News Flash

व्हॉट अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स!

मेकॅनिकला लाइटबद्दल सांगितलं. त्याने चेक केलं आणि म्हणाला, स्विच बदलावा लागेल.

(संग्रहित छायाचित्र)

सुधीर करंदीकर srkarandikar@gmail.com

मी मेकॅनिकला थँक्स म्हणालो आणि गाडी सुरू केली. अजून लख्ख उजेड होता, पण सवयीप्रमाणे, माझा अंगठा लाइटच्या बटणावर गेला, पण लगेच विचार आला, की मेकॅनिकला बटणाच्या क्वालिटीवर आणि स्वत:च्या कामावर इतका विश्वास आहे, तर मला त्याच्या कामावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. मित्राकडून निघताना चांगलाच अंधार पडला होता. गाडी सुरू केली. बटण सुरूकेलं आणि लाइट सुरू. मेकॅनिकबद्दल तोंडातून आपोआप शब्द आले,

व्हॉट अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स!

माझ्या स्कूटरचा हेडलाइट ७-८ दिवसांपासून बिघडला होता. रोज बावधनहून घरी येताना अंधार झालेला असतो, त्यामुळे हेडलाइटशिवाय गाडी चालवणं, जरा किंवा चांगलंच रिस्की वाटायचं. आळस केव्हा तरी अंगाशी येतोच-येतो, ‘कल करे सो आज कर’, वगैरे, अशा सगळ्या म्हणी मला पाठ आहेत, पण टाळाटाळ करण्याचं एकच कारण होतं आणि, ते म्हणजे, माझ्या नेहमीच्या मेकॅनिकचं दुकान, माझ्या रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला होतं.

त्यामुळे लाइट दुरुस्त करायचा म्हणजे सकाळी त्याच्याकडे गाडी न्यायची, तो म्हणणार, साहेब तासाभराने या, करून ठेवतो. चालत घरी यायचं. तो वेळेत करून ठेवेल, यावर आपला कधीच विश्वास नसतो. म्हणून आपण त्याला फोन करणार, ‘झालीय का’. मग चालत जाणार आणि गाडी आणणार. दिव्यासारख्या किरकोळ कामाकरता इतके सोपस्कार नकोत म्हणून, ‘आज करे सो कल कर, आणि कल करे सो परसो कर’ असा माझा उलटा प्रवास सुरू होता.

त्या दिवशी रविवार होता. दुपारी आमचे युरोपमित्र नेरकर यांच्याकडे गेलो होतो. घरी परत येताना लक्षात आलं, की मेकॅनिकचं दुकान याच रस्त्यावर आहे. विचार केला, की गाडी त्याच्याकडे टाकू, रिपेअर होईपर्यंत इकडे-तिकडे बघू, टाइमपास करू. ‘कल करे सो आज, आणि आज करे सो अभी’. विचार पक्का झाला. कॉर्पोरेशन बँकेजवळ पोहोचलो आणि लक्षात आलं, की इथं एक स्पेअर पार्टचं दुकान आहे आणि तिथं मेकॅनिकपण असतो. विचार बदलला. इथंच गाडी टाकली तर काम लवकर होणार, हे नक्की.

मेकॅनिकला लाइटबद्दल सांगितलं. त्याने चेक केलं आणि म्हणाला, स्विच बदलावा लागेल. मी पैसे विचारले आणि दुकानात पैसे देईपर्यंत, याने स्विच काढला- नवीन बसवला. म्हणाला, साहेब गाडी झाली, घेऊन जा. जुना स्विच हातात दिला.

मी : (सवयीप्रमाणे विचारलं) गाडी चालू करून लाइट लागतो, हे चेक केलं ना?

मेकॅनिक : साहेब, त्याची काही गरज नाही. गाडी चालवताना अंधार पडला की बटण ऑन करा. लाइट लागणार.

मी : एकदा चेक तर करून घ्या.

मेकॅनिक : साहेब, दुकानात सगळा माल ओरिजिनल असतो. त्यामुळे मालावर पूर्ण विश्वास. काम करताना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही विचार मी मनात आणत नाही. त्यामुळे ‘ऑलवेज डू इट राइट, फस्र्ट टाइम’ हा माझा मोटो आहे. काम चुकायची गुंजाईश – झीरो.

मी : (मनात – हा माणूस आपल्यापेक्षा खूपच वर पोहोचलेला दिसतोय.)

मी मेकॅनिकला थँक्स म्हणालो आणि गाडी सुरू केली. अजून लख्ख उजेड होता, पण सवयीप्रमाणे माझा अंगठा लाइटच्या बटणावर गेला, की निघण्यापूर्वी लाइट लावून बघावा म्हणून. पण लगेच विचार आला, की मेकॅनिकला बटणाच्या क्वालिटीवर आणि स्वत:च्या कामावर इतका विश्वास आहे, तर मला त्याच्या कामावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. माझा अंगठा आपोआप मागे आला. तेवढय़ात एका जवळ राहणाऱ्या मित्राचा फोन आला, थोडा वेळ घरी येऊन जा, एक स्पेशल डिश आहे. मित्राकडून निघताना चांगलाच अंधार पडला होता. गाडी सुरू केली. लाइटचं काम झालं आहे, हे माहीत होतं. बटण सुरू केलं आणि लाइट सुरू. मेकॅनिकबद्दल तोंडातून आपोआप शब्द आले -‘व्हॉट अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स!’ घरी आल्यानंतर, ‘काम करताना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही विचार मी मनात आणत नाही’, ‘ऑलवेज डू इट राइट, फस्र्ट टाइम’ हा माझा मोटो आहे. काम चुकायची गुंजाईश – झीरो.’ हे मेकॅनिकचे शब्द मनात घुमायला लागले. आणि मी भूतकाळात गेलो.

कुणाच्या खात्यात बँकेत चेक भरायचा असेल, तर चेक लिहिल्यानंतर मी २-३ वेळा सगळे बरोबर आहे ना, हे चेक करतोच आणि बँकेत चेक बॉक्समध्ये टाकण्यापूर्वी पुन्हा बघतो, की काही चुकले तर नाही ना!

घराला कुलूप लावून बाहेरगावी जायचे असेल, तर ५-६ वेळा तरी कुलूप ओढून बघतो. नंतर गाडीत बसल्यानंतर काही वेळा मनात रुखरुख राहते, की कुलूप बरोबर लागलंय ना, पाण्याचा नळ बंद आहे ना, बघायचा राहिला आहे – सुरू राहिला असेल तर काय होणार?

कार लॉक करून आपण घरात येतो आणि मनात पाल चुकचुकते की पाìकग लाइट ऑन तर नसतील?

एकदा आम्ही मित्र कारने बाहेरगावी निघालो. थोडं पुढे गेलो आणि एक जण म्हणाला, गाडी मागे घे. दाराला बाहेरून कुलूप लावलं आहे की नाही आठवत नाही. सध्या चोऱ्या खूप होतायत. एक जण म्हणाला, बाहेरून एक्स्ट्रा कुलूप लावणं जास्त अनसेफ आहे. लॅचचं कुलूप जास्त सेफ आहे, काळजी करू नको. पण मित्राला ते पटलं नाही. आम्ही कार वळवली. घरी गेलो. कुलूप व्यवस्थित होतं. तरी मित्राने २-३ वेळा ओढून बघितलं आणि आम्ही निघालो.

अशी भली मोठी यादी नजरेसमोरून जायला लागली. माझ्यासारखे अजून बरेच ‘मी’ नक्कीच असतील. आणि सगळ्यांचे वेगळे अनुभव असतील. या आपल्या अशा सवयीमुळे वेळ तर वाया जातोच जातो आणि ताणतणावही वाढतात. जेवताना ठसका लागतो, पाय घसरून पडायला होतं, भाजी चिरताना चाकू हाताला लागतो, अपघात होतात, तब्येत बिघडते, वगैरे, वगैरे. मग औषधे आणि पुढची सगळी लाइन मागे लागते.

आणि या सगळ्याचं कारण काय, तर ‘कहीं पे निगाहे – कहीं पे निशाना’ आणि ‘नॉट डुइंग थिंग्ज राइट, अ‍ॅट फर्स्ट टाइम’, ‘जहां पे निगाहे – वहीं पे निशाना’ जमवलं तर काहीच कठीण नसतं. स्वयंवर जिंकल्याचं उदाहरण आहेच आणि त्याकरता गरज आहे-  मन लावून काम करण्याची- हातातलं काम आणि मी यामध्ये इतर विचार न आणण्याची. असं म्हणतात, आंघोळ करत असाल तर – मी आणि आंघोळ यावर लक्ष ठेवा, जेवत असाल तर – समोरचं चविष्ट अन्न, चावून खाणं आणि मिळणारा आनंद यावर लक्ष केंद्रित करा. टीव्ही बघत असाल तर फक्त टीव्ही एन्जॉय करा. अगदी टॉयलेटला गेला असाल तर फक्त तेच – फोन नाही/ फेसबुक नाही. एका वेळेस एकच काम आणि तेपण मन झोकून.

मी मनात खूणगाठ बांधली, की या क्षणापासून ‘डू इट राइट, फस्र्ट टाइम’चा अवलंब करायचा. रोज सकाळी उठल्यावर मेकॅनिकचे विचार, श्लोक म्हटल्यासारखे १० वेळा म्हणायचे. असं सांगतात, की एखादी गोष्ट सतत ३० दिवस केली, तर ती सवय लागते आणि ६० दिवस केली, तर तो स्वभाव बनतो. आणि मग एक दिवस, आपलेच अंतर्मन, आपल्या कामाकडे बघून म्हणेल, ‘व्हॉट अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स!’

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 1:05 am

Web Title: what a level of confidence
Next Stories
1 चव, ज्याची त्याची
2 बदलते नातेसंबंध
3 संवाद
Just Now!
X