करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन लागू केला. या घोषणेनंतर संपूर्ण देशात शाळा, कॉलेज, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद करण्यात आली. ज्यांना शक्य आहे, ते घरामधूनच काम करत आहेत. तर कामानिमित्त बाहेर असलेले तिथेच अडकले आहेत. याचसंदर्भात अनुराग कश्यपनं सोशल मीडियावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मदत मागितली. त्याला आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं.

अनुराग कश्यपने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर बिहारमधील काही कामगार महाराष्ट्रात अडकले असल्याचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘हा व्हिडीओ बिहारमधील लोकांचा आहे. जे भिवंडीमध्ये अडकले आहेत. त्यांना कंत्राटदार पैसे देत नाही आणि हे लोक उपाशी आहेत. आपण या लोकांची मदत करण्यासाठी काही करु शकतो का?’ असे म्हटल होतं. तसेच त्याने हे ट्विट आदित्य ठाकरे यांना टॅग केले होतं.

अनुरागच्या या ट्विटवर आदित्य ठाकरे यांनी लगेच उत्तर दिलं. त्यांनी अनुरागचे हे ट्विट मंत्रालयातील कक्षाला आणि ठाणे पोलिसांना टॅग केले.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा एक हजार २५१ वर पोहोचला आहे, तर ४२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे. दुसरीकडं लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.v