News Flash

चौथा कमरा

कल्लोळ.. शांत झाला.. आतला आवाज फक्त उरला.. सुरेल. कलकलणं थांबलं..

ऑफिसमधून निघाल्यापासून तर तिला कलकलल्यासारखं झालं होतं. शांत बिनआवाजाचं बसावंसं वाटत होतं. तीन खोल्यांचं घर तिचं. पण निवांत बसायला जागा नाही कुठेच. आतासुद्धा सगळीकडे कुणी ना कुणी आधीपासूनच काहीबाही करत बसलेत. चौथी खोली हवी होती. तिच्या मनात आलं.. अमृता प्रीतम म्हणते तसा चौथा कमरा..

संध्याकाळपासून तिच्या घरात कसला ना कसला आवाज चालला होता. रोजच असतो म्हणा.. पण आज जरा जास्त जाणवत होता.. ती घरी आली तेव्हा बाहेरच्या खोलीत मोठय़ा आवाजात टी.व्ही. चालू होता. रोजचंच काहीतरी बोअरिंग सवंग चालू होतं. सासूबाईंना लागतोच पण या वेळेला. बाहेरचा दरवाजा उघडाच होता आणि शेजारचासुद्धा. शेजारचा टी.व्ही.ही जोरजोरात कोकलून गात होता. गोंगाटात भर टाकायला..

शिवाय इतर कुठचे कुठचे आवाज तिच्यापर्यंत येऊन आदळत होतेच. कुठेतरी कोणी हॉर्न बडवत होतं. कुठे सुतारकाम चालू होतं. वरच्या मजल्यावर कुणी खुच्र्या सरकवत होतं. तिच्या कानांवर अत्याचार होत होता. मुलाचे मित्र जा-ये करत होते. कधी पाणी प्यायला, कधी बॅट-बॉल घ्यायला. त्याच्यावर तिला ओरडायला लागत होतं.. होमवर्क राहिलाय. लवकर अभ्यासाला बस.. वगैरे, वगैरे वगैरे.. मुलीचं प्रोजेक्टचं काम चालू होतं. दोन मैत्रिणी घेऊन तिने आतल्या खोलीत पसारा मांडला होता. मोबाइलवर इंग्लिश गाणी चालू होती आणि ‘यातलं काहीही उचलू नको गं.. असंच राहू दे.’ म्हणून फर्मान सोडलेलं होतं.

नवरा घरी नव्हता. टूरला गेलेला होता. महिन्यातले १५-२० दिवस तरी तो बाहेर असतो. काम खूप करतो, ऑफिसचं. बिच्चारा.. हे अर्थात तिच्या सासूच्या मते, पण तो घरी असला की तिला तिच्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगता येतात. तोही न कंटाळता हं हं करत असतो. आज तो नसल्याचं जास्तच जाणवलं. वैतागायचं नाही ठरवलं तरी त्याचा रागच आला. नेहमीसारखा.. हक्काचा..

बाबांना जाऊन दहा वर्षे झाली आज. आजचाच दिवस.. बेचैन वाटत होतं दिवसभर..  ऑफिसमधून निघाल्यापासून तर तिला कलकलल्यासारखं झालं होतं. शांत बिनआवाजाचं बसावंसं वाटत होतं. एकटं एकटं वाटत होतं. तरीही एकांतच हवा वाटत होता. निदान स्वत:शी बोलता आलं असतं. हल्ली हे बरेचदा होतं. रक्तदाब तपासून घ्यायला हवा. बाबांना पण तशी लवकर सुरू झाली होती गोळी. जरा ध्यान आणि प्राणायाम करायला पाहिजे. बाबा होते तेव्हा सांगून थकले. आता वाटतं करावं.. पण कधी आणि कुठे करायचं हाच प्रश्न..

तीन खोल्यांचं घर तिचं. पण निवांत बसायला जागा नाही कुठेच. आतासुद्धा सगळीकडे कुणी ना कुणी आधीपासूनच काहीबाही करत बसलेत. चौथी खोली हवी होती. तिच्या मनात आलं.. अमृता प्रीतम म्हणते तसा चौथा कमरा..

पोळ्या करायला बाई यायला झाल्यात. नाही सांगायला पाहिजे त्यांना आजचा दिवस. ठणठण आवाज करत राहतील नुसता. साधी सांडशी ठेवली खाली तरी आवाज करतात जोरात. दणदणाट असतो फार आल्यापासनं.. मैत्रिणीचा फोन आला. आटपलं असलं तर खाली चालायला जाऊ म्हणाली. फेऱ्या मारायला. जेवायच्या वेळेपर्यंत परत येऊ  म्हणाली. तिला काहीतरी बोलायचं असणार, पण कंटाळाच आला तिला. ‘नाही वेळ गं आज,’ सांगून टाकलं. कलकल वाढेल असं काही ऐकायला आज आणखी कुणाला कान द्यायचाच नाही.  सरळ नाही सांगायचं.

घरातून बाहेर जावं.. लांब कुठे तरी.. वाटत राहिलं सारखं. ती खाली उतरली, गाडीची चावी घेऊन. सासूबाईंना सांगितलं जाऊन येते जरा. रेडियो चालू केला. रेडियोवर हिंदी जुनी गाणी लागली होती. ऐकतच राहावं. थांबूच नये. वाटत राहिलं तिला.

पण तेवढय़ात काही तरी मनात आलं, लिंक रोडवर अगदी हमरस्त्यावर बाजूला गाडी थांबवली. काचा बंद, एसी चालूच.. सीट मागे करून बसून राहिली. हेमंतकुमारचं गाणं, हेमंतकुमार बाबांचा फारच आवडता.. तिच्या लहानपणी बाबा हेमंतकुमारची कॅसेट लावून ऐकत असायचे.. अति नॉस्टॅल्जिक वाटलं तिला.. बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकल्यासारखं वाटत राहिलं..

डोळे मिटून ती ऐकत राहिली.. श्वास आत बाहेर होत राहिला फक्त.. लयीत.. बाहेरचा सूर नि सूर आत पोचत राहिला.. हळूहळू आजूबाजूचा सगळा गलका.. कल्लोळ.. शांत झाला.. आतला आवाज फक्त उरला.. सुरेल. कलकलणं थांबलं..

तिला तिचा ‘चौथा कमरा’ मिळाला होता..

– जान्हवी साठे

janhavimsathe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 12:05 am

Web Title: kathakathan by janhavi sathe
Next Stories
1 अशिक्षित आजीचं तत्त्वज्ञान
2 आज्जी, आमी इथेच लाहू?
3 मालिकांचं वेळापत्रक