‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये आनंद कुमार यांची भूमिका अभिनेता हृतिक रोशन साकारणार आहे. मुख्य कलाकाराची निवड झाल्यानंतर आता दिग्दर्शक ‘सुपर ३०’च्या ३० विद्यार्थ्यांची भूमिका साकारणाऱ्यांच्या शोधात आहे.

चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी त्या ३० जणांच्या शोधासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्याभरापासून ते या कामाला लागले असून १५ ते १७ वयोगटाच्या जवळपास १५ हजार लोकांचे ऑडिशन्स त्यांनी आतापर्यंत घेतले आहेत. बिहार, वाराणसी, भोपाळ, मुंबई आणि दिल्लीत हे ऑडिशन्स घेतले गेले. १५ हजारमधून अनेकांना वगळून आता ती संख्या ७८ वर पोहोचली आहे. निवडलेल्या या ७८ मुलांसाठी विविध वर्कशॉपसुद्धा घेतले जात आहेत. या वर्कशॉपमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या ३० मुलांना निवडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

VIDEO : खिलाडी कुमारने असा साजरा केला शूटिंग संपल्याचा आनंद

विशेष म्हणजे निवडलेल्या ३० मुलांसाठी हृतिकसोबत आणखी एका वर्कशॉपचं आयोजन करण्यात येणार आहे. मुकेश यांनी याधीही बॉलिवूडला उत्तम असे कलाकार दिले आहेत. ‘बजरंगी भाईजान’मधील हर्षाली मल्होत्रा, ‘दंगल’मधील झायरा वसीम आणि सुहानी भटनागर यांचा शोध मुकेश यांनीच घेतला होता.

वाचा : …अन् माधुरी हॉकी स्टीक घेऊन आमीरच्या मागे पळाली

विकास बहल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालं नसून ‘सुपर ३०’ हेच नाव ठेवण्यात येईल असं म्हटलं जात आहे. पाटणा येथील आनंद कुमार यांच्या जीवनसंघर्षाचं चित्रण यामध्ये करण्यात येणार आहे.