आपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत.

दैव, ललाटलेख, विधिलिखित, नियती, प्रारब्ध, नशीब हे सगळे शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वारंवार वापरतो ते सर्वसाधारण सारख्याच अर्थाचे शब्द आहेत; व त्यातील समान दैववादी वृत्ती अशी की ‘नशिबात जे असेल ते होईल. आपण आपला भार ईश्वरावर सोपवून, शांत बसून राहावे.’ ही दैववादी वृत्ती, प्रयत्नवादाच्या बरोबर विरुद्ध अशी, मानवी प्रगतीला हानिकारक वृत्ती आहे. यात असे मानतात की ब्रह्मदेवाने (किंवा अल्लाने किंवा सटवाईने) आपले नशीब आपला जन्म होतानाच ठरवून किंवा लिहून ठेवलेले आहे व आपल्या आयुष्यात सर्व काही त्याबरहुकूम घडणार आहे. नाहीतरी आजूबाजूच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण नसतेच; आणि सर्व काही दैव-नियंत्रित मानल्यामुळे, मानवी प्रयत्नांना काही महत्त्वच उरत नाही. हे घातक नाही का?
तरीही जगभर सगळीकडेच, सर्व लोकांमध्ये, अशी दैवाधीनता कमी-अधिक प्रमाणात मानली जाते. त्याचप्रमाणे समाज दैववादी व परावलंबी राहण्यावर काही राजकारणी, काही धर्मवादी व काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे हितसंबंध अवलंबून असतात व ते लोक स्वहितासाठी, ‘दैववाद’ व ‘नियती निर्णायकतेच्या’ मताचा प्रसार करीत असतात. अशा कारणांमुळे मग लोकांना तेच खरे वाटू लागते.
मुळात कुणी ईश्वर, अल्ला अस्तित्वात असला तरी तो जगातील अब्जावधी माणसांचे भविष्य स्वत:च कशाला ठरवील? त्याला दुसरे काही काम नाही का? ज्या विश्वात अब्जावधी प्रचंड तारे, तारकामंडले, आणखी काय काय आहे, तसेच येथील ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, अशा या, कल्पना करायलाही कठीण असलेल्या अतिप्रचंड नियमबद्ध विश्वातील, पृथ्वीनामक एका अतिक्षुद्र ग्रहावर निर्माण झालेल्या, विश्वाच्या तुलनेत किडय़ामुंगीसारख्या असलेल्या पण बुद्धी कमविलेल्या क्षुद्र मानवाची, त्याला काय एवढी चिंता पडली आहे की त्या मानव-समूहांचे, किंवा राष्ट्रांचे, किंवा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य-नशीब त्याने स्वत:च ठरवून ठेवावे? कशाला करील तो असला उपद्व्याप?
आणि जरी समजा त्याने असला उपद्व्याप करायचा ठरविले तरी प्रत्येकाचे भविष्य केवळ त्याची जन्मतारीख व जन्मवेळ यांच्याशी जोडून तो ठेवील काय? का बरे? पण ‘फलज्योतिष शास्त्र आहे’ असे मानणाऱ्या लोकांना मात्र तसे वाटते खरे. तसे पाहता या ज्योतिषीबुवांनी या जगात एक मोठेच प्रस्थ निर्माण केलेले आहे. मानवी जीवनांतील असुरक्षितता, भय, चिंता वगैरेंमुळे सगळेच लोक, नेहमी कसल्या तरी आधाराच्या शोधात असतात. ज्योतिषी याचाच फायदा उठवितात. जन्मवेळेची ग्रहस्थिती, ग्रहांच्या चाली व नक्षत्रप्रवेश, ग्रहनक्षत्रांचे मानवी गुणांसारखे गुणावगुण, असले सगळे कुभांड जन्मपत्रिकेवर मांडून, व्यक्तीचे, समूहाचे वा राष्ट्राचे विधिलिखित ते वाचू शकतात, असा दावा ते करतात. आणि आपल्या देशात, असले हे मुहूर्त, तिथीनुसार शुभाशुभ कल्पना, लग्नासाठी कुंडल्या जुळविणे, ग्रहांचे मानवासारखे स्वभाव इत्यादी सर्व कल्पनारंजन, धर्माबरोबर जोडले गेल्यामुळे, बहुतेक लोकांना हे सर्व खरेच आहे असे वाटते व त्यामुळे त्यावर कुणी विचारही करीत नाही. सज्जनहो, याबाबत क्षणभर विचार तर करा. (१) एकाच हॉस्पिटलात एकाच क्षणी जन्मलेल्या दोन बालकांच्या पत्रिका सारख्याच असतात. त्यातील एक गरीब स्त्रीचे व दुसरे श्रीमंत स्त्रीचे असेल तर त्या दोन बालकांचे भवितव्य सारखे घडेल का? त्यांचे भविष्य, जीवनांतील चढउतार सारखे असतील का? (२) जन्मपत्रिकेवरून तो मनुष्य जिवंत आहे की मृत, हे कुणाही ज्योतिषाला सांगता येत नाही. हे सप्रयोग सिद्ध झालेले आहे. (३) एकाच पत्रिकेवरून, एकाच व्यक्तीबाबत, वेगवेगळे ज्योतिषी, वेगवेगळी भाकिते करतात. हे तर रोजच घडते. (४) आज एकही सच्चा वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्राला, शास्त्र किंवा विज्ञान म्हणत नाही. कारण ते अवास्तव व अफाट अशा गृहीतांवर रचलेले असून, त्यात वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक पद्धत आणि विश्वासार्ह सिद्धान्त यांचा पूर्ण अभाव दिसून येतो. व म्हणून तर सगळे ज्योतिषी, जे जे भविष्य सांगतात, ते ते अशा संदिग्ध भाषेत सांगतात की त्यातून उलटसुलट नाना अर्थ निघतात. शेवटी प्रत्यक्षात काहीही घडले तरी ज्योतिषाने तीही शक्यता सुचविली होती असे आपल्याला वाटते आणि भविष्य अगदीच खोटे ठरले तर ते विसरले जाते व आपल्या गूढ नशिबाला दोष देऊन आपण गप्प बसतो. ज्योतिषांची काही थोडी भविष्ये क्वचित् कधी ‘काकतालीय न्यायाने’ किंवा ‘संभवनीयतेच्या नियमाने’ खरीसुद्धा ठरतात. उदाहरणार्थ १०० स्त्रियांना ‘मुलगा’ होईल असे भविष्य सांगितले तर त्यातील ५० जणींच्या बाबतीतले भविष्य खरे ठरण्याची शक्यता असतेच की; आणि मग खऱ्या ठरलेल्या त्या भाकितांची व त्या ज्योतिषांची दवंडी पिटली जाते. थोडक्यात असे की फलज्योतिष कितीही नावाजले किंवा कितीही बहुमान्य असले, तरी ते शास्त्र नसून, थोतांड आहे.
अशीही काही माणसे जगात असणे शक्य आहे की ते लोक ईश्वर मानीत नसूनही जन्मपत्रिका, ग्रहांचे सामथ्र्य व त्यावरून किंवा कशावरून तरी, ‘भविष्य’ वर्तविता येते असे ते मानत असतील. आम्हा विवेकवाद्यांना मात्र, ‘प्रत्येकाचे भविष्य जन्मत: ठरलेले आहे’ हेच मुळात मान्य नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने ते आधी समजण्याचा, आमच्यासाठी काही प्रश्नच उद्भवत नाही. प्राप्त परिस्थितीत आमचे बरेवाईट भविष्य, आमचे आम्हीच घडवतो (जे आधी ठरलेले नसते), असा आमचा विश्वास आहे. आम्हाला कधी यश मिळते, तर कधी धडधडीत अपयश (अगदी आपटी खावी लागते.) पण आमच्या यशापयशाची भौतिक कारणे आम्ही बुद्धीच्या साहाय्याने शोधतो. कारण आध्यात्मिक व ज्योतिषीय कारणे भोंगळ असतात व म्हणून आम्हाला ती मान्य नाहीत.
क्षणभर मानू या की कुणी ईश्वर अस्तित्वात आहे व त्याने आपला ललाटलेख लिहून ठेवलेला आहे. जसे इस्लाममध्ये प्रत्येक माणसाचे भाग्य ईश्वर अल्ला स्वत: स्वत:च्या मर्जीनुसार ठरवितो व त्यात कुणीही कधीही बदल करू शकत नाही. हिंदू धर्मात आपले भाग्य हे आपलाच पूर्वजन्म आणि कर्मफलसिद्धान्ताशी जोडलेले आपलेच अपरिवर्तनीय कर्मफळ असते. सारांश, आपण ललाट लेख कधीही बदलत नाही. परंतु ईश्वर प्रेमळ व दयाळू असल्यामुळे व्यक्तीचे दैवपालट घडविण्याचे, म्हणजे न बदलणारा ललाटलेख बदलून देण्याचे काही उपाय (उदाहरणार्थ- पूजाप्रार्थना, कर्मकांड, प्रायश्चित्त, नमाज वगैरे) त्याने उपलब्ध करून ठेवलेले आहेत असे बहुतेक धार्मिक लोक मानतात.
आता असा विचार करा की, विश्वाचा खरेच जर कुणी ईश्वर असला तर त्याला आपल्यासारख्या क्षुद्र जीवांच्या स्तुती-प्रार्थनेची गरज कशाला असेल? कुणीही ‘माणूस’ जसा स्तुती-प्रार्थनेने खूश होतो तसा ‘ईश्वर’ कशाला आपल्या स्तुती-प्रार्थनेला भाळेल आणि त्याच्या बदल्यात, व्यापाऱ्यासारखा वागून आपला ललाटलेख बदलेल? शनी-मंगळासारख्या तथाकथित दुष्ट ग्रहांची शांती करणे हा तर चक्क मूर्खपणा आहे. ग्रह हे माती व वायूचे निर्जीव गोळे आहेत. ज्योतिषाने किंवा पुरोहिताने केलेल्या त्याच्या त्या शांतीमुळे, आपला ललाटलेख बदलता येईल अशी भन्नाट कल्पना लोकांना पटते तरी कशी, याचे मला फार आश्चर्य वाटते. पण या देशात तरी हे घडते खरे. म्हणजे अगणित लोक ज्योतिषांकडे व गुरुबाबांकडे अशा कामांसाठी जातात व त्यांना त्यासाठी पैसे देऊ करतात हे आपणा सर्वाना माहीत आहे. आम्हा विवेकवाद्यांच्या मते, आपल्या आयुष्यात काय घडणार वा काय घडणार नाही, हे आधी ठरविणारी कुठलीही गूढ शक्ती अस्तित्वात नाही व त्यामुळे ललाटलेख लिहिण्याचा, तो वाचण्याचा किंवा त्यात कुणी काही बदल करण्याच्या वगैरे काहीच शक्यता अस्तित्वात नाहीत. हे सर्व अशक्य आहे.
उत्क्रांतीने व स्वप्रयत्नाने मानव आज बुद्धिमान बनलेला आहे खरा! परंतु अजूनही तो अत्यंत अज्ञानी आहे. भित्रा आणि शरीराने व मनानेही दुर्बळ तर तो मुळातच आहे. नैसर्गिक संकटांनी व स्वत:च्या चुकांनी तो दु:खी आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले काय होईल ही अज्ञानाची भीती तर कायमच त्याच्या पाठी लागलेली आहे. म्हणून तर माणसाच्या सर्वच धर्मामध्ये परलोकात सुख मिळविण्यासाठी इहलोकात करण्याचे नमाज, प्रार्थनादी अनेक विधी सांगितलेले आहेत. थोडक्यात असे की माणसाला ईश्वरासारख्या गूढ शक्तीच्या आधाराची सतत आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत मनुष्य आधारासाठी चिंतनाद्वारे कल्पित ईश्वराचा ‘शोध लावील’ व त्यानंतर त्याच्या उपासनेचे मार्ग पक्के ठरवील, म्हणजेच ‘आपला धर्म, पंथ निर्माण करील’ हे सर्व स्वाभाविकच आहे, आणि माणसाने नेमके तेच केले. वेगवेगळे धर्म स्थापन केले, सुंदर सुंदर ईश्वर कल्पिले; हजारो वर्षे त्यांच्या उपासना केल्या आणि धर्माची, ईश्वरांची, स्वर्गनरक व पापपुण्यादी कल्पनांची ऐहिक उपयुक्तता व त्यांचे दुरुपयोग अनुभवले.
आपल्या जीवनात काही घडून दैनंदिन अनुभव येणे हे तर रोजच घडत असते. तसेच एखाद्यालाच अपघात होणे, मोठय़ा अपघातांतून अनेक जणांपैकी एखादाच वाचणे, बाकी सगळे मरणे, एखाद्यालाच लॉटरी लागणे अशा प्रासंगिक घटनांबाबत ती घटना घडून गेल्यावर आपण निष्कर्ष काढतो की ते त्याचे प्रारब्धच होते म्हणून ते तसे घडले. अनेक जणांच्या आयुष्यात, त्यांच्या संपत्तीत, कर्तृत्वात, सुखदु:खात कधी कधी कमालीची स्थित्यंतरे घडतात, पण त्याची नेमकी कारणे सुसंगतपणे कळू शकत नाहीत. हे असेच आहे. घटनांची कारणे भौतिकच पण गुंतागुंतीची असतात व ती नीट न उलगडण्यामुळे ती नियतीवर ढकलण्याचा आपल्याला मोह होतो. प्रत्यक्षात मात्र दैव, भाग्य, नशीब, नियती, प्रारब्ध असे काही नसते. म्हणजे घटना घडून गेल्यावर, केवळ आपल्या सोयीसमाधानासाठी काढण्याचे ते सुलभ निष्कर्ष आहेत.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती