अलीकडच्या पाचकळ विनोद आणि अंगविक्षेपांना विनोदी समजण्याच्या काळात आशय-विषयाच्या जोरावर उत्तम विनोदनिर्मिती करू शकणारं ‘नऊ  कोटी सत्तावन्न लाख’ हे नाटक एकदम धमाल आहे.

मराठी नाटय़सृष्टी ही सगळ्या प्रकारच्या नाटय़रसांनी बहरलेली आहे. पण तिला विनोदी नाटकांची फळे प्रमाणापेक्षा जास्तच लगडलेली दिसतात. बहुधा मराठी नाटय़सृष्टीला विनोद उत्तम प्रकारे घडवून आणता येत असेल किंवा मराठी प्रेक्षकांना विनोद उत्तम प्रकारे समजत असेल. पण विनोदी नाटकांचं पीक जोरात आलंय असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे मराठी नाटकांची प्रगल्भता हरवत चाललीये का असे प्रश्न उपस्थित केले जात असताना काही क्वचित विनोदी नाटके विनोदामधून प्रगल्भता दर्शविण्याचा प्रयत्न करतात. उत्तम बांधणी आणि प्रसिद्ध चेहरे यांची साथ मिळून ती प्रसिद्धीसही पावतात. आणि अशी विनोदी नाटके काळाच्या प्रवाहासोबत वाहून न जाता कालातीत राहतात, जी कदाचित अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत राहू शकतात. ही सर्व गुणवैशिष्टय़े जोपासणारं एक नवं नाटक म्हणजे ‘प्रवेश’ आणि ‘साज’ प्रॉडक्शन्स निर्मित ‘नऊ  कोटी सत्तावन्न लाख’.

Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
Vijay Kondke movie Lek Asavi Tar Ashi trailer released
‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जबरदस्त ट्रेलर
subodh bhave Sangeet Manapmaan movie first poster out
Video: सुबोध भावेने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर, म्हणाला, “मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार…”
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित

सध्याचा काळ पाहता ‘वन टाइम वॉच’चा जमाना आहे. त्यामुळे सहसा मराठी प्रेक्षक एक तर सगळीच नाटकं पाहायला जात नाही किंवा गेला तरी एकदाच पाहून परत येतो. पुन्हा जाण्याचा मोह त्याला होत नाही. किंबहुना रंगभूमीवर अशी फार कमी नाटके आहेत जी तुम्हाला मोहात पाडतात आणि पुन्हा पुन्हा नाटय़गृहात आकर्षित करतात. ‘मोरूची मावशी’, ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ किंवा ‘वस्त्रहरण’ ही त्यापैकी काही प्रकारातील नाटके. पण ‘नऊ  कोटी सत्तावन्न लाख’ हे नाटक त्याला अपवाद आहे. या नाटकात तुम्हाला पुन्हा पुन्हा नाटय़गृहात खेचून आणण्याची ताकद आहे. ‘एका विनोदावर एकदाच हसू येतं’ हा वैश्विक नियम इथे फोल ठरण्याची संपूर्ण शक्यता आहे. हे नाटक तुम्हाला संपूर्ण मनोरंजन देतं. आणि नाटकाचा शेवट झाल्यावर ‘अरेरे, आपला हसण्याचा काळ संपला वाटतं बहुधा’ अशी मनाला हुरहुर लागायला लागते आणि हे नाटक पुन्हा कधी आहे याचा आपण शोध घेऊ  लागतो.

‘नऊ  कोटी सत्तावन्न लाख’ या विनोदी नाटकाचं कथानक अतिशय रंजक आहे. (मुळात या विनोदी नाटकाला कथानक आहे इथेच नाटक जिंकतं. हल्ली बहुतांश विनोदी नाटकांना कथानकंच नसतात. अंगविक्षेप आणि शब्दच्छल पुरेसा असतो पाचकळ विनोदांना. असो.) एका सामान्य माणसाला अचानक ‘नऊ  कोटी सत्तावन्न लाख’ एवढे पैसे आयते मिळाले, तर काय होईल? तो पैसे परत करेल? त्या पैशांचं तो काय करेल? त्या एवढय़ा पैशांच्या आनंदात तो कसा वागेल? किंवा मग त्या पैशांच्या जबाबदारीने तो काय काय करेल? या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे आपल्याला ‘नऊ  कोटी सत्तावन्न लाख’ या नाटकात मिळतील.

नाटकाचं नाव पाहता प्रेक्षक काहीतरी घोटाळेबाज पाहायला मिळेल या आशेने नाटय़गृहात जातो. पडदा उघडण्याआधीच नाटकाची उद्घोषणा एका वेगळ्या स्वरूपात आणि तिरकस भाषेत झाल्याने प्रेक्षक आपला विनोदबुद्धीचा तिसरा डोळा उघडून नाटक पाहण्यास सज्ज होतो. त्या उद्घोषणेतूनच हे नाटक इतर चार सामान्य विनोदी नाटकांसारखं साधे दोन डोळे उघडे ठेवून पाहण्याचे नाही हे त्याला जाणवतं. याच प्रेक्षकांच्या सजगतेला जागृत ठेवण्याचं काम लेखक संजय मोने यांनी उत्तम प्रकारे केलंय. नाटकाचं कथानक विशेष प्रभावी ठरतं. कारण हल्लीच्या विनोदी नाटकांना कथानक असणं हे दुर्मिळ झालंय. संजय मोने हे इथे लढाई जिंकण्यास सुरुवात करतात. कुठेही अचकटविचकट विनोद नाहीत, वेगवेगळे आवाज काढून हल्ली नट प्रेक्षकांना हसवतात तसा कुठे अट्टहास नाही आणि शिव्यांना निर्माण झालेल्या प्रतिशब्दांचा शून्य वापर ही या नाटकाच्या लिखाणाची यशस्वितता आहे. एवढे पैसे मिळाल्याने भांबावून गेलेला सामान्य माणूस काय काय करेल याची साधी सरळ सोपी पण तरीही उपहासात्मक विनोदनिर्मिती लेखक संजय मोने यांनी घडवून आणलीये. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हा फार्स उत्तम हाताळलाय. एक उत्तम लिखाण उत्तम दिग्दर्शकाच्या हाती पडल्याचं सुख पाहायचं असेल तर हे नाटक पाहावं. पात्रांची विनोदनिर्मिती नैसर्गिक राखण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. पात्रांना अंगविक्षेपात न अडकवता नेपथ्यामधील जागा हेरून तेथून विनोदनिर्मिती घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा दिसतो. हे नाटक आणि त्याची विनोदनिर्मिती ही वेगात असल्याचं जाणवतं. आणि तो वेग धरून ठेवण्याचं चपखल काम विजय केंकरेंनी केलंय. नाटकात दिलीप ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंद इंगळे यांनी अप्रतिम काम केलंय. विनोदात चेहऱ्यावरील भाव प्रकट करण्याचं कसब फार कमी जणांकडे उरलंय. पण इंगळे ती कमी भरून काढतात. आपल्या देहाची चपळता, चेहऱ्यावरील उत्तम हावभाव आणि विनोदाचं अचूक टायमिंग या त्रिसूत्रीने इंगळेंचा अभिनय बहरतो. सतीश ही व्यक्तिरेखा साकारताना संजय मोने ज्या भांबावलेपणाच्या आणि भोळ्या बिचारेपणाच्या भूमिकेत दिसतात ते अप्रतिमच! लिखाणासोबत अभिनयाचा गडही त्यांनी छान राखलाय. ‘अंजू’ ही भूमिका साकारणाऱ्या सुलेखा तळवलकरही भूमिकेस साजेसा अभिनय करतात. मंगेश साळवीसुद्धा ‘टॅक्सी ड्रायव्हर’ची भूमिका साकारताना मध्येच येऊन धम्माल उडवून देतात. इतर पात्रांचाही अभिनय समर्पक झालाय. फक्त आनंद देव ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या राहुल कुलकर्णीचा अभिनय कृत्रिम वाटतो. पण त्याचा नाटकावर फार परिणाम होत नाही. नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केलं असून ते उत्तम झालंय. प्रकाशयोजना ही फक्त एकटय़ा मंगेश साळवीच्या जागेसाठी केली आहे की काय असं सतत जाणवतं. कारण बाकी प्रकाशयोजनेचा फारसा साधक परिणाम शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेतून होताना दिसत नाही.

नाटकाचे संगीत विशेष लक्ष वेधून घेत नाही. नाटकाचं शीर्षक गीत खूपच जुन्या काळातील आणि अनुत्साही वाटतं. आनंद देव ही प्रायव्हेट डिटेक्टिव्हची व्यक्तिरेखा जो साकारतो त्याची वेशभूषा संपूर्ण चुकली आहे, असं सतत जाणवतं. आता फक्त विनोदनिर्मिती करायची आहे म्हणून अशी वेशभूषा दिली असेल तर वेशभूषकाराने पुनर्विचार करावा. बाकी उत्तम.

तुम्हाला एक उत्तम विनोदी फार्स पाहायचा असेल आणि पुन्हा पुन्हा मोहात पाडणारं नाटक तुम्ही बऱ्याच दिवसात पाहिलं नाहीये असं तुम्हाला अचानक जाणवू लागलं असेल तर हे नाटक पाहायला हरकत नाही.

‘प्रवेश’ आणि ‘साज’ प्रॉडक्शन्स निर्मित ‘नऊ  कोटी सत्तावन्न लाख’, लेखक : संजय मोने, दिग्दर्शक : विजय केंकरे, नेपथ्य : प्रदीप मुळ्ये, संगीत : नितीन कायरकर, प्रकाशयोजना : शीतल तळपदे, वेशभूषा : मंगल केंकरे, कलाकार :दिलीप : आनंद इंगळे, अंजू : सुलेखा तळवलकर, सतीश : संजय मोने, आनंद देव : राहुल कुलकर्णी, हळदणकर : मंगेश साळवी, राधा : रेणुका बोधनकर, पोलिस : विवेक गोरे

सौजन्य : लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com