बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या २४ तासांमध्ये साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला असल्याचे समारे आले आहे.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी जवळपास सोडेनऊ कोटी लोकांनी पाहिला आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट पाहून असंख्य चाहते भावूक झाले. प्रदर्शनानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर ट्रेण्ड होऊ लागला होता. चित्रपटातील सुशांतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते.

सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी डिझनी प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्यांसाठीही मोफत ठेवला आहे. तरीसुद्धा टोरंट साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ तमिळ रॉकर्ससारख्या टोरंट वेबसाइट्सवर लीक करण्यात आला.

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.