चित्रपटसृष्टीत नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘बाहुबली २’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल १२१ कोटी रुपयांची कमाई केली. दिग्दर्शक एस एस राजामौली आणि अभिनेता प्रभास ही सर्व रक्कम शहीदांच्या कुटुंबियांना देणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, यामध्ये काहीही तथ्य नसून ही केवळ अफवा असल्याचे समोर आलेय.

वाचा : ‘.. तेव्हा प्रभासकडे पैसे नव्हते’

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारच्या मदतीने ‘भारत के वीर’ ही वेबसाइट आणि अॅप लाँच केले. तर क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी राजामौली आणि प्रभासने जर असे काही पाऊल उचलले तर ती नक्कीच कौतुकास्पद बाब ठरेल. पण, सध्या तरी असे कोणतेच अधिकृत वृत्त राजामौली किंवा प्रभासकडून आलेले नाही.

वाचा : ‘कटप्पा’ आणि ‘शिवगामी देवी’चा हा व्हिडिओ पाहिलात का?

राजामौली आणि प्रभासच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही याबाबत कोणतीच पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. खरंतर, इतर काही गोष्टींचा विचार करता या दोघांनी असे करायचे ठरवले तरी ते शक्य होणार नाही. कारण, ‘बाहुबली २’ने कमविलेल्या १२१ कोटींच्या कमाईत निर्माते, वितरक यांचाही वाटा आहे. त्यामुळे, हे दोघेजण फारतर स्वतःच्या वाट्याचे २५-३० कोटी रुपये मदत स्वरुपात देऊ शकतात, असे म्हटले जातेय. विशेष म्हणजे, राजामौली आणि प्रभासने शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला असता तर त्याबद्दल नक्कीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असती.

वाचा : ‘होय, मला एका डोळ्याने दिसत नाही’