बिगुल वाजला, आम्हाला स्टॉल बंद करायचा संकेत मिळाला, मी व माझ्या मदतनीसानं आवराआवर सुरू केली. सूचना देऊन मी वळले. ती रायफल शेवटी राहिलीच; च्, देऊन टाकली असती तर बरं झालं असतं. पण तो मुलगा? जणू आपले प्राणच त्यात साठवून गेला होता..

भा रताच्या पश्चिम भागात असलेलं कच्छचं रण. एका खेडय़ाजवळ वसलेल्या एअरफोर्स स्टेशनला गाढ झोपेतून हळूहळू जाग येऊ लागली. आणखी एक नवीन प्रदेश, नवीन भाषा, नवी संस्कृती, लोक.. एका नवीन उत्साहानं मी सकाळच्या कामाला लागले.. पती ऑफिसला व मुलं शाळेला गेल्यावर जरा कुठे उसंत मिळाली तोच फोन खणखणला, ‘‘पुढच्या आठवडय़ात एअरफोर्स वर्धापन दिनानिमित्त ‘आनंदमेळा’ करायचं ठरवलं आहे आणि या वेळी तुम्हाला मुलांचा स्टॉल देण्यात आलेला आहे. आणखी माहिती व चर्चेकरिता ‘अफवा’ ऑफिसमध्ये महिलांची बैठक आहे तरी तुम्ही जरूर यावे’’. स्टेशन कमांडरच्या पत्नीच्या सचिवाने निरोप दिला.
‘अफवा’ अर्थात फॉर्म म्हणजे एअरफोर्स वाइफ्ज वेलफेअर असोसिएशन, इथे ऑफिसर व एअरमॅनच्या पत्नींची ‘लेडीज मीट’ असते. वर्षभराचे कार्यक्रम आखले जातात. ‘एअरफोर्स डे’च्या निमित्त अनेक कार्यक्रमांच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. अर्थात दुपारच्या बैठकीमध्ये आम्हाला कार्यक्रम व स्टॉलची रूपरेखा दिली गेली. चला! काहीतरी वेगळं करायला मिळणार, मजा येईल.
माझी तयारी सुरू झाली. घराबाहेर आले, स्टेशनच्या मोठय़ा पटांगणावर नजर टाकली. राहुटय़ा, तंबू ठोकले जात होते. दूर कोपऱ्यात प्रवेशद्वाराजवळ जुनं मिग विमान दिमाखानं उभं होतं; प्रदर्शनाचं ते एक मुख्य आकर्षण असणार होतं. मी माझ्या स्टॉलची जागा बघितली, ठीक वाटली..चला.. आता दिवसरात्र माझ्या डोक्यात माझा स्टॉल, त्याची सजावट, खेळणी, न् खूप काही! नाव काय द्यायचं? मुलांच्या स्टॉलला शोभेलसं असावं, ‘बचपन’ कुठूनसं हे नाव अचानक माझ्या समोर आलं व सर्वाना आवडलंही!
बघता बघता आनंद मेळ्याचा दिवस उजाडला.. घरातलं सगळं आटपून मी आनंद मेळा मैदानावर आले, सगळीकडे तयारी जोरात सुरू होती, तो ‘मिग’ ही ऐटीत उभा असलेला वाटला. त्याला वळसा घालून मी माझ्या स्टॉलवर आले, स्ट्रीमर्सने सजविलेलं ‘बचपन’ नाव शोभून दिसत होतं. माझ्याबरोबर एक मदतनीसही होता, मी भराभरा कामाला लागले. फळ्यांवर कोणती खेळणी कुठे ठेवायची हे आधीच ठरवलं होतं. ‘डॅमेज’ खेळणी वेगळी एका बॉक्समध्ये कोपऱ्यात ठेवली. वेगवेगळ्या पोजमधील लहान मुलांची चित्रं, पोस्टर्सही लावली, टेपरेकॉर्डवर लहान मुलांची बडबड गीतं.. सगळ्या तयारीनंतर मी माझ्या स्टॉलवर नजर टाकली, फारच छान! मनापासून समाधान वाटलं. कित्येक प्रकारच्या बाहुल्या, ल्युडो. पासून हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेटचे सेट, लहान-मोठे चेंडू, पशुपक्षी, प्राणी, पझल्स, चावी भरली की जिवंत होणारी खेळणी..
काउंटरवर खेळण्यातली भिंगरी वेग देऊन खाली ठेवली; र्गर् र् र् र् . काय छान फिरत होती! आता प्रत्येक स्टॉल नटूनथटून सज्ज होता. हळूहळू माणसं यायला सुरुवात झाली. लहान फ्रॉक , लांब बाह्य़ांचा चुडीदार व पगडी घातलेले पुरुष, लहंगा-चोलीमधल्या बायका, कडा, खांद्यावर असलेली मुले, बघत बघता मेळा जत्रेचं रूप घेऊ लागला. ‘ब्येन, बाजूवाली बताव जो,’ मळक्या वेशातला तो कच्छी, बाहुलीकडे बोट दाखवत मला म्हणाला. मी जीन्स टॉपमधली नटखट ‘बार्बी’ त्याच्या हातात ठेवली. त्याच्या लहान मुलीने आलटूनपालटून परीक्षण केलं. नापसंती बापलेकीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, ‘‘सुकडी छे. बीजी बतावो’’ म्हणत ‘बार्बी’ परत केली.
अनेक बाहुल्या बघितल्यावर शेवटी निळ्या डोळ्यांची मोठी गुबगुबीत बाहुली निवडली. कमरेला खोचलेल्या मळकट नोटा माझ्या समोर ठेवल्या व त्या मुलीनं समाधानानं ती बाहुली छातीशी घट्ट कवटाळली.
आता एकापाठोपाठ एक लोक यायला लागले, मान वरती करायला फुरसत नव्हती, माझा मदतनीस ही गर्दी सांभाळत होता. ‘‘ओ ब्येन, ओ मेडम, ओ गन बतवजो.’’ माझं लक्ष वेधणारा तो मुलगा गर्दीतून कशीबशी मान वर काढून मला विचारत होता. समोरच ठेवलेल्या लाकडी रायफलीकडं त्यानं बोट दाखवलं. त्याची किंमत सांगितल्यावर त्याचा चेहरा झट्कन उतरला. काही न बोलता तो निघून गेला. आई, वडील, मुले, खेळणी, गर्दी आणि मी.. खेळणी दाखवणं, हिशोब सांभाळणं आणि गर्दीकडे लक्ष ठेवणं, सगळीच कसरत सुरू होती.
‘‘मॅम, तुम्ही बसता का जरा वेळ मी सांभाळतो,’’ मदतनीसानं मला विनंती केली. मी मानेनंच नाही म्हटलं. ‘‘बा मने रमकडा जोईछे’’ आवाजाच्या दिशेने बघितलं, एक लहान मुलगा आईला स्टॉलकडे ओढत होता. खरंतर ती बाई स्टॉल टाळून निघायला बघत होती, पण म्हणतात ना, बालहट्ट! तिला, नाइलाजानं यावंच लागलं. त्या मुलाला ‘हेन फॅमिली’ हवी होती. किल्ली भरल्यावर पुढे चालणारी ती कोंबडी व पाठीमागून टुक टुक येणारी तिची छोटी पिल्लं! त्या बाईनं मुलाला समजावलं. काही स्वस्तातली खेळणी उगाच बघितली, पण मुलाला ती कोंबडीच हवी होती. तो बधेना. काही कळायच्या आतच त्या मुलाच्या खाड्कन थोबाडीत बसली. माझ्या काळजात चर्र्र् झालं, त्या बाईनं प्लॅस्टिकचे दोन चेंडू त्या मुलाच्या हातात कोंबले व फरफटत त्याला घेऊन गेली. कदाचित तिचा नाइलाज असेल, मला फार वाईट वाटलं. जड मनानं मी खुर्चीवर बसले, नको हा स्टॉल, हा व्यापार. खेळणी विकत घेणाऱ्या मुलांपेक्षा खेळणं न मिळालेल्या मुलांचं दु:ख निराशा बघवत नाही. नजर कोपऱ्यात गेली. विस्कटलेले केस, हातात लोखंडी कडे, शेरवानी बंडी घातलेला, धूळ व घामानं बरबटलेला तो आठ-दहा वर्षांचा मुलगा आसुसलेल्या नजरेनं रायफलकडे बघत होता..त्याची नजर हटत नव्हती, हा मघाचाच मुलगा. थोडय़ा वेळानं तो मुलगाही निघून गेला.
भर दुपारचं रणरणतं ऊन आता जाणवायला लागलं होतं; पण लहानशा खेडेगावातला तो ‘एअरफोर्स’चा मेळा म्हणजे तिथल्या लोकांकरिता पर्वणीच होती, सहजासहजी बघायला, करायला न मिळणारं मनोरंजन, इतक्या सहज उपलब्ध असताना ही सुवर्णसंधी कोण सोडणार? ‘‘मॅम आपण जेऊन घेता का? नंतर उशीर हाईल,’’ माझ्या मदतनीसानं लंच टाइम ओळखून मला विनंती केली. आता लोक खाण्या-पिण्यात गर्क होते. गर्दी जरा विरळच झाली, भुके ची वेळ, खाण्याच्या सगळ्या स्टॉलवर झुंबड उडालेली होती. कोपऱ्यातली जागा बघून मीही जेवण आटोपतं घेतलं. हात धुताना सहज नजर समोर गेली, त्या कडक उन्हातही तो मुलगा आपल्या विचारात गढलेला एकटाच बसलेला होता.. मदतनीस व मी पुन्हा कामाला लागलो. खेळणी, पिस्तुले, गन्स भराभर विकली जात होती. मी खेळण्यांची वेष्टणं, पाकिटं पायानेच बाजूला सारली; तो मुलगा पुन्हा काउंटरवर आला. त्यानं विचारल्यावर मदतनीसानं ती रायफल त्याच्या हातात ठेवली. रायफलीकडे बघताना, तिला कुरवाळताना त्या मुलाची नजर, आपल्या बाळाला कुरवाळणाऱ्या आईसारखी वाटली. ‘के टलानी?’ त्यानं उगाचच किंमत विचारल्यासारखं केलं. मलाही ते कळलं, दोन क्षण आणखी ती रायफल आपल्या हातात राहावी हा हेतू! मला येताना बघून हळुवारपणे रायफल काउंटरवर ठेवली आणि तो निघून गेला. त्याची नजर अशी होती की न राहवून मीपण ती रायफल हातात घेऊन बघितली. ‘मुलांना आवडणारं खेळणं आणखी काय! कुठून दूरवरून आलेली माणसं इतक्या विविध व रंगबिरंगी खेळण्यांकडे बघून आपापसात चर्चा करीत होती, लहानांबरोबर मोठय़ांचा उत्साह उत्सुकता व कौतुकही तितकंच!’
दुपारचे दोन वाजून गेले होते, स्टॉलवरही विशेष गर्दी नव्हती. सगळे खाण्यापिण्यात मशगूल होते. बरीच खेळणी विकली गेल्यानं फळ्यांवरची जागा रिकामी झाली होती. स्टॉलमधली उरलेली खेळणी पुन्हा रचून ठेवली.
‘‘मेडम, ब्येन वो गन..’ धुळीने भरलेला तो मुलगा पुन्हा आला, त्याने आणखी काही म्हणायच्या आत मी जरा कडक आवाजात मोडक्या तोडक्या गुजरातीत त्याला म्हटलं, ‘तने कई वार किधू छे, पैसा लईने आव’’! ‘‘अं..मने जोइये.. आ गन. तमे राख जो, हू आवीश!’’ त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला होता. त्याच्या आवाजातील अजिजी मला प्रकर्षांनं जाणवली. ‘पैसे आण रायफल घेऊन जा. सहा वाजेपर्यंत आलास तर ठीक. मध्ये कोणी विकत घ्यायला आलं तर विकून टाकेन समजलं?’ माझ्यातला व्यापारी बोलला. त्यानं पुन्हा बंडीतल्या खिशांत हात घातले नि अतिशय निराशेनं स्टॉल सोडला. जाताना त्याच्या पायात जणू कोणी मणा मणाच्या बेडय़ा घातल्या होत्या. तो दृष्टीआड झाला आणि मीही कामांत गुंतले. नवीन आलेल्या मुलांच्या घोळक्यानं पाच-सहा गन, पिस्तुली विकत घेतल्या. एका काठीयावाडी बापूनं मला ‘भिंगरी चलाके बताव’ म्हणून आज्ञा सोडली. ग्राहक देवासारखा मानून मीही काउंटरवर दोन भिंगऱ्या चालवून दाखवल्या. ‘‘मॅम, स्टॉक जवळजवळ संपलाय,’’ मदतनीसानं सांगितलं. मी मनात आनंदले, माझी नजर ‘त्या’ रायफलवर गेली, का कुणास ठाऊक मी ती विकत नव्हते, डॅमेज पीस म्हणून वेळ मारून नेत होते. आणि मला विचारल्याशिवाय ती रायफल विकायची नाही, अशी ताकीदही देऊन ठेवली होती.
आता दिवस मावळू लागला होता. आम्ही सगळेच घामानं, धुळीनं भरलेलो होतो. आणखी थोडा वेळ, मग आवराआवरीला लागू या, मी मनाशी ठरवलं. मैदानात खेळ चालले होते. वायुसेनेनं उड्डाणाची प्रात्यक्षिकं करून दाखवली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. स्टॉलवर नजर भिरकावली; थोडा थकवा जाणवत असला तरी मनांत समाधान होतं. नजर पुन्हा त्या रायफलवर गेली, मी का विकत नव्हते? उगाचच, पण समजा तो मुलगा आलाच नाही तर? कारण नसताना पडून राहील. भावनेच्या आहारी जाऊन व्यापार होत नसतो. मी स्वत:ला समज दिली. एक सुस्कारा सोडून स्टॉलबाहेर बघितलं, खेळणी विकत घेऊ न शकलेली मुले खेळण्यांच्या रिकाम्या बॉक्सबरोबर खेळत होती. त्यातलं खेळणंच त्यांच्या हातात असल्यासारखं जणू! दुधाची तहान ताकावर भागवत होती बिचारी!
बिगुल वाजला, आम्हाला स्टॉल बंद करायचा संकेत मिळाला, मी व माझ्या मदतनीसानं आवराआवर सुरू केली. ‘या सतरंज्या, खुर्ची, इतर सामान सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित पोहोचवून दे, मी हिशेब बघते. सूचना देऊन मी वळले. ती रायफल शेवटी राहिलीच; च्, देऊन टाकली असती तर बरं झालं असतं. पण तो मुलगा? जणू आपले प्राणच त्यात साठवून गेला होता. त्याची ती आसुसलेली नजर मला अस्वस्थ करीत होती. त्याच्या त्या नजरेनं त्या रायफली भोवती जणू अदृश्य कवच निर्माण केलं होतं. ‘‘मॅम, ये गन क्या करुँ?’’ मदतनीसानं विचारलं. ‘तिथेच ठेव’ मी मानेनंच इशारा केला. काउंटरजवळच्या खुर्चीत बसत असताना माझी खाली पडलेली पर्स उचलायला मी खाली वाकले न् तो आवाज माझ्या कानी पडला. ‘मॅडम, ब्येन म्हारी गन?’. सकाळपासून अनेकदा आलेला तो मुलगा परत आला होता. त्याला बघून नकळत मला फार फार बरं वाटलं. चला, आला तर! ‘पैसे आणलेस का?’ माझा व्यापारी प्रश्न!
‘छे मेडम छे!’ म्हणत त्याने बंडीतल्या खिशात हात घातला. काही दुमडलेल्या मळक्या नोटा, काही चिल्लर माझ्यासमोर ठेवली. घामानं डबडबलेला, धूळ मातीनं भरलेला, अनवाणी, फाटक्या अवतारातला तो मुलगा माझ्यासमोर उभा होता, त्याची नजर कधी माझ्याकडे, कधी गनकडे, कधी नोटांकडे मध्येच आळीपाळीने जात होती. पैसे मोजताना त्याच्याकडे बघितलं. त्याचे प्राण त्याच्या डोळ्यात एकवटले होते. मी पैसे मोजले, पुन्हा एकदा मोजले.. कमी होते. माझ्या लक्षात आलं, सकाळपासून कु ठून कुठून त्यानं ही रक्कम जमा केली असणार. त्यालाही कदाचित कल्पना होती की रक्कम पुरेशी नाही. तो कासावीसपणे बघत होता. काउंटरवर त्याचे हात घट्ट.. मी मनाशी निश्चय केला, त्याच्या फाटक्या कळकट्ट नोटा बॉक्समध्ये टाकल्या व ती रायफल त्याच्या हातात ठेवली.. तो क्षण अवर्णनीय होता.. दुर्मुखलेल्या त्याच्या चेहऱ्यावर हजारो सूर्याचा प्रकाश होता. त्याचं ते हास्य हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचणारं.. प्रसाद घ्यावा तशी ती रायफल त्यानं घेतली. छातीशी कवटाळली व बघत बघता गर्दीत नाहीसा झाला. माझ्या पर्समधून पैसे काढून रकमेची पूर्तता केली. शांत, समाधानी वाटत होतं मला.
उन्हाच्या सावल्या लांब होत चालल्या. आम्ही स्टॉल आवरला, मदतनीसाला सूचना दिल्या. सगळं आटपून मी घराकडे निघाले. अजूनही गर्दी होती, पण रेंगाळणारी.. उगाचच! माझं लक्ष गेलं, मुलं खेळत होती. ज्याच्या त्याच्या हातात बंदुका, गन होत्या. त्यांचं वागणं बोलणं सगळंच बदललं होतं. एक गुर्मी..एक नशा, त्यांच्या डोळ्यांत दिसत होती, भाषेमध्ये जाणवत होती. ‘‘कु..! आ सामने, तुझे भून डालूँगा.. अबे कितनी गोलियाँ है?’’ म्हणत एकमेकांच्या डोक्यावर, छातीवर रोखलेल्या बंदुका.. एक प्रकारचा हिंस्रपणा.. शस्त्र हाती घेतल्याबरोबर त्यांच्यात आपोआप आला होता. मीच त्यांना ही खेळणी विकली होती. मन विषण्ण अणि जड झालं, मघाचं समाधानी मन अस्वस्थ झालं. अगदी अशांत..
हळूहळू चालत मी ग्राउंडच्या मध्यावर आले, सूर्य मावळत होता. निरुत्साही मनानं मी स्वत:ला ढकलत चालले होते. अचानक समोर जुना मिग उभा दिसला. निकामी झालेला तरी दिमाखानं उभा होता. धुळीचे लोट उठले, मी तिथंच थांबले, काही मुलांचा ग्रुप एक दो..एक दो.. कवायत करीत येत होता. कोणी कशाही अवतारात होतं. मुलंच ती.. त्याचा म्होरक्या मात्र आपल्या टोळीचं नेतृत्व करीत होता. एक दो, एक दो करीत तो मुलगा ‘मिग’समोर खाड्कन थांबला, त्याचे साथीही एकसाथ थांबले. तो मुलगा ‘जयहिंद’ म्हणत सॅल्यूट करीत त्या ‘मिग’समोर उभा.. कमी पैसे देऊन रायफल विकत घेणारा, धुळीनं भरलेला पण त्याचे डोळे विलक्षण चमकत होते.. ताठपणे, दिमाखात तो सॅल्यूट करीत क्षणभर उभा राहिला.. भावी सैनिक.. शूर जवान.. खरा नेता.. भारत मातेचा भावी रक्षक .. मी त्याला ओळखलं. कदम ताल करत, ‘जयहिंद’ची घोषणा देत तो मुलगा व त्याचे साथी पुढे निघून गेले..
माझं मन अगदी हलकंफुलकं झालं. मणा मणाचं ओझं उतरलं जणू.. ‘जयहिंद’ म्हणत सॅल्यूट मुद्रेतला तो कच्छी मुलगा.. सच्चा सेनानी.. मी डोळ्यात साठवत. हलकंसं गुणगुणत प्रसन्न मनानं माझ्या घराकडे वळले..!