी मिरवला जातो. घरी आणल्यावर शोभेच्या वस्तू जशा पाहुण्यांना दाखवल्या जातात तसा ‘‘आमचा टॉमी ’’ दाखवला जातो. कसंय ना आजकाल आपण श्रीमंत खूप होतो.. पशाने पण मनाने, नात्यांनी नाही.. मग जसं घरातलं वाणसामान संपलं की ते बाहेरून आणलं जातं तसं प्रेम आटायला लागलं की मग त्यांना आणलं जातं, हे असले छक्केपंजे त्यांच्या गावीही नसतात..

आई सांगतेच ना लहान असताना शेंडेफळ म्हणून माझंच कौतुक व्हायचं आणि मग दादाला खूप एकटं एकटं वाटायला लागलं होतं, माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, या कोशात जाऊन तो बसला होता, आणि तेव्हा बनी आला. दादावर नि:स्वार्थ प्रेम करणारा.. त्याच्या माणसावर मालकावर नव्हे (आपण स्वत:ला त्याचा मालक समजतो, त्याला काही माहीत नाही) ते जीव जडवतात आणि आपण..? आपण काय करतो? प्रत्येक वेळी स्वार्थीपणे त्याच्या स्वत:साठी वापर करतो आणि जेव्हा त्या सोयीची अडगळ बनते तेव्हा हे पाळीव प्राणी दमतात आणि आपल्यात आसरा शोधतात तेव्हा मात्र आपण त्यांना आपल्या आयुष्यातून घरातून बाहेर काढायलाही कमी करत नाही. त्यांना नाही सोडवत आपल्याला. ते सतत आपल्या पायाशी घुटमळतात. पुन:पुन्हा आपल्याचपाशी येतात पण तेव्हा तो आपल्यासाठी फक्त एक उपद्रवी प्राणी झालेला असतो. (मग प्रश्न पडतो यातलं जनावर नेमकं कोण.?)

प्राण्यांवर प्रेम करणारे आपण लाखो आहोत पण त्यांचं प्रेम, त्यांना समजून घेणारे किती? त्यांच्या निव्र्याज प्रेमाची मुद्दल तरी आपण त्यांना परत करतो का? आम्ही श्रीमंत म्हणून आमचा डॉगीही उच्च ‘ब्रीड’चा. आमची मांजरही ‘रॉयल’. प्राण्यांना तुमचं स्टेट्स महत्त्वाचं नसतं. किंबहुना त्यांना त्याची गरजच वाटत नाही. आपण मात्र त्यांना नसलेल्या उतरंडीत मोजून मोकळे होतो. माणसांची मापं त्या ‘जगाचं ज्ञान’ नसलेल्या प्राण्यांना लावायला जातो. आपली हौस-मौज असली तरी त्यांचं मात्र ते प्रेमच असतं, हे आपण कळूनच घेत नाही.

बनी गेला त्या रात्री दादाच्या खोलीतला दिवा जळत होता खूप रात्रभर. मी हळूच त्याच्या खोलीत डोकावले. बनी आणि त्याचा फोटो असलेल्या फ्रेमवर दादा हळुवार हात फिरवत होता. दादाचे अश्रू फोटोतल्या बनीच्या डोळ्यांवर पडत होते आणि बनीच्या त्या डोळ्यांची आठवण मला आज त्या फुटपाथवर बसलेल्या कुत्र्याच्या डोळ्यांत दिसली.

जात, वर्ण यावरून प्राणी बदलत नाहीत, माणसांसारखे. आपली भूक भागविण्यासाठी आपण त्यांच्या विश्वासाचा, प्रेमाचा अगदी सहज बळी देतो. त्यांना फार काही नको असतं. आपल्याला त्यांच्या त्या निर्हेतुक प्रेमाची जाण आपल्याला आहे एवढंच अन् एवढंच फक्त हवं असतं त्यांना. आज संध्याकाळी पाहिलेल्या त्या जादूई डोळ्यांची जादू उलगडण्याचा प्रयत्न मी नाही केला. कारण मुळातच माणसांच्या आवाक्यापलीकडचं असं काही तरी साठवलेलं होतं त्या डोळ्यांत.. कदाचित नंतर कधी तरी आपसूकच समजून जाईल मला ते; कारण ती जादू समजून घ्यायला प्रेमाच्या जादूखेरीज आणखी कशाचीही गरज नाही…
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com